जोजोबाची लागवड

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


वनस्पती शास्त्रामध्ये जोजोबा पिकाचे शास्त्रीय नाव सिमोसिया चिनेसिन्स असे आहे. ही वनस्पती मूळची अॅरोझॉंन खोरे, मॅस्सीको, वाळवंट व कॅलीफोर्निया या देशातील आहे. ही वनस्पती सदाहरीत व झुडूप वजा जंगली पीक आहे. या पिकात पानगळ होत नाही. या पिकाच्या पानात विषारी घटक असल्याने पाला शेळ्या, मेंढ्या अगर गुरे खात नाहीत. जोजोबाचे मुळे पाण्यासाठी खोलवर पसरतात. पाणी शोषण करून घेतात. या वनस्पतीत घेतलेले पाणी साठवून ठेवून पाहिजे त्यावेळी वापर करण्याचा अनोखा गुण असल्याचे जगभरच्या संशोधकांना दिसून आले आहे. या गुणधर्मामुळेच हे पीक दिर्घायु बनले आहे. एकदा लागवड केलेले जोजोबाचे झाड १५० ते २०० वर्ष जगते. तोपर्यंत फळे व बी देतच राहते.

महत्त्व :

१) हे पीक हलक्या माळाचे पडीक व जेथे काही येत नाही अशा जमिनीत येते.

२) कोणत्याही बागायत पिकापेक्षा जादा अर्थार्जन देणारे हे पीक आहे.

३) क्षारपड, खारवट, चोपण, करल चोपण जमिनीत देखील हे वाढते व चांगले उत्पादन देते.

४) या पिकाचे सर्वात मोठे महत्त्व व वैशिष्ट्य म्हणजे कमी वृष्टी, अतिवृष्टी, धुके, वादळ, कडकडून कडक थंडी या सर्वांना तोंड देते. थोडक्यात कोणत्याही नैसर्गिक आपत्तीला नुकसान होऊ देत नाही.

५) सध्या आंतराष्ट्रीय पातळीवर २२ देशात लागवड असलेने बी, रोप व प्रक्रिया पदार्थ याची देवाण - घेवाण होते व चालू आहे.

६) याची लागवड बी लावून, रोपे करून व छाट कलमे वापरून ही करता येते.

७) याची पाण्याची गरज २५० मिली मिटर पाऊस इतकी कमी आहे. त्यामुळे राज्याचा दुष्काळी पट्टा व कमी पावसाचे प्रदेशात ते व्यापारीदृष्ट्या यशस्वी होऊ शकते.

८) दोन ओळीत १ ले तीन वर्षे आंतरपिके घेता येतात.

९) याची लागवड, जोपासना तंत्र सोपे व सुलभ आहे.

१०) याचे तेलाचा विविध पद्धतीने वापर होतो. या बियापासून तेल मिळते.

११) लागवड खर्च कमी, उठाठेव कमी, पीक संरक्षण खर्च कमी हे अनेक फायदे.

१२) पानात विषारी घटक असल्यामुळे शेळ्या, मेंढ्या अगर जनावरे खात नाहीत, कुंपण म्हणून हरणापासून रक्षणार्थ नमुनेदार व आदर्श पीक .

१३ ) शोभिवंत झाडे या नात्याने उद्यानात लावावे.

१४ ) जोजोबा तेलापासून सौंदर्य प्रसाधने, औषधे, वंगणे, पेंड, इतर बहुविध उपयोग होतात. ही सदाहरीत झुडूप वर्गातील वनस्पती आहे.

१५ ) ३ - ४ वर्षानंतर बी व त्यापासून तेल मिळते १५० ते १६० वर्षे मिळतच राहते.

१६) याचे तेलावर तापमानाचा किंवा दाबाचा परिणाम अजिबात होत नाही.

१७) याचे वाढीमुळे प्रदूषणाला काही प्रमाणात आळा बसतो.

१८) खाद्य तेल व कमी कॅलरीजचे आरोग्यदायक तेल म्हणून वापरता येते. मात्र याची किंमत आपले इतर खाद्यतेलाचे ६ ते ८ पट जादा आहे.

१९) पेट्रोलियम पदार्थाला व तेलाला नवा पर्याय ठरवण्याचे संशोधन याच तेलावर जगभर चालू आहे.

