रब्बी हंगामातील दुर्लक्षित तेलबिया पीक - जवस

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


जवस हे भारतातील एक महत्त्वपूर्ण तेलबिया पीक असून पुरातन काळापासून जवसाची शेती केली जात आहे. आपल्याकडे जवसाची लागवड प्रामुख्याने त्यापासून तेल उत्पादनासाठी केली जाते. पाश्चिमात्य देशात जवस मजबूत व टिकाऊ धागा निर्मितीसाठी वापरतात. आपण जवसाचे खाद्यतेल म्हणून कमी वापर करत असल्याने जवळपास ८०% तेल हे औद्योगिक उपयोगासाठी वापरात आणले जाते. जवसाची पेंड ही दुभत्या जनावरांसाठी उपयुक्त असून ती खत म्हणूनही वापरली जाते. या विविध उपयोगांमुळे जवसाची मागणी दिवसें - दिवस वाढत आहे. सध्या मात्र शेतकऱ्यांचे जवसाकडे काही प्रमाणात दुर्लक्ष झालेले दिसते. गेल्या चाळीस ते पंचेचाळीस वर्षात जवसाचे क्षेत्र जवळपास ५० टक्क्यांनी घटले आहे. जवसाखालील क्षेत्र घटत असतानाच या पिकाची उत्पादकता वाढली आहे. देशाच्या सन १९४५ - ५० च्या प्रति हेक्टरी २५ किलो उत्पादनाशी तुलना करता १९९९ - २००० मध्ये उत्पादन सरासरी ३८५ किलो प्रति हेक्टर पर्यंत वाढवण्यात आपल्याला यश आले आहे.

महत्त्व : जवस हे गुणधर्माने उष्ण तसेच व्रणरोपक आहे. औषधी उपयोग पुढीलप्रमाणे

गळू झाल्यावर जवसाचे पोटीस बांधावे. गळू लवकर पिकून फुटते. दूषित रक्तस्त्राव होऊन ठणका कमी होतात. छातीत कफ झाल्याने जेव्हा ताप येतो, तेव्हा जवसाच्या पीठाचे पोटीस करून छाती शेकावी. कफ पातळ होऊन वांतीद्वारे बाहेर पडतो. छाती मोकळी होते. भाजलेल्या जागी जवसाचे तेल व चुन्याची निवळी समभाग एकत्र करून चांगले घोटून लावावे. दाह कमी होतो. जखम लवकर बरी होते. जवसाचे तिखट खमंग व रुचिप्रद असते.

जमीन व हवामान : जवसाची पेरणी अनेक प्रकारच्या जमिनीवर केली जाते. परंतु चांगला निचरा होणारी मध्यम -भारी जमिनी पेरणीसाठी योग्य असते. कोरडवाहू क्षेत्रासाठी पाणी धरून ठेवण्याची चांगली क्षमता असणारी जमीन निवडावी. ६.० ते ७.५४ पर्यंत सामू असणाऱ्या जमिनीत जवस चांगल्या प्रकारे येऊ शकते.

पाण्याच्या ताणास काही प्रमाणात सहनशीलता असून ४५० ते ७५० मि. मि. पाऊस पडणाऱ्या क्षेत्रात हे पीक घेता येते. जवसाच्या योग्य वाढीसाठी उगवणीच्या वेळी तापमान २५ ते ३० डी. से.तर बी धरण्याच्या वेळी १५ ते २० डी. से. च्या दरम्यान असावे लागते.

जमिनीची मशागत : जवस मोठ्या प्रमाणात कोरडवाहू पीक म्हणून घेण्यात येत असल्याने उपलब्ध पावसाच्या पाण्याची ओल साठवून ठेवणे गरजेसे ठरते. यासाठी जमिनीची १ ते २ वेळा नांगरणी तसेच २ ते ३ वेळा कुळवणी करून घ्यावी. प्रत्येक चांगल्या पावसाच्या सरीनंतर कोळपणी केल्यास फायदेशीर ठरते.

सुधारित जाती : लागवड प्रक्रिया हवामान विभाग व हवामानाची परिस्थिती यानुसार त्या त्या विभागासाठी सुयोग्य अशा पिकाच्या जातीची पेरणीसाठी निवड करणे आवश्यक असते. परंतु शेतकरी उपलब्ध पारंपारिक जातींचाच वापर करताना आढळून येतात. सुधारित जातींचा वापर केल्यास जवसाचे उत्पादन ३ ते ४ पटीने वाढते. महाराष्ट्रासाठी शिफारस करण्यात आलेल्या जवसाच्या काही जाती याप्रमाणे.

