स्ट्रॉबेरी उत्पादनाचे तंत्रज्ञान

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


स्ट्रॉबेरीची लागवड पूर्वी मर्यादित क्षेत्रावर आणि ठराविक ठिकाणीच होत असे, पण अलीकडे या पिकाची लागवड इतर ठिकाणीही होऊ लागली आहे. महारष्ट्रात स्ट्रॉबेरीच्या फळाभोवती आकर्षणाचे वलय निर्माण झाले आहे, कारण फळाचे नाविन्य, या फळातील पोषणमूल्ये आणि आपल्या देशात आणि देशाबाहेर या फळाला असलेली मागणी यामुळे भारतामध्ये नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेत येते. त्यामुळे स्ट्रॉबेरीच्या ताज्या फळांना युरोपीय देशांत निर्यातीसाठी भरपूर वाव आहे.

स्ट्रॉबेरीच्या फळामध्ये कर्बोहायड्रेटस जीवनसत्त्व 'क' , 'ब' आणि कॅल्शियम, लोह, स्फुरद इत्यादी अन्नघटक भरपूर प्रमाणात असतात. स्ट्रॉबेरीच्या फळाच्या १०० ग्रॅम खाण्यायोग्य भागात खालीलप्रमाणे अन्नघटकाचे प्रमाण असते.

पाणी - ८९.०%, प्रथिने (प्रोटीन्स) - ०.९%, चुना (कॅल्शियम) - ०.०३%, स्फुरद -०.०३ % , जीवनसत्त्व ' ब-२' - ०.०००१% , नियॅसीन - ०.०००४% , शर्करा (कर्बोहायड्रेटस) - ९.०% , स्निग्धांश(फॅटस) - ०.४%, लोह - ०.००१% , जीवनसत्त्व ' ब -१ ' - ०.००००३ % , जीवनसत्त्व 'क' - ०.०६%.

स्ट्रॉबेरीच्या पक्व फळांचा उपयोग खाण्यासाठी करतात अथवा स्ट्रॉबेरीच्या पक्व फळांपासून जॅम, जेली, रस, वाईन, आईस्क्रिम, डबाबंद स्ट्रॉबेरी इत्यादी प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करतात. स्ट्रॉबेरीचे झाड औषधी म्हणूनही ओळखले जाते. निरनिराळ्या रोगांवर स्ट्रॉबेरीच्या झाडाच्या पानांचा रस आणि फळे यांचा उपयोग करतात.

क्षेत्र आणि उत्पादन : जगभरात स्ट्रॉबेरीच्या पिकाखालील क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. जगामध्ये अमेरिका, पोलंड, कोरिया, स्पेन, जर्मनी, रशिया, मेक्सिको, लेबेनॉन, फ्रांस, इंग्लंड, युगोस्लाव्हिला, झेकोस्लाव्हिया, कॅनडा, नेदरलँड, नॉर्वे, हंगेरी, ऑस्ट्रेलिया इत्यादी देशांमध्ये स्ट्रॉबेरीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.

भारतात स्ट्रॉबेरीची लागवड प्रामुख्याने जम्मू -काश्मिर, निलगिरी, पर्वतातील परिसर, नैनीताल, डेहराडून, फैजाबाद, मीरत, मुझफ्फरनगर, सहारनपूर, उटी, पांचगणी, महाबळेश्वर इत्यादी थंड हवामानाच्या प्रदेशात केली जात असे. मात्र आज महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश ही राज्ये स्ट्रॉबेरी लागवडीकडे वळू लागली आहेत. महाराष्ट्रात ४०० हेकटर क्षेत्र लागवडीखाली आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, सातारा, नाशिक, अहमनगर इत्यादी जिल्हयांत स्ट्रॉबेरीची लागवड होऊ लागली आहे.

हवामान आणि जमीन : स्ट्रॉबेरीचे पीक विविध प्रकारच्या हवामानात येऊ शकते. परंतु या पिकला समशीतोष्ण हवामान चांगले मानवते. स्ट्रॉबेरी पिकाच्या वाढीसाठी भरपूर सूर्यप्रकाश असलेले दिवस आणि साधारणपणे १० ते २५ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान पोषक ठरते. स्ट्रॉबेरीच्या झाडाला फुले येण्यासाठी विशिष्ट तापमान आणि सूर्यप्रकाशाचा ठराविक कालावधी मिळणे आवश्यक असते. स्ट्रॉबेरीच्या काही जातींमध्ये दिवस कितीही लहान असतानाच फुले येतात. सूर्यप्रकाशाचा कालावधी ठराविक कालावधीपेक्षा जास्त झाल्यास या जातींना फुले येत नाही. झाडाची केवळ शाखीय वाढ होते. या जातींना 'शोर्ट डे' जाती असे म्हणतात. या 'शोर्ट डे' जातींमध्ये दिवस हा दहा तासांपेक्षा लहान असताना आणि तापमान साधारणपणे १५ अंश सेल्सिअस असताना फुले येऊन फलधारणा होते. दिवसाचा कालावधी १४ तासांपेक्षा कमी असताना आणि तापमान ७ डी. सेल्सिअसच्या खाली गेल्यास स्ट्रॉबेरीची झाडे सुप्तावस्थेत जातात. तापमान पुरेस वाढल्यानंतर झाडाची वाढ पुन्हा सुरू होते.

स्ट्रॉबेरीच्या झाडावर खोडामध्ये किंवा फुटव्यांमध्ये रूपांतर होणाऱ्या डोळ्यांची किंवा फुलांमध्ये रूपांतर होणाऱ्या डोळ्यांची निर्मिती झाल्यानंतर हे दोन्ही प्रकारचे डोळे सुप्तावस्थेत जातात. फुटव्यांमध्ये रूपांतर होणाऱ्या डोळ्यांपासून स्ट्रॉबेरीच्या रोपांना नवीन फूट येते तर फुलांमध्ये रूपांतर होणाऱ्या डोळ्यांपासून स्ट्रॉबेरीच्या झाडांना फुले येऊन फलधारणा होते. या दोन्ही प्रकराच्या डोळ्यांची सुप्तावस्था नष्ट करण्यासाठी स्ट्रॉबेरीच्या झाडाला ठराविक कालावधीसाठी अतिशय थंड तापमानाची आवश्यकता असते,यालाच स्ट्रॉबेरीचे 'चिलिंग' असे म्हणतात.

महाराष्ट्रातील हवामानात पावसाळा संपल्यावर ऑगस्ट - सप्टेंबर महिन्यात स्ट्रॉबेरीची रोपे लावल्यास हिवाळा सुरू होईपर्यंत स्ट्रॉबेरीच्या रोपांची भरपूर शाखीय वाढ होते. हिवाळ्याची पुरेशी थंडी मिळाल्यानंतर या पिकाला फुले येऊन डिसेंबरपर्यंत फलधारणा होते आणि मार्चपर्यंत उत्पादन मिळत राहते.