२०) अत्यंत महागड्या क्रिममध्ये जोजोबा तेलाचा वापर होत असल्याने या तेलाची मोठ्या प्रमाणावर निर्यात होते, शिवाय आकर्षक बाजारभाव सतत मिळतात.

२१) विजेच्या ट्रान्सफार्मरमध्ये थंडावा राखण्यास याचे तेल वापरतात.

२२) औषधी आवरणावरील (कॅपसुल) भाग यापासून बनवतात.

२३) न वितळणारी मेणबत्ती यांचे तेलापासून बनवतात.

२४) स्पर्म व्हेल माशाचे तेलाला पर्याय व व्हेल माशाचे संरक्षण यासाठी जोजोबा तेलाचा जगभर वापर वाढला आहे. व्हेल माशाचे तेलाला दुर्गंधी असते. जोजोबा तेलाला ती नसते. हा या तेलाचा नवा फायदेशीर गुणधर्म ठरला आहे.

जोजोबाचे महत्त्व व फायदे स्थुलमानाने लक्षात घेता पडीक माळाचे हलक्या, बरड्या व नापेर पडलेल्या जमिनीत हे पीक करा व ४ - ५ पिढ्याचे दारिद्रय दूर करा. हा नवा व महत्त्वाचा संदेश या पिकापासून मिळतो.

जोजोबाचे द्रवरूप आणि घनरूप वॅक्संचे भौतिक व रासायनिक गुणधर्म पुढीलप्रमाणे आहेत.

१) गोठण बिंदू -१६६ डी. ते १६७ डी. सी.

२) विलय बिंदू - ६.८ ते ७ डी. सी.

३) घुम्र बिंदू - ११५ डी. सी,

४) फ्लंश पॉईंट बिंदू - २९५ डी. सी.

५) उत्कलन बिंदू - ४२० डी. सी.

६) रिफरेक्टीव्ह इंडक्स -१.४६५० ,

७ ) विशिष्ट वस्तूमान - ०.८६३,

८ ) आयोडीन व्हेल्हा - ६२

९ ) संपनोफिकेशन व्हेल्यू - ९२

१० ) आम्लाचे प्रमाण - २

११) अल्कोहोल मधील आयोडीन - ७७

१२ ) मेदाम्लातील आयोडीन - ७६

१३ ) सरासरी वस्तूमान - ६०६,

१४) तेलाचा विलयन बिंदू - ६८ ते ७० डी. सी,

१५ ) तेलाची - २५० डी. सी

जमीन : हे पीक हलक्या, माळाच्या कमी खोलीच्या जमिनीत येते. खारवट, करल चोपन जमिनीत वाढते व चांगले उत्पादन देते. त्याचप्रमाणे मध्यम खोलीच्या उत्तम निचऱ्या च्या मध्यम जमिनीत चांगले वाढून जादा उत्पदान येते. जर मुरलेल्या जुन्या बागायत व लेव्हल जमिनीत याची लागवड महाराष्ट्रात काहींनी केली तर त्यांना ४ पट जादा बी (उत्पादन) मिळते. जास्तीत जास्त उत्पादन व सर्वोत्तम अर्थार्जनासाठी हे पीक बागायत जमिनीत घ्यावे. दुष्काळ व टंचाई काळात उत्पन्न कमी मिळेल. मात्र बाग काढणेची जरुरी पडत नाही. याची वाळलेली झाडे पुन्हा पाऊस व पाणी मिळताच एकदम फुटतात व उत्पादनक्षम बनतात. ही आपल्या दुष्काळी विभागाचे दृष्टी ने अत्यंत महत्त्वाची बाब ठरते.

कोरडवाहू फळबागात आंतरपिक म्हणून लांब अंतराचे आंबा, चिंच, चिकू या फळबागात घ्यावे व दोन्हींचे उत्पादन काही दिवस घेऊन नंतर १५ -२० वर्षांनी फळबाग कमी कमी करीत जावे.

आपणाकडे जादा पाणी, सतत ऊस तसेच घाण पाणी वापराने सांगली, सातारा, कोल्हापूरमध्ये नापेर पडीक जमिनी खूप झाल्यात. बोअरच्या खारट व क्षारयुक्त पाण्यानी जमिनी वरचेवर पडीक व नापेर होत आहेत. चोपण व करल जमिनीत हे पीक करता येते. मात्र अशा ठिकाणी मिश्र पीक न करता स्वतंत्र जोजोबा करावा.

