पशुसंगोपनात संतुलित खाद्याचे महत्त्व

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


जागतिक स्तरावर दूध उत्पादनामध्ये आपल्या देशाचा प्रथम क्रमांक लागतो. जवळपास १०० दशलक्ष टन दुधाचे उत्पादन आपल्या देशात वर्षाकाठी होत आहे. दरवर्षी ३ टक्क्यांनी दूध उत्पादनात सातत्याने वाढ होत असली, तरीही दुधाची प्रती व्यक्ती उपलब्धता लोकसंख्या वाढीच्या प्रमाणात कमीच असणार आहे. प्रती व्यक्ती दूध सेवनाचे प्रमाण हे जवळपास २५० ग्रॅम प्रती दिन आहे. जागतिक स्तरावर दूध उत्पादनामध्ये भारतानंतर अमेरिकेचा क्रमांक लागतो. परंतु आपल्या देशात अमेरिकेच्या तीन पट अधिक गुरांची संख्या आहे. आपल्या देशातील दूध देणाऱ्या गुरांचे वार्षिक दुग्धोत्पादन अमेरिकेच्या तुलनेत दहा पटीने कमी आहे. आपल्या देशातील दूध देणाऱ्या जनावरांची दूध उत्पदान क्षमता वाढविणे गरजेचे आहे. दूध उत्पादन वाढविणे ही काळाची गरज आहे.

अनुवंश, आहार आणि आरोग्य इ. बाबींवर जनावरांची उत्पादन क्षमता अवलंबून असते. दूध व्यवसायामध्ये खाद्यांवरच्या खर्च हा ६० -७ ० % इतका असतो. पशुपालन व्यवसायामध्ये खाद्यावरच्या खर्चावर नियंत्रण ठेवता आले, खर्च कमी करता आला आणि तद्वतच दूध उत्पादन वाढविता आले, तर निश्चितच नफा होतो. किंबहुना या दोन बाबींवर या व्यवसायाच्या अर्थशास्त्राचे गणित अवलंबून असते. दूध उत्पादनावर परिणाम करणारा सर्वात मोठा घटक म्हणजे आहार. गाई - म्हर्शीना त्यांच्या दूध उत्पादन क्षमतेनुसार सकस, संतुलित आहार देणे गरजेचे आहे. जनावरांच्या शरीराकरिता पाणी, प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्त्वे आणि खनिजे ही पोषक घटके (Nutrients) मिळणे आवश्यक असते. सर्वसामान्यपणे जनावरांना वाळलेला चारा, उपलब्ध हिरवा चारा, शक्य असल्यास पेंड अशा प्रकारचा आहार दिला जातो.

अशा प्रकारच्या आहारामध्ये प्रथिने, ऊर्जा, खनिज इ. च्या कमतरतेमुळे थेट दूध उत्पादनावर परिणाम होऊन दूध उत्पादन घटते. जनावर आपल्या क्षमतेनुसार दूध उत्पादन करू शकत नाही. संतुलित खाद्य, हिरवा, तसेच वाळलेला चारा (कुट्टी करून) दूध उत्पादनाच्या प्रमाणात दिल्यास अपेक्षित दूध उत्पदान मिळू शकते.

संतुलित पशुखाद्य कसे तयार करावे ?

संतुलित खाद्य तयार करताना अनेक खाद्य घटकांचा विचार केला जातो. कार्बोदके : शरीराला शक्ती प्रदान करतात. ती सर्वसाधारणपणे दोन प्रकारची असतात.

१) शीघ्र पचनीय : जसे नत्रयुक्त सत्त्व, ही त्वरित शक्ती प्रदान करतात.

२) पचण्यास जड : जसे तंतुमय पदार्थ, यामुळे जनावरांना त्वरित शक्ती मिळत नाही.

रवंथ करणाऱ्या जनावरांच्या खाद्यात तंतुमय पदार्थ ठराविक प्रमाणात असल्यास त्यांचे पचन चांगले होते. अशा पदार्थांच्या सेवनामुळे जनावरांचे पोट भरते आणि भूक लागून तृत्पी मिळते. तंतुमय पदार्थामुळे दुधातील घट्टपणा वाढतो. तसेच ते पचण्यास जड असल्यामुळे त्यांच्या पचनसंस्थेतील अधिक काळ वास्तव्याने जनावरांचे पोट भरलेले राहते. गहू, ज्वारी, मका, बाजरी इ. धान्यात कार्बोदके भरपूर प्रमाणात असतात. गवत, कडबा, हिरवा चारा यामध्ये तंतुमय पदार्थांचे प्रमाण अधिक असते.