स्ट्रॉबेरीचे पीक विविध प्रकारच्या जमिनींत घेतले जाते. परंतु स्ट्रॉबेरीच्या पिकाच्या योग्य वाढीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी, मुरमाड किंवा रेताड पोयटायुक्त जमीन लागते. स्ट्रॉबेरीचे पीक जमिनीतील क्षारांना अतिशय संवेदनक्षम असते. जमिनीत क्षारांचे प्रमाण जास्त असल्यास रोपांची वाढ खुंटते आणि रोपे वाळून जातात. जमिनीत चुनखडीचे प्रमाण जास्त असल्यास रोपांची पाने पिवळी पडतात. स्ट्रॉबेरीच्या पिकाच्या योग्य वाढीसाठी जमिनीचा सामू ६.५ ते ७ असावा. रोपांच्या लागवडीपूर्वी जमिनीचे रासायनिक पृथक्करण करून घ्यावे लागते. जमिनीचा सामू ६.५ ते ७ या मर्यादेपेक्षा कमी अथवा जास्त असल्यास कॅल्शियम ऑक्साईड किंवा कॅल्शियम सल्फेट या रसायनांचा वापर करून जमिनीचा सामू योग्य पातळीवर आणावा. स्ट्रॉबेरीच्या झाडांची मुळे जमिनीच्या वरच्या १५ ते २० सेंटिमीटर पर्यंतच्या थरातच वाढतात. त्यामुळे मुळांच्या योग्य वाढीसाठी वरच्या थरातील जमीन मऊ आणि भुसभुशीत असावी.

सुधारित जाती :

'शॉर्ट डे' जाती :

१) डग्लस : स्ट्रॉबेरीची ही जात 'शॉर्ट डे' प्रकारातील असून १९७९ मध्ये कॅलिफोर्निया विद्यापीठाने विकसित केली आहे. हिवाळी हंगामात लागवड केल्यास या जातीला लवकर आणि भरपूर फळे येतात. उष्ण हवामानात या जातीच्या झाडांची फळे मऊ पडतात आणि अशा फळांचा टिकाऊपणा अतिशय कमी असतो. महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्यात या जातीची लागवड केल्यास भरपूर उत्पादन मिळते. या जातीच्या फळांचा आकार लांबोळा कोनासारखा असून रंग आकर्षक लाल असतो. या जातीच्या काही फळांना दोन्ही बाजूंना कडा असतात. या जातीच्या फळांना भरपूर बिया असतात. म्हणून ताजी फळे खाण्यास अथवा प्रक्रिया उद्योगात या जातीच्या फळांना कमी मागणी असते. या जातीच्या झाडांवर अनेक वेळा पांढऱ्या रंगाची अल्बिनो फळे दिसून येतात.

२) चँडलर : कॅलिफोर्नियात १९८३ साली विकसित करण्यात आलेली स्ट्रॉबेरीची ही जात 'शॉर्ट डे' या प्रकारातील आहे. या जातीच्या झाडांना डग्लर जातीप्रमाणे लवकर फळे येत नाहीत. या जातीची फळे लांबोळी, शंकूच्या आकाराची असतात. काही फळांना कडा असतात. या जातीच्या फळांचा रंग तांबडा लाल असतो. या जातीची फळे डग्लस जातीच्या फळांपेक्षा टणक असतात. या जातीची फळे जास्त काळ टिकतात. परंतु या जातीच्या फळांची साल पातळ असते. त्यामुळे या जातीच्या फळांची हाताळणी आणि वाहतूक फार काळजीपूर्वक करावी लागते. स्ट्रॉबेरीच्या या जातीच्या फळांत इतरांच्या तुलनेत कमी बिया असतात. त्यामुळे या जातीच्या फळांना ताजी फळे म्हणून खाण्यास अथवा प्रक्रिया उद्योगात चांगली मागणी आहे.

३) पाजारो : उत्तर कॅलिफोर्निया १९७९ पासून या 'शॉर्ट डे' जातीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. कॅलिफोर्नियात उन्हाळी लागवडीसाठी ही जात वापरली जाते. आपल्याकडील हवामानात ऑगस्ट - सप्टेंबरमध्ये या जातीच्या झाडाची फळे गर्द लाल रंगाची असतात. फळांचा आकार मोठा आणि शंकूसारखा असतो. स्ट्रॉबेरीच्या इतर जातींच्या फळांच्या तुलनेत या जातीची फळे लांबच्या वाहतुकीसाठी जास्त योग्य आहेत.

४) ओसो ग्रॅन्डी: स्ट्रॉबेरीची ही 'शॉर्ट डे' जात १९८७ मध्ये कॅलिफोर्नियात प्रसारित करण्यात आली. या जातीची फळे कॅलिफोर्नियातील स्ट्रॉबेरीच्या इतर कोणत्याही जातीपेक्षा आकाराने मोठी असतात. ही जात भरपूर उत्पादन देणारी असून चँडलर जातीच्या तुलनेत या जातीचे उत्पादन उशिरा मिळते. या जातीच्या फळांचा आकार शंकूसारखा असतो, तर रंग मध्यम ते गर्द लाल असतो. फळांचा स्वाद अतिशय उत्तम असतो/ या जातीची फळे टणक असल्यामुळे लांबच्या वाहतुकीत ही फळे इतर जातीच्या फळांपेक्षा जास्त चांगली टिकतात, या जातीच्या फळांमध्ये पांढरी अल्बिनो फळे आणि दुभंगलेली फळे (स्प्लिट फ्रुट) या दोन विकृती आढळतात.

या जातीशिवाय कॅलिफोर्नियात पार्कर आणि न्यूझीलंडमध्ये लिंकन या 'शॉर्ट डे' जाती विकसित करण्यात आल्या आहेत.

आ) 'डे न्यूट्रल' जाती :

१) सेल्वा : स्ट्रॉबेरीची ही 'डे न्यूट्रल' जात १९८३ मध्ये कॅलिफोर्नियात विकसित करण्यात आली. कॅलिफोर्नियामध्ये या जातीच्या झाडांना वर्षभर फळे येतात. या जातीची झाडे जोमदार वाढतात. या जातीची फळे टणक आणि लाल रंगाची असतात. फळे टणक असल्यामुळे लांबच्या वाहतुकीसाठी ही जात चांगली आहे. या जातींच्या फळांना फारसा चांगला स्वाद नसल्यामुळे या जातीच्या फळांना मागणी कमी आहे. ही जात भुरी रोगाला आणि कोळी या किडीला लवकर बळी पडते.

२) फर्न : स्ट्रॉबेरीची ही 'डे न्यूट्रल' प्रकारातील ही जात १९८३ मध्ये कॅलिफोर्नियात प्रसारित करण्यात आली. या जातीची झाडे आकाराने लहान असतात. तसेच या झाडांना लहान आकाराची भरपूर फळे येतात. कॅलिफोर्नियात या जातीच्या फळांना अतिशय कमी मागणी असून परदेशी बाजारपेठेतील काही विशिष्ट ठिकाणीच या जातीच्या फळांची निर्यात होते .

३) आयर्विन : आयर्विन ही १९८९ मध्ये कॅलिफोर्नियात प्रसारित झालेली 'डे न्यूट्रल' जात आहे. या जातीच्या फळांचा आकार शंकूसारखा असतो. या जातीची फळे ओसो ग्रॅन्डी या जातीच्या फळांपेक्ष लहान असतात.