हवामान : जगात सध्या ज्या ठिकाणी जोजोबा हे पीक यशस्वी झाले त्या २२ देशात हे पीक उष्ण व समशितोष्ण कटीबंधात पीक घेतात व त्या ठिकाणी ते चांगले आले आहे.

दुष्काळी व टंचाईचे भागात कमी पाण्यावर जोजोबा जगू शकतो, वाढू शकतो, उत्पादनक्षम राहून चांगले अर्थार्जन देतो. भारतात राजस्थानचे वाळवंटात व कमी पावसाचे प्रदेशात हे पीक सतत वाढत आहे. साधारण ५ ते २० इंच पाऊस (सरासरी ६२५ मिली मिटर) व भरपूर तापमान ३२ ते ४२ डी. सें.ग्रे. या हवामानात उत्तम येतो. जगभर या पिकावर मोठे संशोधन झाले आहे. १०८० ते २५०० फुट समुद्र सपाटीपासून उंचीवर हे पीक घेण्याची शिफारस आहे. खारट, चोपण, कराल. क्षारयुक्त जमिनी व पाण्यातही हे पीक उत्तम येते.

अभिवृद्धी : पूर्ण वाढ झालेल्या झाडापासून फळे व बी मिळते. बियापासून ते झाडाची रोपे करून अगर सरळ बी लावून अभिवृद्धी करतात. बियापासून अभिवृद्धी करून रोपे करतात. मात्र या पद्धतीत थोडे दोष आहेत. या पद्धतीत रोपे ही काळजीपूर्वक करावी लागतात. रोपे चांगली वाढण्यासाठी ती पिशवीत करतात. पिशवी नर्सरी मातीने भरण्यापूर्वी जादा पाणी बाहेर जाण्यासाठी, अगर बाहेरचे पाणी मुळाला मिळण्यासाठी पिशवीला किमान ४ ते ६ छिद्रे पाडतात. अभिवृद्धी मध्ये -

१) बी सरळ लावून.

२) बियापासून रोपे करून.

३) छाट कलम पद्धतीने.

४) ऊती संवर्धनाने रोपे करून अभिवृद्धी केली जाते

बीजप्रक्रिय : जर्मिनेटर ३० मिली + प्रोटेक्टंट २० ग्रॅम + १ लि. पाणी या द्रावणात बियाणे ३ ते ४ तास भिजवून लागवड किंवा रोपासाठी लावावे. छाट कलमे करताना छाट जर्मिनेटरच्या वरीलप्रमाणे द्रावणात बुडवून कलम करावे.

छाट कलमाने अभिवृद्धी : या पद्धतीने बिया येणारे पेन्सिल जाडीचे छाट काढले जातात व ते पिशवीत लावले जातात. नराचे व मादीचे छाट वेगवेगळे लावले जातात. त्यामुळे आपणाला जेवढी नराची रोपे पाहिजे तेवढी, तसेच मादी झाडाची जेवढी रोपे पाहिजेत तेवढी मिळतात. या पद्धतीत रोपे मातृवृक्षाप्रमाणेच गुणधर्म देतात.

ऊती संवर्धनात मातृवृक्षाची निवड अत्यंत कसोशीने केलेली असते. त्यात अधिक उत्पादन, अधिक तेलचे प्रमाण, जोमदार तसेच गतीमान वाढ या सर्वच बाबी तपासलेल्या असतात. शिवाय या पद्धतीने रोपे केल्यास मातृवृक्षा चे सर्व गुण पूर्णांशाने रोपात उतरलेले असतात.