स्निग्ध पदार्थ : कार्बोदकांप्रमाणे स्निग्ध पदार्थ शक्ती देतात. आवश्यक स्निग्ध आम्ल (Essential Fatty Acids) स्निग्ध पदार्थापासून मिळतात. तेलयुक्त बिया आणि त्यांची पेंड यामध्ये स्निग्ध पदार्थांचे प्रमाण अधिक असते.

प्रथिने : संतुलित खाद्यात कार्बोदके आणि स्निग्ध पदार्थासोबत प्रथिनांचीही आवश्यकता असते. शरीरातील पेशींच्या वाढीसाठी स्नायू तयार करण्याकरिता प्रथिनांची गरज भासते. द्विदल धान्यात उदा. सोयाबीन, भुईमूग, हरभरा, सूर्यफूल, जवस, तीळ इ. तेलबियांपासूनही भरपूर प्रमाणात प्रथिने मिळतात. प्रथिनांच्या प्राणीजन्य स्त्रोतामध्ये फीश मील, मीट मिल इ. चा समावेश होतो.

खनिजद्रव्ये किंवा क्षार : म्हणजे फक्त मीठ नव्हे. कॅल्शियम, स्फुरद, सोडियम, पोटॅशियम ही महत्त्वाची खनिजद्रव्ये होत. त्याचबरोबर लोह, तांबे, जस्त कोबाल्ट, मॅग्नेशियम इत्यादींची गरज जनावरांना भासते.

जीवनसत्त्वे : ही अल्प प्रमाणात लागतात, परंतु शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहेत. उदा. अ, ब, क, इत्यादी, अशाप्रकारे निरनिराळे अन्नघटक आहारात समतोल प्रमाणात एकत्र करून संतुलित खाद्यात १६ -१८ टक्के पचनीय प्रथिने, ७० % एकूण पचनीय पदार्थ आणि १७ टक्क्यांपेक्षा कमी तंतुमय पदार्थ असावेत.

संतुलित खाद्य तयार करायचे सूत्र

क्र.   खाद्य घटक   प्रमाण/ भाग  
१.   भरडलेले धान्ये - उदा. मका, ज्वारी, बाजरी   ३०  
२.   गहू, ज्वारी, बाजरी यांचा कोंडा, चुनी, चुरा   २०  
३.   भरडलेल्या डाळी, उदा. तूर, चना, उडीद   १२  
४.   तेल विरहित पेंड, सरकी, शेंगदाणा, सोयाबीन   २०  
५.   तेलयुक्त पेंड, सोयाबीन, सूर्यफुल, टरफले   १५  
६.   खनिज क्षार मिश्रण   ०२  
७.   मीठ   ०१  
  एकूण   १००  


संतुलित खाद्य कसे द्यावे ?

संतुलित खाद्य देण्यापुर्वी गाय, म्हैस कोणत्या शारीरिक अवस्थेमध्ये आहे हे बधून द्यावे. वाढ, गर्भावस्था आणि उत्पादन या शारीरिक भिन्न अवस्था होत. या शारीरिक अवस्था लक्षात घेणे जरूरीचे आहे. जनावरांना प्रथमत: खाद्य शरीराच्या निर्वाहाकरिता लागते. मात्र गाय, म्हैस जर गाभण असेल, तर खाद्याचा काही भाग हा गर्भाच्या वाढीकरिता, गर्भाची पोषणविषयीची गरज भागविण्यासाठी आणि काही भाग हा तिच्या निर्वाहाकरिता लागतो. गाय, म्हैस जर दूध देत असेल तर ती किती दूध देते त्या प्रमाणात तितके दूध तयार करण्याकरिता किती खाद्य लागते, हे प्रथम पहावे, त्यानंतर तिला निर्वाहाकरिता किती खाद्य लागेल हे पहावे अशा रितीने दोन्ही मिळून एकून खाद्य द्यावे.

खाद्यात प्रमुख दोन भाग असतात. ओलावा किंवा पाणी आणि कोरडा भाग, जनावरांना त्यांच्या शरीराच्या २.५ ते ३% एवढे कोरड्या प्रमाणात खाद्य (Dry Matter) लागते.