वरील जातीशिवाय स्ट्रॉबेरीच्या स्वीट चार्ली, टिओगा, टफ्टस, आईको, योलो, म्रंक, सी स्केप, शास्त्रा ब्लॅकमोर, क्लोनमोर, फ्लोरिडा - ९० इत्यादी कॅलिफोर्नियन जाती उपलब्ध आहेत. 'भारतीय कृषी अनुसंधान संस्था, नवी दिल्ली' यांनी 'पुसा अर्ली ड्वार्फ' नावाची स्ट्रॉबेरीची डे न्यूट्रल या प्रकारातील जात विकसित केली आहे.

रोपांची निवड आणि लागवड पद्धती : धावत्या खोडांपासून स्ट्रॉबेरीच्या झाडाची अभिवृद्धी केली जाते, स्ट्रॉबेरीच्या प्रत्येक झाडाला शाखीय वाढ पूर्ण होऊन फळांनी काढणी झाल्यावर धावती खोडे (रनर्स) येतात. स्ट्रॉबेरीच्या प्रत्येक झाडाला साधारणपणे ८ ते १० धावती खोडे येतात. प्रत्येक झाडाला भरपूर रनर्स येण्यासाठी फळांची काढणी केल्यानंतर पिकाची वाळलेली पाने आणि पिकातील तण काढून शेत स्वच्छ करावे. प्रत्येक झाडाभोवतीची जमीन खुरप्याने भुसभुशीत करावी. प्रत्येक झाडास एक किलो चांगले कुजलेले शेणखत झाडाभोवती रिंगण पद्धतीने द्यावे. शेणखतमध्ये दर हेक्टरी ५ किलो कार्बेनडेझीन चांगले मिसळावे. पिकाला रोज पाणी द्यावे. जमिनीत पाण्याचा योग्य निचरा होईल याची काळजी घ्यावी. या रनर्सच्या कांड्यांवर माती टाकून ते झाकावेत. यामुळे त्यांना लवकर मुले फुटतात. मुळे फुटल्यानंतर रनर्सपासून रोप वाढण्यास सुरुवात होते. या रोपाला ३ ते ४ पाने आल्यावर धावणारे खोड मातृवृक्षा पासून कापून रोपाला स्वतंत्र वाढू द्यावे. ही रोपे उपटून नवीन लागवडीसाठी वापरावीत.

रनर्सपासून तयार केलेल्या रोपांचे उत्पादन मातृवृक्षापेक्षा ही प्रमाणात कमी येते. कारण एकाच पिकापासून तयार होणाऱ्या रनर्सपासून वर्षानुवर्षे रनर्स घेतल्यामुळे त्यापासून तयार केलेल्या रोपांची उत्पादनक्षमता कमी होते. म्हणून दरवर्षी शास्त्रीय पद्धतीने तयार केलेल्या रोपांची लागवड करणे आवश्यक आहे. स्ट्रॉबेरीच्या झाडाच्या शेंड्याच्या किंवा खोडाचा काही भाग वापरून ऊतिसंवर्धनामार्फत (टिश्यू कल्चर) रोपे तयार केल्यास मातृवृक्षाचे गुणधर्म असणारी आणि किडी आणि रोगमुक्त रोपे मिळतात.

स्ट्रॉबेरीच्या लागवडीसाठी निवडलेली जमीन ३ ते ४ वेळा उभी, आडवी, खोल नांगरून घ्यावी. जमिनीतील मोठे दगड, इतर पिकांच्या आणि झाडांच्या मुळ्या वेचून जमीन स्वच्छ करवी. ढेकळे फोडून जमिनीच्या वरच्या २० ते ३० सेंटिमीटर थरातील माती भुसभुशीत करावी. मातीत दर हेक्टरी ३० ते ४० टन चांगले कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट खत मिसळावे.

रोपांची लागवड गादीवाफ्यांवर करावी. गादीवाफे ३ फूट रुंद आणि ५० ते ६० सेंटिमीटर उंचीचे तयार करावेत. दोन गादीवाफ्यांमध्ये एक फूट अंतर ठेवावे. गादीवाफे तयार करण्यापूर्वी जमिनीचे निर्जंतुकीकरण करावे. जमिनीच्या निर्जंतुकीकरणासाठी 'मिथिल ब्रोमाईड' आणि 'क्लोरोपिक्रीन' या रसायनांचा वापर केला जातो. जमिनीचे निर्जंतुकीकरण करणे शक्य नसल्यास गादीवाफे तयार केल्यानंतर जमिनीवर 'फॉरमॅल्डीहाईड आणि बाविस्टीन'यांच्या मिश्रणाच्या ०.३% द्रावणाचा फवारा मारावा. यासाठी १० लिटर पाण्यात ३० मिलीलिटर फॉरमॅल्डीहाईड आणि ३० ग्रॅम बाविस्टीन या प्रमाणात मिसळून द्रावण तयार करावे.

हंगाम आणि लागवडीचे अंतर : स्ट्रॉबेरीच्या रोपांची लागवड उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा अशा तिन्ही हंगामात करता येते, परंतु महाराष्ट्रातील हवामानात स्ट्रॉबेरीचे उत्पादन नोव्हेंबर ते मार्च या कालावधीतच मिळते.

१) हिवाळी लागवड : या पिकाची लागवड जानेवारी - फेब्रुवारी महिन्यात करतात. या पिकाला सप्टेंबरपर्यंत भरपूर फुटवे आणि रनर्स येतात. हे फुटवे आणि रनर्स सप्टेंबरमधील लागवडीसाठी वापरता येतात. या पिकाला डिसेंबरमध्ये फुले येऊन मार्चपर्यंत फळे येतात.

२) उन्हाळी लागवड : - एप्रिल - मे महिन्यात स्ट्रॉबेरीच्या रोपांची लागवड केल्यास पावसाळा संपेपर्यंत रोपांची शाखीय वाढ होते आणि या पिकापासून ऑक्टोबर - नोव्हेंबरनंतर फळांचे उत्पादन सुरू होते. परंतु या पिकाचे कडक उन्हापासून संरक्षण करावे लागते आणि पिकाला पुरेसे पाणी द्यावे लागते.

३) पावसाळी लागवड : पावसाळ्याच्या शेवटी ऑग्स्ट- सप्टेंबर महिन्यात रोपांची लागवड केल्यास रोपांची नोव्हेंबरपर्यंत चांगली शाखीय वाढ होते आणि डिसेंबर ते मार्च या कालावधीत फळे काढणीस येतात.