लागवड : जोजोबा पिकात नर झाडे व मादी झाडे अलग असतात. १ हेक्टर क्षेत्रात ११२५ मादी झाडे व १२५ नर झाडे लावावी लागतात. याची तयार रोपे करण्याचे व विकण्याचे कार्य वृद्धेश्वर कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था, मु. पो. नवखेडे खालसा, तालुका पाथर्डी, जि. अहमदनगर ही संस्था महारष्ट्रासाठी करीत आहे. या पिकाचा राज्यात प्रचार व्हावा व शेतकऱ्याला दर्जेदार अगदी जादा उत्पादन देणारे नव्या वाणाचे बी राजस्थान जोजोबा प्लॅन्टेश आणि रिसर्च प्रोजेक्ट कडून बी आणून पुरवत असतात. महाराष्ट्रात जोजोबाचे लागवडीसाठी दोन ओळीत ४ मिटर तर २ रोपात २ मिटर अंतर ठेवावे. प्रत्येक ओळीत दर दहा मादी झाडानंतर १ नराचे झाड या प्रमाणे करावी.

नर झाडास दीडवर्षानंतर फुले येतात. तर मादी झाडास तीन वर्षानंतर फुले येतात. ही लागवड वरील पद्धतीने ठेवता येते, तसेच ही लागवड एक ओळ पूर्ण नर झाडे त्यानंतर आळीने ९ झाडे मादीची अशी ठेवून करता येते.

लागवडीच्या वेळी रोपे किमान ४ ते ५ महिने वयाची व २० ते २५ सेंमी उंचीची असावीत, लागवड करण्यासाठी ०.६ x ०.६ x ०.६ मीटर आकाराचे खड्डे घ्यावेत, अगर जे.सी.बी. ने चर घ्यावा. खुना करून रोपे लावावीत.

रोपे लावताना १० लि. पाण्यात १०० मिली जर्मिनेटर + ५० ग्रॅम प्रोटेक्टंट असे द्रावण तयार करून त्यामध्ये बुडवून लावावीत किंवा लागवडीनंतर मुलापर्यंत द्रावण पोहोचेल असे शेंड्यावरून ड्रेचिंग करावे. रोपे लागवडीनंतर किमान पहिले २ - ३ वर्ष पाणी देता आले तर अधिक चांगले. नंतर बी येणे सुरू झाल्यावर हे पीक पडणारे पावसावर सोडून द्यावे.

रोजगार हमीतून फलोत्पादन कार्यक्रमाचे धर्तीवर हे पीक लावणारे शेतकऱ्याला हेक्टरी ५९,५३५ (एकोणसाठ हजार पाचशे पस्तीस) रुपयाचे अनुदान मिळते. या अनुदानात लागवड व ३ वर्षे खते पिकसंरक्षण हा संपूर्ण खर्च भागवता येतो.

राज्यात पडीक क्षेत्र दुष्काळी पट्ट्यात सर्वच ठिकाणी आहे. शासनाचे सवलतीचा फायदा घेवून या क्रांतीकारक पिकाची लागवड सर्वत्र वाढणे जरूरीचे व आवश्यक आहे, नव्हे निर्यातीत भरपूर अर्थार्जन मिळवून देणारे आहे. या पिकाखाली जास्तीत जास्त क्षेत्र आणणे हे सामाजिक व राष्ट्रीय कार्य म्हणून केले पाहिजे. हे पीक पडीक माळावर वाढवून आपण त्या पडीक क्षेत्रापासून अर्थार्जनबरोबरच पर्यावरण शुद्धीकरणही साध्या करणार आहोत.

खत व्यवस्थापन : या पिकाला राजस्थान जोजोबा रिसर्च सेंटर यांचे शिफारशीप्रमाणे खड्डे भरताना १ किलो सिंगल सुपर फॉस्फेट खेरीज खालीलप्रमाणे हेक्टरी खते वर्षातून २ वेळा विभागून द्यावीत.

वय/वर्षे   नत्र किलो/हेक्टर   स्फूरद किलो/हेक्टर   पालाश किलो/हेक्टर  
१   ७५   ३७.५   ७५  
३   १०५   ५२.५   १०५  
५   १३५   ६७.५   १३५  
६   १५०   ७५   १५०  
७   १५०   ७५   १५०  


या खेरीज कल्पतरू ह्या उत्कृष्ट सेंद्रिय खताचा वापर पहिल्यावर्षी ५०० ग्रॅम व त्यानंतर प्रत्येक वर्षी ५०० ग्रॅमच्या पटीत वाढ करून दोन हप्त्यात द्यावे. म्हणजे इतर पिकांप्रमाणे जोजोबाला देखील झाडाची जोमदार वाढ व उत्पादनाच्या दृष्टीकोनातून ते फायदेशीर ठरेल.