विविध शारीरिक अवस्थेमध्ये संतुलित खाद्य देण्याचे प्रमाणपशुधन   उदरनिर्वाहाकरिता   दूध उत्पादनाकरिता  
गाई (देशी)   १ ते १.५ कि. प्रतिदिन   २.५ लिटर दुधाकरिता १ किलो प्रतिदिन  
संकरित गाई, म्हशी   १.५ ते २ कि. प्रतिदिन   २ लिटर दुधाकरिता १ किलो प्रतिदिन  
वाढीकरिता   १.५ ते ३ कि. प्रतिदिन    
गर्भावस्थेमध्ये   १.५ ते २.५ किलो प्रतिदिन    
शेतातील काम करणाऱ्या बैलांना   १.५ ते २ किलो प्रतिदिन    


संतुलित खाद्यासोबत वाळलेला तसेच हिरवा चार द्यावा. चारा कुट्टी करूनच द्यावा. हिरव्या चाऱ्यामध्ये लसूण, बरसीम इ. चा समावेश असल्यास अधिक चांगले.

संतुलित खाद्य दूध उत्पादनानुसार कसे द्यावे ?

दूध उत्पादन (कि.)   संतुलित खाद्य (कि.)   हिरवा चारा (कि.)   वाळलेला चारा (कि.)  
०-२   १-२   १०-१५   ५-७  
३-५   ३-४   १६-२३   ५-७  
६-८   ४-५   २३-२८   ८-९  
९-११   ५-६   २८-३४   ८-९  
१२-१४   ६-७   ३४-४०   ९-१०  
१५-१८   ७-९   ४०-४४   ९-१०  
१९-२१   ९-११   ४४-४७   १०-११  


हिरवा आणि वाळलेला चारा चांच्या उपलब्धतेनुसार खालील बदल करता येऊ शकतात.

१) १० कि. लसूणघास, वाटाणा, बरसीमच्या ऐवजी १.५ कि. संतुलित खाद्य देता येऊ शकते.

२) १० कि. हिरवा मका, जवारी, बाजरीच्या ऐवजी १ कि. संतुलित खाद्य देता येऊ शकते.

३) ५ कि. वाळलेला चारा, कडब्याच्या ऐवजी २ कि. संतुलित खाद्य देता येते.

संतुलित खाद्य (Balanced Concentrate) देण्याचे फायदे:

१) संतुलित आहारामुळे जनावरांचे शारीरिक पोषण उत्तमरित्या होते. आरोग्य उत्तम राहते. रोग प्रतिकारशक्ती वाढल्यामुळे जनावरे नेहमी आजारी पडत नाही.

२) वासरांची वाढ उत्तम होते. वासरे लवकर वयात येतात.

३) गाभण गाई - म्हशींची वेण्याची क्रिया सुलभ होते. व्याल्यानंतर वार लवकर व व्यवस्थित पडण्यास मदत होते. पोषण तत्त्वांच्या अभावामुळे गर्भपात होत नाही.

४) प्रजोत्पादन क्षमता वाढते.

५) दुग्धोत्पदनाची क्षमता वाढते, तसेच दुधाची प्रत सुधारण्यास मदत होते.

६) दुधाळ जनावर आपल्या क्षमतेनुसार दूध देते. अपेक्षित दुग्धोत्पादन मिळून आर्थिक फायदा होतो.

७) भाकड काळ कमी राहण्यास मदत होते.

८ ) मिथेन वायूचे प्रदूषण कमी होण्यास मदत होते.

* हे लक्षात असू द्यावे.

१) जनावरांना संतुलित खाद्य द्या. त्यामुळे जनावरांना शरीराकरिता आवश्यक सर्व पोषक घटके मिळतील. फक्त एका प्रकारची पेंड देऊन जनावरांच्या शरीर पोषणाबद्दल च्या सर्व गरजा पूर्ण होऊ शकत नाही.

२) संतुलित खाद्य ठराविक वेळेला द्यावे. त्यामध्ये ८ - १० तासांचे अंतर असावे.

३) संतुलित खाद्यात अचानक बदल करू नका. प्रत्येक जनावरांना वेगवेगळे खाद्य द्या.

४) जनावरांना कमी अथवा अधिक खाऊ घालू नका. जेवढे आवश्यक तेवढेच द्या.

५) दुधाळ गाई - म्हशींना १ लिटर दूध तयार करण्याकरिता १.५ ते २.५ लिटर पाणी लागते.

उदरनिर्वाहाव्यतिरिक्त लागणाऱ्या पाण्याच्या गरजेपेक्षा, दूध देणाऱ्या जनावरांना याप्रमाणे पाणी देणे आवश्यक आहे. म्हणून दुधाळ गाई - म्हशींना दिवसातून ४ - ५ वेळेस पाणी पाजा. उत्तम दर्जाच्या, स्वस्त खाद्य घटकांची निवड करावी.

७ ) बुरशीयुक्त खाद्य देऊ नये.