गादीवाफ्यावर रोपांची लागवड करताना दोन रोपांमधील अंतर एक फूट आणि रोपांच्या दोन ओळींमधील अंतर दोन फूट ठेवावे. २ फूट x १ फूट या अंतरावर लागवड केल्यास स्ट्रॉबेरीची दर हेक्टरी ५४,४५० रोपे लागतात. रोपांची गादीवाफ्यांवर लागवड करताना प्रत्येक रोपाला एक चहाचा चमचाभर कल्पतरू सेंद्रिय खत आणि ५ ग्रॅम नत्र, स्फुरद, आणि पालाशयुक्त सेंद्रिय खत आणि ५ ग्रॅम नत्र, स्फुरद आणि पालाशयुक्त मिश्रखत (१९:१९:१९) द्यावे. रोपांची लागवड करण्यापूर्वी रोपे जर्मिनेटर ५०० मिली + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅमचे ५० लि. पाण्यात द्रावण तयार करून या द्रावणात बुडवून नंतर लागवड करावी. लागवड करताना रोपांची मुळे सरळ राहतील आणि रोपांच्या शेंड्यांवर माती पडणार नाही याची काळजी घ्यावी.

खते : स्ट्रॉबेरीच्या पिकापासून भरपूर उत्पादन मिळण्यासाठी पिकाला योग्य प्रमाणात खतांच्या मात्र देणे आवश्यक आहे. स्ट्रॉबेरीच्या पिकाला नत्र, स्फुरद आणि पालाश ही मुख्य अन्नद्रव्ये जास्त प्रमाणात आणि कॅल्शिअम, मॅग्नेशियम, सल्फर, मँगनीज, लोह, कॉपर, बोरॉन, मॉलिब्डेनम ही सूक्ष्म अन्नद्रव्ये निरनिराळ्या प्रकारच्या जमिनीत निरनिराळ्या प्रमाणात उपलब्ध असतात. काही प्रकारच्या जमिनींमध्ये काही विशिष्ट मुख्य किंवा सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असते किंवा ही अन्नद्रव्ये आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात उपलब्ध असतात. अशा जमिनींमध्ये स्ट्रॉबेरीच्या पिकावर पाने पिवळी पडणे, शेंडे जळणे, यासारखी अन्नद्रव्यांची कमतरता असणारी लक्षणे दिसतात. अशावेळी ही लक्षणे कोणत्या अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुले निर्माण झाली आहेत हे निश्चित करून त्याप्रमाणे उपाययोजना टाळण्यासाठी पिकाची लागवड करण्यापूर्वी लागवडीसाठी निवडलेल्या जमिनीचे रासायनिक पृथक्करण करून या जमिनीत कोणती अन्नद्रव्ये किती प्रमाणात आहेत हे समजून घ्यावे आणि त्याप्रमाणे पिकला द्यावयाच्या खतांच्या मात्रा ठरवाव्यात.

सर्वसाधारणपणे स्ट्रॉबेरीच्या पिकाला दर हेक्टरी ४० ते ५० टन शेणखत , ३०० ते ४०० किलो कल्पतरू सेंद्रिय खत, १२० ते १५० किलो नत्र, १०० ते १२० किलो स्फुरद आणि ७५ ते ८० किलो पालाश या प्रमाणाच्या खताच्या मात्र द्याव्यात. या खतांपैकी कल्पतरू खत १०० ते १५० किलो लागवडीच्यावेळी आणि १०० किलो फळधारणेच्यावेळी द्यावे. तोडे चालू झाल्यावर जास्त उत्पादन व उत्तम प्रतीसाठी पुन्हा हेक्टरी १०० किलो कल्पतरू खत द्यावे. स्फुरदाची संपूर्ण मात्रा लागवडीच्या वेळी द्यावी. नत्र खत तीन समान हप्त्यांत विभागून लागवडीच्यावेळी, लागवडीनंतर ४५ दिवसांनी आणि त्यानंतर फळे तोडणीस सुरुवात झाल्यानंतर द्यावे. पालाशची अर्धी मात्रा लागवडीच्यावेळी आणि उरलेली अर्धी मात्रा नत्राच्या दुसऱ्या हप्त्याबरोबर द्यावी.

स्ट्रॉबेरीची झाडे जमिनीतील क्षारांना अतिशय संवेदनक्षम असतात. स्ट्रॉबेरीच्या मुळांची वाढ जमिनीच्या वरच्या २० ते ३० सेंटिमीटर थरात होते. या थरात क्षारांचे प्रमाण जास्त झाल्यास स्ट्रॉबेरीच्या रोपांच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. रोपांची वाढ खुंटते. स्ट्रॉबेरीच्या पिकाला पाणीपुरवठा करावयाच्या पाण्यात सोडियम. कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यासारख्या क्षारांचे प्रमाण जास्त असल्यास जमिनीतील क्षारांचे प्रमाण वाढते. म्हणूनच स्ट्रॉबेरीच्या पिकाला पाण्याचा पुरवठा करण्यापूर्वी या पाण्याचे रासायनिक पृथक्करण करून घ्यावे लागते. पाण्यामध्ये अशा क्षारांचे प्रमाण ठराविक पातळीपेक्षा जास्त असल्यास अशा पाण्याचा स्ट्रॉबेरीच्या पिकासाठी वापर करू नये.

पाणी : स्ट्रॉबेरीच्या पिकाला योग्य प्रमाणात पाणी देणे आवश्यक असते. रोपांच्या लागवडीनंतर सुरूवातीचे तीन आठवडे रोपांना रोज पाणी द्यावे. लागवडीनंतर पहिले तीन आठवडे पिकाला तुषार सिंचन पद्धतीने पाणी द्यावे. या काळात पावसाच्या हलक्या सरी वारंवार पडत असतील तर तुषार सिंचनाने पाणी देण्याच्या वेळा आणि प्रमाण नियंत्रित करावे. फुले येण्याच्या वेळी पिकाला ठिबक सिंचन पद्धतीने पाणी द्यावे. प्रत्येक झाडाला रोज सरासरी पाच ते सहा लिटर पाणी मिळण्यासाठी ठिबक सिंचन संच रोज किमान दोन तास चालवावा .

स्ट्रॉबेरीच्या पिकाला पाणी कमी अथवा जास्त झाल्यास पिकाच्या वाढीवर, उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. प्रामुख्याने फळधारणेच्या काळात पिकाला पाणी कमी पडणार नाही याची काळजी घेणे अतिशय आवश्यक आहे. फुले आल्यानंतर आणि फलधारणा झाल्यानंतर पिकाला तुषार सिंचन पद्धतीने पाणी देऊ नये. तुषार सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास फुलातील परागीभवनाच्या क्रियेत अडथळा निर्माण होतो. फलधारणा होऊन वाढणाऱ्या फळांवर पाणी पडल्यामुळे पांढऱ्या रंगाच्या अल्बिनो फळांचे प्रमाण वाढते. अलीकडच्या काळात सूक्ष्म तुषार सिंचन पद्धत वापरली जात आहे. या पद्धतीने पाणीपुरवठा केलेल्या शेतांमध्ये जास्त उत्पादन मिळत असल्याचे दिसून आले आहे.

महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण :

१) मावा (अॅफिड्स) : स्ट्रॉबेरीच्या पिकावर येणारी मावा ही कीड १ ते २ मिलिमीटर लांबीची असून या किडीची पिल्ले पिवळट हिरव्या रंगाची असतात. प्रौढ मावा कीड काळसर तपकिरी रंगाची असते. या किडीची पिल्ले आणि प्रौढ कीड स्ट्रॉबेरीच्या रोपांच्या पानांच्या मागील बाजूस राहून कोवळ्या पानांतील रस शोषून घेते. त्यामुळे पाने पिवळी पडतात. किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्यास पाने मरतात आणि गळून पडतात. या किडीच्या अंगातून पातळ गोड स्त्राव बाहेर पडतो. या पदार्थाचा थर पानांवर आणि फळांवर बसतो. या चिकट गोड पदार्थावर काळी बुरशी वाढते. त्यामुळे पाने आणि फळांवर काळ्या रंगाचा थर दिसतो. पानांवर काळ्या बुरशीचा थर वाढल्यामुळे पानांची प्रकाशसंश्लेषणाची क्रिया मंदावते, फळांची कूज होते. मावा किडीमार्फात स्ट्रॉबेरीच्या पिकावर विविध विषाणुजन्य रोगांचा प्रसार होतो.

नियंत्रण : मावा या किडीच्या नियंत्रणासाठी ३० ग्रॅम प्रोटेक्टंट किंवा १५ मिलीलिटर डायमेथोएट (३० % प्रवाही) १० लिटर पाण्यात मिसळून ८ ते १० दिवसांच्या अंतराने २ ते ३ वेळा फवारावे.

२) दोन ठिपके असलेला कोळी (टु स्पॉटेड स्पायडर माईट) : ही कीड अर्धा मिलिमीटर लांबीची असून या किडीच्या शरीराच्या दोन्ही बाजूंवर काळ्या रंगाचे ठिपके असतात. या किडीचा रंग लालसर पिवळा किंवा फिकट हिरवा असतो. या किडीची पिल्ले आणि प्रौढ कीड स्ट्रॉबेरीच्या पानांवर ओरखडे पाडून पानांतील रस शोषून घेतात. किडीने खाल्लेल्या भागावर पानांच्या वरच्या बाजूस पिवळे ठिपके दिसतात. पानांचा खालचा भाग वाळलेला आणि तपकिरी रंगाचा दिसतो. या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्यास झाडाची वाढ खुंटते आणि बऱ्याच वेळा संपूर्ण झाड वाळलेले दिसते.

३) सायक्लामेन माईट : या किडीमुळे स्ट्रॉबेरीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. ही कीड आकाराने अतिशय लहान असून नुसत्या डोळ्यांनी दिसत नाही. या किडीचा रंग गुलाबी - नारिंगी असतो. ही कीड झाडाच्या शेंड्यावरील कोवळ्या पानांमधून रस शोषून उपजीविका करते. त्यामुळे नवीन येणारी पाने आकाराने लहान आणि वेडीवाकडी होतात. फुले सुकतात. झाडाची वाढ खुंटते फळे आकाराने लहान येतात.

नियंत्रण : स्ट्रॉबेरीच्या पिकावर या किडींचा उपद्रव दिसून येताच पाण्यात विरघळणाऱ्या गंधकाचा ०.२% तीव्रतेचा फवारा द्यावा. यासाठी १० लिटर पाण्यात २० ग्रॅम गंधक मिसळावे.

४) हिरवे तुडतुडे (जासिड्स) : ही कीड एक ते दोन मिलिमीटर लांबीची आणि फिकट हिरव्या रंगाची असते. ही कीड तिरप्या दिशेने चालते. या किडीची पिल्ले आणि प्रौढ तुडतुडे स्ट्रॉबेरीच्या कोवळ्या पानांतून रस शोषून घेतात. या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्यास पाने पिवळी पडून सुकतात. त्यामुळे फळांचे उत्पादन कमी येते.

नियंत्रण : या किडीच्या नियंत्रणासाठी ३० ग्रॅम प्रोटेक्टंट किंवा १५ मिलीलिटर मोनोक्रोटोफॉस (४०%) १० लिटर पाण्यात या प्रमाणात मिसळून ८ ते १० दिवसांच्या अंतराने २ ते ३ वेळा फवारावे.

५) फुलकिडे (थ्रिप्स) : ही कीड अत्यंत लहान असून १ मिलीमीटर लांबीची असते. या किडीच्या पिल्लांचा रंग पांढरट पिवळस असतो. प्रौढ किडीचा रंग पिवळा किंवा गडद तपकिरी असतो. या किडीची पिल्ले आणि प्रौढ किडी स्ट्रॉबेरीच्या पानांवर ओरखडे पाडून बाहरे येणारा रस शोषून घेतात. कोवळ्या पानांतील रस शोषून घेतल्यामुळे ही पाने चुरगळल्यासारखी वाकडीतिकडी होतात आणि आकाराने लहान राहतात. त्यामुळे झाडाची वाढ खुंटते. ही कीड फुलातील स्त्रीकेसर आणि पुंकेसर यामधील रस शोषून घेते. त्यामुळे स्त्रीकेसर आणि पुंकेसर तपकिरी रंगाचे होऊन सुकून जातात. यामुळे फलधारणा कमी प्रमाणात होते. काही वेळा या किडीचा उपद्रव फळांवर होतो. त्यामुळे देठाजवळचा भाग तपकिरी करड्या रंगाचा होतो आणि फळांची प्रत खराब होते.

नियंत्रण : या किडीच्या नियंत्रणासाठी ३० ग्रॅम प्रोटेक्टंटसोबत १५ मिलीलिटर मोनोक्रोटोफॉस (४०%) १० लिटर पाण्यात मिसळून ८ - १० दिवसांच्या अतंराने २ ते ३ वेळा फवारावे.

६) कातरकिडा (कटवर्म) : या किडीचा पतंग मोठ्या आकाराचा, २५ ते ३० मिलिमीटर लांबीची आणि तपकिरी करड्या रंगाचा असतो. या किडीची पूर्ण वाढलेली अळी १८ मिलिमीटर लांबीची असून अळीचा रंग काळसर करडा असतो. या अळीला स्पर्श करताच अळी शरीराची इंग्रजी सी (c) आकाराची गुंडाळी करते. या किडीच्या अळ्या रात्रीच्या वेळी झाडाचे नुकसान करतात. दिवसा अळ्या झाडाजवळ जमिनीमधील भेगांमध्ये किंवा वरच्या भुसभुशीत थरात लपून बसतात. रात्रीच्या वेळी या अळ्या बाहेर पडून झाडाची पाने, पानांचे देठ आणि झाडांचे खोड कुरतडून, बारीक तुकडे करून खातात. त्यामुळे पिकाचे नुसासन होते. अळ्यांनी झाडाचा शेंडा खाल्ल्यामुळे झाडाची वाढ खुंटते. फलधारणा होत नाही. फळे पिकून तयार होण्याच्या काळात या किडीचा उपद्रव झाल्यास किडीच्या अळ्या स्ट्रॉबेरीची पिकलेली फळे पोखरतात, त्यामुळे फळे कुजतात.