पाणी व्यवस्थापन : लागवडीनंतर पहिले ३ वर्षे पाणी दिल्यास उत्तम व जोमदार वाढ होते. उत्पादीत झाडास फांद्या उपफांद्या भरपूर असल्याने उत्पादन वाढते. ठिबकने पाणी द्यायचे असल्यास एका रोपाला दररोज एक लिटर पाणी पुरेसे होते, मात्र उन्हाळी हंगामात दररोज २ लिटर पाणी द्यावे. जोजोबा वाढल्यावर प्रति झाड ४ लिटर पाणी देणे. म्हणजे जीरायताच्या किमान ३ पट जादा उत्पादन मिळते. पहिले ३ वर्षे खरबुज, कलिंगड, काकडी अशी किंवा वेलवर्गीय भाज्या - दुधी भोपळा, दोडका ही आंतरपिके घ्यावीत. ती उन्हाळ्यात घेतल्यास अधिक सोयीस्कर व चांगले ठरते.

फवारणी : जोजोबाच्या निरोगी वाढीसाठी लागवडीनंतर १ महिन्याच्या अंतराने जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये सप्तामृत ५०० मिली १०० लि. पाणी याप्रमाणे बहार लागेपर्यंत दरवर्षी ३ ते ४ फवारण्या कराव्यात.

अधिक उत्पादनासाठी बहार धरल्यानंतर मार्च ते मे पर्यंत दर महिन्याला ५०० मिली, ७५० मिली आणि १ लिटरची २०० लिटर पाण्यातून सप्तामृताची फवारणी घ्यावी. म्हणजे बहार जादा लागून त्याची गळ न होता पोषण होईल आणि उत्पादन, दर्जात या तंत्रज्ञानाने निश्चित वाढ होईल. जोजोबा पिकावर अद्याप प्रयोग झालेले नसले तरी व्यापारी उत्पादन घेण्याकरीता डॉ.बावसकर तंत्रज्ञानाचा वापर करून निरिक्षणे आम्हाला कळवावीत.

अर्थशास्त्र : तेलाचे उपयोगाने बियाची किंमत मोठी आहे. सध्या निर्यातीत एक किलो बियास ४०० रुपये भाव आहे. ४ वर्षानंतर एकरी ३०० किलो बिया मिळतात. ७- ८ वर्षांनी व्यापारी उत्पादन एकरी एक लाख ओलीताखाली तर पावसावर एकरी २५ ते ३० हजार उत्यंत कमी खर्चात मिळते. निर्यातीत मोठा वाव असणारे असे हे पिक राज्यात पडजमीन कमी करण्यास व अर्थार्जनास निश्चितच क्रांतीकारक ठरेल अशी आशा आहे.

शिवारफेरीत जोजोबा बागेची पाहणी

शहर टाकळी (शेवगाव) येथील डाळींब, केळी, कलिंगड, कांदा आणि भाजीपाला पिकांवरील कार्य शाळेच्या वेळी शिवारफेरीमध्ये सरांनी उपस्थित शेतकऱ्यांसह अॅड. गुगळे यांच्या जोजोबा बागेला भेट दिली. तेव्हा जोजोबा या आधुनिक पिकाच्या लागवडीची माहिती देत असताना अॅड. गुगळे, तर जोजोबाचे उत्पादन व दर्जा सुधारण्यासाठी करावयाची उपाय योजना यासंबंधी मार्गदर्शन करताना डॉ.बावसकर सर यांचा जोजोबा बागेतील फोटो कव्हरवर दिला आहे.

जोजोबा लागवडीमध्ये चांगल्या उत्पादनासाठी परागीभवनाच्या दृष्टीने ९ ओळी मादीच्या व नंतर १ ओळ नराची लावली जाते. यामध्ये मादी फळे ही घंटीसारखी उभट असतात. तर नर फुले ही लहान लहान टिकलीसारखी असतात ती कव्हरवरील खालील फोटोत दिसत आहेत. सदन बाग चौथ्या वर्षाची असून हा पहिलाच बहार आहे. सर्वसाधारणपणे जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात फुले लागत असून मे - जूनमध्ये फळे काढणीस येतात.