वाणाचे नाव   कालावधी दिवस   तेलाचे प्रमाण   हेक्टरी उत्पादन (कि).  
एनएल - ९७   ११५ -१२०   ४४ %   ६०० -१२००  
एनएल -१४२   ११८ - १२३   ४२%   १५१० बागायती  
एनएल - १६५   ११६ -१२१   ४१%   १६०० - २३०० बा.  
पीकेएनएल - २६०   १११ -११५   ४३%   ११०० - १८००  


बीज प्रक्रिया : बियापासून होणाऱ्या रोगांचा प्रसार रोखण्यासाठी बीजप्रक्रिया फायदेशीर ठरते. जवसाचे १ किलो बियाणे १ लि. पाण्यात २५ मिली जर्मिनेटर आणि २० ग्रॅम प्रोटेक्टंटच्या द्रावणात अर्धा ते एक तास भिजवून नंतर सावलीत सुकवून पेरणीसाठी वापरावे. जेणेकरून बियाची उगवण लवकर व अधिकाधीक होऊन बियांपासून पसरणाऱ्या रोगांना आळा बसू शकेल व पिकाची निरोगी वाढ होईल.

पेरणीची वेळ : जमिनीतील उपलब्ध ओलावा व सिंचनाची सुविधा यानुसार जवसाची पेरणी सर्वसाधारणपणे ऑक्टोबरचा दुसरा आठवडा व १५ नोव्हेंबरच्या दरम्यान केली जाते. लवकर पेरणी केल्याने जवसाचा भुरी, तांबेरा इ. रोगांपासून बचाव होतो. कोरडवाहू जमिनींमध्ये जवसाची लवकर केलेली पेरणी महत्त्वाची ठरते, बागायती शेतीमध्ये पेरणी एक आठवडा उशिरा झाली तरी चालू शकते.

पेरणीतील अंतर व हेक्टरी बियाणे : जवसाची पेरणी करताना दोन ओळींतील अंतर २० ते ३० सें. मी. व दोन रोपांतील अंतर ७ ते १० सें. मी. ठेवल्यास ते अधिक उत्पादन मिळविण्याच्या दृष्टीने फायदेशीर असल्याचे आढळून आले आहे.

जवस पेरणीसाठी लागणाऱ्या हेक्टरी बियाण्याचे प्रमाण लागवडीची पद्धत, जमिनीतील ओलावा यावर अवलंबून असते. परंतु सर्वसाधारणपणे प्रति हेक्टरी १० ते १२ किलो बियाण्याची आवश्यकता असते.

खते आणि पाणी व्यवस्थापन : जवसाच्या उत्तम वाढीसाठी प्रति हेक्टरी ५ ते ८ टन कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत आणि १०० ते १२० किलो कल्पतरू सेंद्रिय खताचा वापर करावा. बागायती पेरणी करताना प्रति हेक्टरी १२ ते १५ टन चांगले कुजलेले शेणखत आणि १२० ते १५० किलो कल्पतरू सेंद्रिय खत यांचा वापर करावा. यातील कल्पतरू खात दोन समान भागात विभागून पेरणीच्या वेळी व उगवणीनंतर १ महिन्यांनी द्यावे.

कल्पतरू सेंद्रिय खताच्या वापराने जमीन भुसभुशीत होऊन हवेची पोकळी वाढल्याने पाणी धारणशक्ती, निचरा व्यवस्थित होतो. मुळ्यांची वाढ होऊन झाडांची वाढ, फुटावा होण्यास मदत होते.

जवस मुख्यत: कोरडवाहू पीक म्हणून घेतले जाते. परंतु शेतकऱ्याकडे पाणी उपलब्ध असल्यास आणि पेरणी नंतर ३५ ते ७५ दिवसांनी पाणी दिल्यास पिकाचे उत्पादन दुप्पट झाल्याचे विविध संशोधाती दिसून आले आहे. तेव्हा उपलब्ध पाण्यानुसार २ ते ३ पाळ्या देणे उत्पादन वाढीच्या दृष्टीने फायदेशीर ठरते.