नियंत्रण : या किडीच्या नियंत्रणासाठी स्ट्रॉबेरीचे शेत स्वच्छ ठेवावे. शेतातील तणे वेळोवेळी काढून नष्ट करावीत. पिकाची खुरपणी करून जमिनीत लपून बसलेल्या अळ्या वेचून नष्ट कराव्यात. किडीच्या नियंत्रणासाठी ५ % क्लोरडेन किंवा हेप्टोक्लोर भुकटी दर हेक्टरी ५० किलो या प्रमाणात जमिनीत मिसळावी.

७) पाने खाणारी अळी (लीफ इटिंग कंटरपिलर) : या किडीचा पतंग पांढरट असून त्याचे पोट पिवळसर रंगाचे असते. या किडीच्या अळ्या काळ्या रंगाच्या असतात. अळ्यांच्या अंगावर पिवळ्या, काळ्या आणि पांढरट रंगाच्या केसांचे पुंजके दिसतात. या अळीला स्पर्श केल्यास ही अळी शरीराची गुंडाळी करून घेते. या किडीच्या अळ्या लहान असतात. पानांच्या खालच्या बाजूने पुंजक्याने राहतात आणि पाने खातात. अळीने खाल्लेल्या पानांच्या फक्त शिराच शिल्लक राहतात आणि पानांची चाळणी होते. अळ्या मोठ्या होऊन पानांचा जास्त भाग खातात. त्यामुळे पानांना मोठ्या आकाराची छिद्रे पडतात.

नियंत्रण : या किडीच्या नियंत्रणासाठी किडीच्या अळ्या तसेच अंड्यांचे पुंजके वेचून नष्ट करावेत. लिन्डेन पावडर (१० %) दर हेक्टरी २० किलो या प्रमाणात रोपांवर धुरळावी किंवा ३० ग्रॅम प्रोटेक्टंट आणि १५ मिलीलिटर मोनोक्रोटोफॉस (४०%) १० लिटर पाण्यात या प्रमाणात मिसळून फवारणी करावी.

८) पाने गुंडाळणारी अळी (लीफ रोलर) : या किडीचा पतंग लालसर तपकिरी रंगाचा असतो. पंखांवर पांढऱ्या रंगाच्या रेषा असतात. या किडीच्या अळ्या फिकट हिरव्या रंगाच्या असतात. अळ्यांचे डोके गर्द तपकिरी रंगाचे असते. या किडीच्या अळ्या स्ट्रॉबेरीच्या पानांच्या दोन्ही कडा गुंडाळून जाळी तयार करतात आणि या गुंडाळीत राहून आतील भाग फस्त करतात. या किडीचा उपद्रव मोठ्या प्रमाणत असल्यास स्ट्रॉबेरीची अनेक पाने एकत्र गुंडाळून जाळी तयार केली जाते. यामुळे पानांचा रंग तपकिरी होतो आणि पाने वाळून जातात.

नियंत्रण : या किडीच्या नियंत्रणासाठी किडीचा उपद्रव दिसू लागताच दर हेक्टरी १० किलो कार्बारील पावडर (१०%) आणि १० किलो लिंडेन पावडर (१०%) एकत्र मिसळून पिकावर धुरळावी.

१०) पिठ्या ढेकूण (मिलिबग) : ही कीड पांढरट पिवळ्या रंगाची असून चपटी आणि अंडाकृती आकाराची असते. या किडीच्या अंगावर पांढरा चकाकणारा मेणासारखा चिकट थर असतो. या किडीच्या अंगातून मधासारखा चिकट पदार्थ बाहेर पडतो. हा पदार्थ झाडावर पसरून त्यावर काळी बुरशी वाढते, त्यामुळे झाडाची प्रकाशसंश्लेषणामार्फत अन्ननिर्मिती करण्याची प्रक्रिया मंदावते. या किडीची पिल्ले तसेच पौढ कीड स्ट्रॉबेरीच्या पानांतील, देठांतील आणि खोडातील अन्नरस शोषून घेते. त्यामुळे झाडाची वाढ खुंटते.

नियंत्रण : या किडीच्या नियंत्रणासाठी १५ मिलीलिटर मोनोक्रोटोफॉस (४०%) १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण :

१) फळकूज : फळकूज हा रोग फळांवर विविध प्रकारच्या बुरशींची लागण झाल्यामुळे होतो. शेतातील जमिनीत, कुजणाऱ्या कंपोस्टमध्ये किंवा शेतातील पालापाचोळ्यामध्ये ही बुरशी वाढते. कालांतराने ही बुरशी स्ट्रॉबेरीच्या कच्च्या आणि पक्व फळांवर पसरते. हवेतील जास्त आर्द्रता बुरशीच्या वाढीला पोषक ठरते. विविध प्रकारच्या बुरशींचा उपद्रव झाल्यामुळे फळांवर फळकुजीची निरनिराळी लक्षणे दिसतात.

ग्रे मोल्ड फळकूज : हा रोग बॉट्रिटीस सिनेरीया या बुरशीच्या प्रादुर्भावामुळे होतो. फळे लहान असताना, पक्व फळांवर, फळांच्या काढणीनंतर आणि फळांच्या साठवणुकीत या रोगाचा उपद्रव दिसून येतो. बुरशीची लागण संपूर्ण फळावर होते, परंतु सुरुवातीला प्रामुख्याने फळांच्या देठाकडील भागावर बुरशी वाढते. फळांवर फिकट तपकिरी रंगाचे डाग दिसतात. हे डाग संपूर्ण फळावर पसरून फळे कुजतात. कुजलेली फळे मऊ न पडता टणक बनतात, फळे फुटत नाहीत किंवा फळांमधून पातळ स्त्राव बाहेर येत नाही, फळे सुकतात.

रायझोपस फळकूज : रायझोपस नावाच्या बुरशीमुळे हा रोग होतो. हा रोग प्रामुख्याने फळांच्या काढणीनंतर साठवणुकीत दिसून येतो. बुरशीची लागण झालेली फळे फिकट तपकिरी रंगाची होतात, मऊ पडतात आणि फळांमधून पातळ रस बाहेर येतो.

म्यूकर फळकूज: म्यूकर नावाच्या बुरशीमुळे हा रोग होतो. या बुरशीची लागण पक्व फळांना होते. फळांचा रंग काळसर पडतो. फळांवर बुरशीची पांढरी वाढ दिसून येते. या रोगाची लक्षणे रायझोपस फळकुजीसारखी दिसतात.

अॅन्थ्रॅक्नोज फळकूज : हा रोग कोलीटोट्रिकम नावाच्या बुरशीमुळे होतो. बुरशीची लागण झालेल्या भागावर सुरुवातीला फिकट तपकिरी रंगाचे गोलाकार चट्टे पडतात. कालांतराने हे चट्टे गर्द तपकिरी - काळसर रंगाचे होतात. बुरशीचा प्रादुर्भाव झालेला फळांचा भाग टणक होतो आणि सुकतो.

