६५ व्या वर्षी सरांच्या तंत्रज्ञानाने नोकरीनंतरही यशस्वी शेती म्हणून सरांच्या तंत्रज्ञानाचा दूत !

श्री. पंडीत तुकाराम गावडे (M.Sc.Agri.),
मु.गाडकवाडी, पो.वरुडे, ता.खेड, जि. पुणे.
मो.९४२३००३४८३इतरत्र शेवग्याचे भाव पडले (१० रु./किलो) असतानाही मला मात्र २५ रु., १ लाख रु. उत्पन्न डॉ. बावसकर सर हे माझे प्रोफेसर होते व त्यांचा आणि माझा जुना संबंध असल्याने तसेच मला सेंद्रिय शेतीचे महत्त्व व आवड असल्यामुळे निवृत्ती नंतर शेतीमध्ये फक्त सरांचेच तंत्रज्ञान वापरात आहे. यासाठी वेळोवेळी सरांचे मार्गदर्शन घेतो.

५ जुलै २०१५ ला आम्ही ओडीसी शेवग्याची ७५० झाडे ८' x ६' वर लावली आहेत. त्यातील गेलेल्या झाडांच्या जागी 'सिद्धीविनायक' शेवग्याची लागवड केली. शेवगा पिकाचा हा पहिलाच अनुभव होता. तरी वेळोवेळी सरांच्या मार्गदर्शनानुसार शेवग्याची छाटणी, सप्तामृत फवारणी, ड्रेंचिंग करत असल्याने हा शेवगा जानेवारी २०१६ मध्ये सुरू झाला. तो मे २०१६ अखेरपर्यंत चालला. पहिलाच अनुभव असून ४ टन उत्पादन मिळाले. हा शेवगा चाकण मार्केटला पाठवित होतो. तेथे आमच्या गावातीलच मुलगा त्याची विक्री करत असल्याने इतर शेतकऱ्यांपेक्षा ५ रु. भाव जादा देण्याचा प्रयत्न करत असे. गेल्या हंगामात सर्वत्र शेवग्याचे भाव पडलेले असताना देखील आम्हाला २५ रु./किलो सरासरी भाव मिळून १ लाख रु. उत्पन्न मिळाले. नंतर या शेवग्याची १ जून २०१६ रोजी छाटणी केली. छाटणीनंतरही वेळोवेळी डॉ. बावसकर तंत्रज्ञान फवारत असल्याने १ महिन्यात खुपच छान फुटवे निघाले. २ ते २।। महिन्यात फुले लागायला लागली. त्यानंतर २५ ऑगस्ट २०१६ ला पाऊस चालू झाला. त्याने पाने पिवळी पडून गळाली, फुलेही गळाली. त्यानंतर डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची फवारणी घेतली. त्याने पुन्हा फुटवे आले. मात्र सप्टेंबर (२०१६) अखेरीस पाऊस सुरू होऊन तो सलग ८ ते १० दिवस पडल्याने पुन्हा पाने पिवळी पडून गळाली. सध्या (१२ ऑक्टॉबर २०१६) नुसत्या खराट्यासारख्या काड्या दिसत आहेत.

शेवग्यात मिरचीचे आंतरपीक

नवीन लागवडीच्या शेवग्यावरही अती पावसाचा असाच परिणाम झाला आहे. चालूवर्षी जून २०१६ मध्ये १०' x ८' फुटावर २५० 'सिद्धीविनायक' शेवग्याची लागवड केली आहे. ही जमीन जुन्या बागेपेक्षा (मध्यम जमिनीपेक्षा) हलकी मुरमाड प्रतिची आहे. या शेवग्याला मल्चिंग पेपर १० फुटाच्या ओळीवर अंथरून ८ - ८ फुटावर शेवगा लावून २ शेवग्याच्या मध्ये मल्चिंगवर सरपण - ६० जातीच्या मिरचीची २ झाडे याप्रमाणे ७०० झाडे लावली आहेत. शेवग्याबरोबर मिरचीला देखील सप्तामृताच्या फवारण्या घेत असतो. हा मिरचीचा प्लॉट चालू झाला असून आतापर्यंत ४ तोडे झाले आहेत. ८० ते १०० - १२० किलोपर्यंत तोड्याला मिरची मिळत आहे. मात्र बाजारभाव फारच कमी झाले आहेत. ४ थ्या तोड्याची मिरची तर १० रु. किलोने विकली. तोडे ऑक्टोबर २०१६ अखेरपर्यंत चालतील.

सरांनी सांगितले, " हे भाव कमी होण्याचे कारण म्हणजे यंदा सर्वदुर पाऊस झालेला आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादन चांगले झाले आहे आणि मिरचीच्या बाबतीत हिरव्या मिरचीला उन्हाळ्यात बाजारभाव तेजीचे असतात. पावसाळ्यात तिला मागणी कमी राहते. त्यामुळे सध्या मिरचीचा मागणीपेक्षा पुरवठा जास्त होत असल्याने मिरचीचे देखील भाव ढासळले आहेत."

अति पावसात पिकांचे व्यवस्थापन

मागील आठवड्यातील (ऑक्टोबरच्या पहिल्या) अती पावसाने मिरचीची पाने निमुळती, अरुंद टोकदार होऊन वरचा शेंडा स्क्रूसारखा पिळला गेला आहे. शेंडे पिवळे पडले आहेत. वाढ थांबली आहे, असे सरांनी वर्णन केल्याप्रमाणे अगदी तशीच मिरचीची अवस्था झाली आहे.

