३० गुंठे अगोरा वांगी, ४ महिन्यात ३२ टन, १॥ लाख निव्वळ नफा

श्री. सुभाष शंकर इंगुळकर,
मु. पो. कामथडी, ता. भोर, जि. पुणे.
मोबा.७७०९७६८६८०


आम्ही डॉ. बावसकर तंत्रज्ञान मागील २० - २५ वर्षापासून वापरत आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने टोमॅटो, कांदा, काकडी या पिकांचे विक्रमी उत्पादन घेतले आहे आणि मालाचा दर्जाही उत्तम प्रतिचा मिळाल्याने बाजारभाव मार्केटमध्ये नंबर एक मिळतो.

गेल्यावर्षी जुलैमध्ये आम्ही ३० गुंठे काळ्या कसदार जमिनीत ५' x ५' वर अगोरा वांग्याची लागवड केली होती. २०० रू/१० ग्रॅम प्रमाणे २ पुड्या बी घेतले होते. त्याची ३० गुंठ्यात लागवड करूनही बरीच रोपे शिल्लक राहिली होती, तो शेजारी - पाजारी दिली.

या वांग्याला ६ - ७ व्या दिवशी किटकनाशकाच्या फवारण्या कराव्या लागतात. वांग्याला कीड आली तर ती लवकर हटत नाही. त्यामुळे भारी भारी (महागडी) औषधे फवारणी लागतात . यामध्ये आम्ही पोट्रीन सी -४४, नुवान, कोरीजीन, कोब्रा, यांचा वापर करतो तसेच किटकनाशकासोबत बुरशीनाशकांचाही वापर करतो. त्यामध्ये कवच, कुमानएल, ब्लायटॉंक्स, रेडोमिल, पॅगासीस यांचा आलटून पालटून वापर करतो.

डॉ. बावसकर तंत्रज्ञानाचे दर १५ ते २० दिवसाला असे माल चालू होईपर्यंत ४ फवारण्या घेतो. या औषधांमुळे झाडांना फुटवा अधिक निघून वाढ जोमाने होते. विशेषत: वांग्याला मुरडा, तांबेरा, करपा या रोगांचा प्रादुर्भाव आटोक्यात राहतो. पीक तेजदार निरोगी दिसते. मालाला कलर व चमक येते. त्यामुळे मालास उठाव राहतो व बाजारभाव जादा मिळतो.

या वांग्याचा तोडा सव्वा दोन - अडीच महिन्यात सुरू झाला. ६ व्या दिवशी तोडा करत असे, तोड्याला ५० किलोची ४० खोकी माल निघत होता. वांगी साधारण ३०० ते ३५० ग्रॅम वजनाची झाली की काढतो. अशी वांगी मार्केटला चालतात. जास्त मोठी वांगी चालत नाहीत. मात्र मोठ्या वांग्याला जर कलर असेल तर ती देखील खपतात. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या वापराने मोठा झालेल्या (मागील तोडणीस चुकलेल्या) मालासही कलर व शायनिंग असते. त्यामुळे ती देखील वांगी चांगल्या, भावाने विकली जातात.

पहिल्या दोन महिन्यात २० -२२ टन उत्पादन मिळाले. त्यानंतर पुढील २ महिन्यात १० टन असे ४ महिने तोडे चालले. त्यापासून एकून ३० -३२ टन उत्पादन मिळाले. याला सुरुवातीस १५० ते २०० रू./१० किलो भाव पुणे मार्केटला मिळाला. नंतर मालाची आवक वाढू लागल्यावर भाव कमी झाले. तेव्हा ७० ते १०० रू. भाव शेवटी मिळू लागले. तरी या वांग्यापासून २ लाख १० हजार रू. उत्पन्न मिळाले. त्याला एकूण ६० हजार रू. खर्च आला.

या अनुभवावरून चालू वर्षी १५ जुलै २०१२ रोजी २ एकर क्षेत्रावर अगोरा वांग्याची लागवड केली आहे. प्लॉट सध्या दीड महिन्याचा ३ फुट उंचीचा आहे. आतापर्यंत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या २ फवारण्या केल्या आहेत. फुलकळी अवस्थेतील या निरोगी प्लॉटला पुढील फवारण्यासाठी आज दि. ७/९/१२ रोजी सप्तामृत घेऊन जात आहे.