फोमॉप्सीस फळकूज : फोमॉप्सीस या बुरशीची लागण झाल्यामुळे हा रोग होतो. फळे पिकण्याच्या काळात या बुरशीची लागण होते. फळांवर सुरूवातीला गोलाकार गुलाबी रंगाचे चट्टे पडतात. नंतर हे चट्टे गर्द तपकिरी रंगाचे होतात. या चाट्ट्यांच्या कडा फिक्कट तपकिरी रंगाच्या असतात. चाट्ट्यांच्या मध्यभागी काळे ठिपके दिसतात.

टॅन - ब्राऊन फळकूज : हेनेसिया लिथ्री नावाच्या बुरशीमुळे हा रोग होतो. कच्च्या आणि पक्व फळांवर हा रोग आढळतो. बुरशीचा प्रादुर्भाव झालेला भाग काळसर तपकिरी रंगाचा आणि स्पंजासारखा होतो. हा भुसभुशीत झालेला भाग फळामध्ये खोलवर पसरलेला आढळतो. हा भाग फळामधून ओढून बाहेर काढल्यास चटकन बाहेर निघतो.

लेदर फळकूज : फायटोप्थोरा या बुरशीच्या उपद्रवामुळे हा रोग होतो. या बुरशीच्या उपद्रवामुळे कच्च्चा फळांवर तपकिरी रंगाचे चट्टे पडतात. पक्व फळांचा लाल रंग जाऊन फळे पिकत पांढरट, रंगहीन होतात अथवा गुलाबी, जांभळ्या रंगाची दिसतात. बुरशीची लागण झालेला भाग टणक होतो आणि चवीला कडवट लागतो.

नियंत्रण : फळकूज या रोगाच्या नियंत्रणासाठी स्ट्रॉबेरीचे शेत स्वच्छ ठेवावे. शेतातील पालापाचोळा स्ट्रॉबेरीची जुनी पाने, कुजलेली फळे गोळा करून नष्ट करावीत. जमिनीत वाढणारी बुरशीची बीजे नष्ट करण्यासाठी जमिनीचे निर्जतुकीकरण करावे. फळांचा जमिनीशी संबंध येऊ नये म्हणून जमिनीवर प्लॅस्टिकचे आच्छादन अंथरावे. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण 'वाढल्यास संरक्षणात्मक' बुरशीनाशकांचा फवारा द्यावा. २५ ग्रॅम बाविस्टीन कॅप्टान किंवा थायरम १० लिटर पाण्यात मिसळून ८ ते १० दिवसांच्या अंतराने ३ ते ४ वेळा फवारावे. फळे पिकल्यानंतर फळांची काढणी सुरू झाल्यानंतर फळकूज रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास सर्व पिकलेली आणि पिकण्यास सुरुवात झालेली फळे काढून पिकावर ८० % प्रवाही गंधकाच्या ०.२% तीव्रतेच्या द्रावणाची फवारणी करावी.

२) पांढरी भुरी : हा बुरशीजाण्य रोग स्ट्रॉबेरीच्या पानांवर तसेच फुलांवर आणि फळांवर मोठ्या प्रमाणात आढळतो बुरशीचा प्रादुर्भाव झालेल्या पानांच्या वरच्या बाजूला बुरशीचे पांढऱ्या रंगाचे ठिपके दिसतात, हे ठिपके वाढत जाऊन संपूर्ण पानावर बुरशीची पांढरी पावडर दिसते. बुरशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्यास फुलांवर कच्च्या आणि पक्व फळांवर पांढरी बुरशी वाढते. फुलांवर बुरशी वाढल्यामुले फुलांचा आकार वेडावाकडा होतो आणि फळधारणा कमी प्रमाणात होते. कच्च्या हिरव्या फळांवर बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यास फळे टणक बनतात. फळे पिकत नाहीत. पक्व फळे मऊ होतात आणि फळांवर पांढऱ्या रंगाची पावडर दिसते.

नियंत्रण: या रोगाच्या नियंत्रणासाठी २५ ग्रॅम गंधकाची भुकटी किंवा २० ग्रॅम प्रोटेक्टंट आणि १० ग्रॅम बाविस्टीन २० लिटर पाण्यात मिसळून १० दिवसांच्या अंतराने दोन ते तीन वेळा फवारावे.

३) पानावरील ठिपके : स्ट्रॉबेरीच्या झाडाच्या पानांवर निरनिराळ्या प्रकारच्या बुरशींमुळे विविध रंगाचे आणि आकारांचे ठिपके पडतात, त्यामुळे झाडाची वाढ खुंटते.

जांभळ्या रंगाचे ठिपके : हा रोग मायकोस्फॅरेला नावाच्या बुरशीमुळे होतो. पानांवर जांभळ्या रंगाचे लहान ठिपके पडतात. हे ठिपके नंतर तपकिरी रंगाचे होतात.

फोमॉप्सीस लीफ ब्लाईट : फोमॉप्सीस नावाच्या बुरशीमुळे हा रोग होतो. पानांवर लालसर जांभळ्या रंगाचे ठिपके दिसतात. ठिपक्यांचा आकार वाढल्यानंतर ठिपक्याचा मध्यभाग राखाडी रंगाचा होतो.

अल्टरनेरिया लीफ स्पॉट : हा रोग अल्टरनेरिय नावाच्या बुरशीमुळे होतो. बुरशीची लागण झालेल्या पानाच्या वरील पृष्ठभागावर तपकिरी रंगाचे ठिपके पडतात. या ठिपक्यांच्या कडा लालसर जांभळ्या असतात. पानांची खालील बाजू तपकिरी करड्या रंगाची होते.

अँग्युलर लीफ स्पॉट : हा रोग झान्थोमोनास नावाच्या जिवाणूंमुळे होतो. पानांच्या खालच्या बाजूला लहान फिकट हिरव्या रंगाचे ठिपके पडतात. ठिपके वाढत जातात. पानांवरील शिरांमुळे ठिपक्यांना कोणासारखा आकार येतो. ही पाने प्रकाशात धरल्यास ठिपके पारदर्शक दिसतात. कालांतराने पानांच्या वरील पृष्ठभागावर लालसर तपकिरी रंगाचे वेड्यावाकड्या आकाराचे ठिपके दिसतात. या ठिपक्यांच्या कडा पिवळ्या रंगाच्या असतात.

नियंत्रण : पानावरील ठिपके या रोगाच्या नियंत्रणासाठी जमिनीत वाढणारी निरनिराळ्या बुराशींची आणि जीवाणूंची बीजे नष्ट करणे आवश्यक आहे. यासाठी स्ट्रॉबेरीच्या रोपाच्या लागवडीपूर्वी जमिनीचे निर्जंतुकीकारण करून घ्यावे.

४) शेंडामर (फायटोप्थोरा क्राऊन रॉट) : हा रोग फायटोप्थोरा नावाच्या बुरशीमुळे होतो. बुरशीचा उपद्रव झालेल्या झाडाची नवीन कोवळी पाने सुकतात आणि निळसर हिरव्या रंगाची होतात. संपूर्ण झाड झपाट्याने सुकते आणि कोलमडून पडते. रोग झाड वर उचलल्यास झाडाचा कुजलेला शेंडा झाडापासून वेगळा होतो. झाडाची मुळे जमिनीत राहतात. रोगट शेंडाकूज उभा कापून पाहिल्यास मध्यभागी तपकिरी रंग दिसतो. शेंडाकूज रोग शेंड्यापासून मुळांपर्यंत पसरतो. त्यामुळे झाडाची मुळे कुजतात व झाड कोलमडते.