तण व्यवस्थापन : जवस हे मुख्यत : जम्नीतील ओलाव्यावर घेतले जाते. त्यामुळे तणांचे प्रभावी व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचे ठरते. जवसामध्ये सर्वसाधारणपणे २० ते ४५ दिवसांदरम्यान पीक व तण यांच्यात अन्नद्रव्ये पाणी, सूर्यप्रकाश इ. बाबत स्पर्धा निर्माण होते. त्यामुळे पिकाचे उत्पन्न ४० टक्क्यांपर्यंत घटू शकते . हे दुष्परिणाम टाळण्यासाठी पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी खुरपणी करावी व त्यानंतर कोळपणी करावी.

रोग व्यवस्थापन :

१) तांबेरा : या रोगाच्या नियंत्रणासठी रोग प्रतिकारक जातींचा प्रभावी उपयोग करता येऊ शकतो. याचबरोबर हार्मोनीची सप्तामृतासह १५ दिवसांच्या अंतराने दोनदा फवारणी करावी.

२) भुरी : भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी रोग प्रतिकारक जातींची निवड करून पिकाची लवकर पेरणी करावी. रोगांच्या तिव्रतेनुसार हार्मोनी १॥ ते २ मिली/ लि. पाणी याप्रमाणे सप्तामृतसोबत १ ५ दिवसांच्या अंतराने फवारणी केल्यास फायदेशीर ठरते.

३) मर : मर रोगाच्या प्रतिबांधासाठी बीजप्रक्रिया करणे आवश्यक असते. याकरिता प्रति किलो बियाण्यासाठी १ लि.पाण्यातून २५ मिली जर्मिनेटर वापरावे.

कीड व्यवस्थापन :

१) बड फ्लाय : बड फ्लायच्या हल्ल्यापासून पिकाचा बचाव करण्यासाठी पिकाची लवकर पेरणी करावी.

२) फुलकिडे : फुलकिड्यांच्या बंदोबस्तासाठी मोनोक्रोटोफॉसची सप्तामृतासोबत फवारणी प्रभावी ठरते.

वरील रोग - किडींवर प्रतिबंधक उपाय म्हणून तसेच कमी पाण्यावरही चांगल्या उत्पादणासाठी पुढीलप्रमाणे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या सप्तामृताच्या फवारण्या करव्यात.

फवारणी :

१) पहिली फवारणी : (उगवणीनंतर १५ दिवसांनी) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली. + प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + प्रिझम १०० मिली. + हार्मोनी १५ ० मिली. + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (उगवणीनंतर ३० ते ४० दिवसांनी ) : जर्मिनेटर ३५० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + न्युट्राटोन २५० मिली + हार्मोनी २५० मिली. + १५० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : (उगवणीनंतर ५० ते ५५ दिवसांनी ) : थ्राईवर ७५० मिली.+ क्रॉंपशाईनर ७५० मिली. + राईपनर ५०० मिली + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + न्युट्राटोन ५०० मिली + हार्मोनी ३०० ते ३५० मिली. + २०० लि.पाणी.

४) चौथी फवारणी : (उगवणीनंतर ७० ते ७५ दिवसांनी ) : थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर ७५० मिली + न्युट्राटोन ७५० मिली + हार्मोनी ४०० मिली. + २५० लि.पाणी.

काढणी व उत्पादन : जवस पक्व झाल्यावर त्याची पाने वाळतात . त्यानंतर जवसाची विळ्याच्या सहाय्याने काढणी करावी. जवस वाढीच्या काळातील जमीन व हवामानाची परिस्थिती, पेरणी केलेली जात यानुसार उत्पादनात बदल होतो. जवसाचे साधारणत: १००० ते १२०० किलो प्रति हेक्टरपर्यंत उत्पादन मिळते.

डॉ.बावसकर तंत्रज्ञानाचा वरीलप्रमाणे नियमित वापर केल्यास हेक्टरी १२०० ते १५०० किलो उप्तादन निश्चितच मिळेल. तसेच तेलाचेही उत्पादन, दर्जात वाढ होईल. पर्यायाने एक दुर्लक्षित तेलबिया पीक हळुहळू प्रगती पथावर येईल व खाद्यतेल उत्पादन वाढीस हातभार लागेल.