आता या दोन्ही (ओडीसी जुना व 'सिद्धीविनायक' नवीन) शेवगा प्लॉटला व मिरचीला जर्मिनेटर १ लि. + प्रिझम १ लि. + कॉपर ऑक्सीक्लोराईड १ लि. + प्रोटेक्टंट १ किलो (वस्त्रगाळ केलेले द्रावण) चे २०० लि. पाण्यातून व्हेंच्युरीतून ड्रेंचिंग करणार आहे आणि १५ दिवसांनी जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर, प्रोटेक्टंट (१ किलो), प्रिझम, न्युट्राटोन प्रत्येकी १ लि. हार्मोनी ५०० मिली आणि शेवग्यावर अळीचा प्रादुर्भाव दिसत असला तर स्प्लेंडर २०० मिली किंवा निमॅझॉल (निंबोळी अर्क) ५०० मिली + २०० लि. पाणी अशी फवारणी करण्यास सरांनी सांगिलते, त्याप्रमाणे फवारणी करणार आहे.

सरांनी सांगितले, "अति पाण्याने मुळ्यांची पोकळी शोधण्याची वाट बंद झाली आहे. पांढरी मुळी बोथट झाली आहे. त्यामुळे जमिनीतील पोकळी, पाणी व अन्नद्रव्याचे प्रमाण व्यस्त झाले आहे. त्यासाठी मिरचीला प्रत्येक झाडास १०० ग्रॅम कल्पतरू खत देणे. शेवग्याला खोडापासून १।। फुटावर मल्चिंग पेपर जेथे संपतो अशा दोन्ही बाजूने खुरप्याने रेघा मारून त्यामध्ये ५०० - ५०० ग्रॅम (१ किलो/झाड) याप्रमाणे देणे. त्यामुळे जमिनीतील पोकळी, अन्नद्रव्य, पाणी यांचा समतोल साधेल व फुले लागतील. ती गळणार नाहीत. ही फुले सशक्त, पक्के देठ असल्याने आभाळ आले तरी गळ होणार नाही. याने गांडूळ वाढतील. जमीन भुसभुशीत झाल्याने पाण्याचा निचरा होईल."

सरांनी सांगितले, "आळवणी व फवारणीमुळे फुट चांगली होऊन शेवग्याला बेचक्यातून बाजरी, ज्वारीच्या आकाराचा मोहोर लागेल. प्रोटेक्टंटमुळे मधमाशा, फुलपाखरे आकर्षित होऊन नोव्हेंबरमध्ये दोन्ही शेवग्याचे प्लॉट फुलावर येऊन ती फुले चांदणीसारखी चमकतील. त्याचबरोबर फलधारणा होऊन १५ डिसेंबरपर्यंत वाध्या लागतील व संक्रांतीत शेंगांचे तोडे चालू होतील. या काळात बाजार सुरुवातीला ३५ रु./किलो मिळेल. हा माल साधारण ३ महिने चालेल. संक्रांतीनंतर ऊन वाढल्याने फुले वाढतील, शेंगा वाढतील, शेंगा वाढताना शेंडा आणि देठ येथे नेहमीप्रमाणे शेंगाच्या फुगीर भागावर जांभळ्या रंगाचा चट्टा दिसेल. अशावेळी क्रॉपशाईनरचे सप्तामृतात प्रमाण वाढवावे."

पारंपारिक शेती म्हणजे 'ससा' व सेंद्रिय शेती 'कासव'

सरांनी सांगितले, "हा माल खरे तर आठवडे बाजारात विकला पाहिजे, कारण येथे येणारा वर्ग हा सुशिक्षित, चोखंदळ, व्हवहारी व मानवतेची बऱ्यापैकी जाण असलेला त्यांना सेंद्रिय मालाची चव व जाण झाल्याने तेच याचे अग्रगण्य दूत होतील व ते पुढे प्रसारक होतील. म्हणजे पुढे हा वर्ग ससा - कासवाच्या शर्यतीप्रमाणे पारंपारिक शेतीला (सशाला) ही सेंद्रिय शेती (कासव) चिअरअप करेल. म्हणजे सशाची पारंपारिक शेती ही मागे पडेल आणि कासवाच्या सेंद्रिय शेतीच्या विजयाची पताका माणसाच्या आरोग्यासाठी सर्व सामान्यांच्या हातात जाईल व त्यांना पताका धरल्याचा आनंद होईल."

मी ५ गुंठ्यामध्ये पल्ली वाल लावला आहे. तो २ महिन्याचा (१२ ऑगस्ट २०१६ ची लागवड) आहे. त्याच्या पानावर भोके पडली आहेत. तेव्हा सरांना याविषयी विचारले असता, सरांनी सांगितले "यशवंत राघुजी म्हेत्रे, मु.पो. दोंदे, ता.खेड (पुणे) हे गेली ३५ वर्षे डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरतात. त्यांच्या प्लॉटवर विदेशी बियाण्याचे (कोबी, टोमॅटो) ट्रायल प्लॉट घेतले जातात. त्यांच्या रिझल्टवरून नंतर हे वाण जगभर वितरीत होतात. तर यांना मी सॅम्पल म्हणून मुठभर घेवडा दिला होता. तर त्याला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरून प्रचंड उत्पन्न मिळाले. ६ महिने घेवडा विकला व त्यातील अर्धा किलो बी मला आणून दिले. "यावरून मी देखील पल्ली वालाला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरून उत्पादन घेऊन सरांना बी सॅम्पल देणार आहे.