नियंत्रण : शेंडेमर या रोगाच्या बुरशीची बीजे जमिनीतून झाडात प्रवेश करतात. ही बीजे नष्ट करण्यासाठी लागवडीपूर्वी जमिनीचे निर्जंतुकीकरण करावे. जमिनीत पाणी साचून राहू नये यासाठी पाण्याचा योग्य निचरा करावा. रोगाचा प्रादुर्भाव न झालेली निरोगी रोपे लागवडीसाठी वापरावीत.

५) करपा (अँथ्रॅक्नोज) : करपा रोग कोलीटोट्रिकम नावाच्या बुरशीमुळे होतो. या रोगाच्या प्रादुर्भावाची लक्षणे झाडाच्या धावत्या खोडावर आणि पानांच्या देठांवर काळसर तपकिरी रंगाचे चट्ट्यांच्या स्वरूपात दिसतात. या चट्ट्यांचा आकार वाढत जाऊन संपूर्ण खोडावर आणि पानांच्या देठांवर पसरतात. त्यामुळे झाडाचे खोड आणि देठ सुकतात. पानाचे देठ सुकल्यामुळे पाने सुकून मरतात. काही वेळा हा रोग पानांवर पसरतो. पानांवर लहान, गोलाकार काळसर, करड्या रंगाचे ठिपके दिसतात. बुरशीचा प्रादुर्भाव झाडाच्या शेंड्यावर झाल्यास नवीन येणारी कोवेळी पाने लालसर तपकिरी रंगाची होतात. शेंडा कुजती आणि रंगहीन होतो. शेंड्याचा भाग उभा कापल्यास भध्यभागी लालसर रंगाची छटा दिसते. बुरशीचा प्रादुर्भाव फळावर झाल्यावर फिकट काळसर, तपकिरी रंगाचे ठिपके पडतात. हे ठिपके खोलगट आणि काळ्या रंगाचे होऊन संपूर्ण फळावर पसरतात.

नियंत्रण : जमिनीचे निर्जंतुकीकरण करावे, पाण्याचा योग्य निचरा करावा. लागवडीसाठी रोगमुक्त रोपे वापरावीत.

६) विषाणू आणि मायकोप्लाझ्माजन्य रोग : स्ट्रॉबेरीच्या झाडावर आणि फळांवर विविध विषाणू, मायकोप्लाझ्मा अथवा मायकोप्लाझ्मासदृश जंतुंमुळे निरनिराळे रोग होतात. या रोगांचा प्रसार प्रामुख्याने स्ट्रॉबेरीवर आढळणाऱ्या मावा या किडीमार्फत होतो.

वरील कीड रोगांच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तसेच प्रतिकुल हवामानातही स्ट्रॉबेरीचे दर्जेदार अधिक उत्पादन मिळविण्यासाठी पुढीलप्रमाणे डॉ. बावसकर तंत्रज्ञानाच्या फवारण्य कराव्यात.

फवारणी :

१) पहिली फवारणी : (लागवडीनंतर १० ते १५ दिवसांनी ) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली. + प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + प्रिझम १०० मिली. + हार्मोनी १०० मिली. + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (लागवडीनंतर २५ ते ३० दिवसांनी ) : जर्मिनेटर ३५० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + हार्मोनी २०० मिली. + १५० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : (लागवडीनंतर ४० ते ४५ दिवसांनी ) : थ्राईवर ७५० मिली.+ क्रॉंपशाईनर ७५० मिली. + राईपनर ५०० मिली + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + न्युट्राटोन ५०० मिली + हार्मोनी ३०० मिली. + २०० लि.पाणी.

४ ) चौथी फवारणी : (लागवडीनंतर ५५ ते ६० दिवसांनी) : थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर ७५० मिली + न्युट्राटोन ७५० ग्रॅम + हार्मोनी ४०० मिली. + २५० लि.पाणी.

डिसेंबरमध्ये चालू झालेला माल मे - जून पर्यंत चालण्यासाठी आणि दर्जेदार, अधिक उत्पादन मिळण्यासाठी वरील फवारणी क्र. ४ चे प्रमाणे दर ८ ते १० दिवसाला फवारणी करावी.

फळांची काढणी, उत्पादन आणि विक्री : स्ट्रॉबेरीच्या झाडाला फुले आल्यानंतर ४५ - ५० दिवसांनी फळे काढणीस तयार होतात. जानेवारी ते मार्च हा फळांचा हंगाम असतो. फळे पिकण्यास सुरुवात झाल्यावर फळावर गुलाबी छटा येते. स्ट्रॉबेरीचे पूर्ण पिकलेले फळ आकर्षक गर्द लाल रंगाचे दिसते. फळे पूर्ण पिकल्यानंतरही काही फळांमध्ये फळाचा देठाकडील भाग हिरवट पांढुरका राहतो. जवळच्या बाजारपेठेसाठी फळे पूर्णपणे गर्द लाल रंगाची झाल्यावर तोडावीत. लांबच्या बाजारपेठेसाठी देठाकडील भाग थोडासा पांढरा असलेली आणि बाकी सर्व भाग गर्द लाल झालेली फळे काढावीत.

स्ट्रॉबेरीची फळे जसजशी पिकतील तसतशी काढावीत. स्ट्रॉबेरीची फळे काढताना फळाच्या देठाकडील भागावर असणारी हिरवी टोपी (कॅलेस्क्स) फळे पिकल्यानंतरही हिरवीच राहते.स्ट्रॉबेरीची फळे काढताना ही टोपी फळाबरोबरच राहील अशा रितीने स्ट्रॉबेरीची फळे तोडून फळांची काढणी करावी. त्यामुळे फळे काढणीनंतर अधिक काळ टिकतात. फळे तोडताना फळांना हात लागणार नाही याची काळजी घ्यावी. फळांची तोडणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी करावी. फळांची काढणी करताना फळांचा आकार आणि रंगाप्रमाणे फळांची प्रतवारी करावी.

फळांची काढणी आणि प्रतवारी केल्यानंतर फळांचे पॅकिंग करून फळे विक्रीसाठी पाठवावीत. स्ट्रॉबेरीच्या फळांच्या वजनाप्रमाणे फळांचे वेगवेगळ्या प्रकारे पॅकिंग केले जाते. २५० ते ५०० ग्रॅम वजनाची फळे बसू शकतील अशा प्लॅस्टिकच्या डब्यांना 'पनेट' असे म्हणतात. २ ते ५ किलो फळांचे पॅकिंग करण्यासाठी कागदी पुठ्ठ्यांचे बॉक्सेस वापरतात. स्ट्रॉबेरीच्या पिकापासून दर हेक्टरी २५ ते ३० टन फळांचे उत्पादन मिळते. स्ट्रॉबेरीच्या एका झाडापासून एका हंगामात सर्वसाधारणपणे अर्धा किलो फळे मिळतात.