पपईस डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी म्हणजे संजीवनीच !

श्री. वसंत झुलाल पाटील,
मु. पो. शिरोड, ता. जि. धुळे.
मोबा. ९४२०६१६२४३माझ्याकडे ११ एकर शेती असून त्यामध्ये दरवर्षी ५ - ६ एकर कापूस, १।। - २ एकर पपई, २ एकर मका, १ एकर मिरची अशी पिके घेत असतो.

यामध्ये तैवान ७८६ पपईला गेल्या ५ - ६ वर्षापासून डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरत आहे. फेब्रुवारी ते १५ एप्रिलपर्यंतच्या काळात जेव्हा रान रिकामे असेल तेव्हा पपई लावतो. रोपे विकत आणल्यानंतर १५ दिवस पिशवीत तशीच ठेवतो आणि त्यावर ५ - ६ वेळा झारीने पाणी देताना त्यामध्ये जर्मिनेटर (५ लि. ला १० ते १५ मिली) मिसळतो. त्यामुळे १५ दिवसात रोपांच्या मुळ्या पिशवीतून बाहेर दिसू लागतात. त्यानंतर रोपे लावतो. सुरूवातीला आम्ही ६' x ५' वर लागवड करत होतो. मात्र ही लागवड जवळ - जवळ होत असल्याने फळ पोसत नाही, म्हणून अलिकडे ८' x ६' वर लागवड करतो. रोप लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी जर्मिनेटरचे ड्रेंचिंग करतो. त्यामुळे पांढऱ्या मुळ्यांना चालना मिळून रोपांची मर होत नाही व वाढ लवकर सुरू होते. १ महिन्याची लागवड झाल्यावर ट्रायकोडर्माचे (५ ग्रॅम /१ लि. पाणी) ड्रेंचिंग करतो. त्यानंतर २।। - ३ महिन्यांचे पीक झाल्यावर ह्युमिक अॅसिडचे ड्रेंचिंग करतो.

फवारणीमध्ये सप्तामृत वापरतो. पहिली फवारणी लागवडीनंतर १५ दिवसांचे पीक असताना २५० मिली सप्तामृत १०० लि. पाण्यातून फवारतो. त्यानंतर १ - १ महिन्याच्या अंतराने ५०० मिली सप्तामृताची १५० लि. पाण्यातून दुसरी फवारणी, ७५० मिली सप्तामृताची २०० लि. पाण्यातून तिसरी फवारणी आणि १ लि. सप्तामृताची २०० लि. पाण्यातून ४ थी फवारणी करतो.

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या पहिल्या २ फवारण्यांनी पपईची निरोगी वाढ होऊन तिसऱ्या फवारणीने फुलकळी लागते. चौथ्या फवारणीमुळे फुलगळ होत नाही व फळधारणा चांगली होऊन फळे पोसू लागतात. फळे साधारण नारळाच्या आकाराची झाल्यानंतर ५ वी फवारणी सप्तामृत १।। लि. ची २५० लि. पाण्यातून करतो. त्यामुळे फुगवण चांगली होते. त्यानंतर तोडे चालू झाल्यानंतर एक फवारणी अशा एकूण सप्तामृताच्या पपईला ६ फवारण्या करत असतो.

पपईसाठी लागवडीपुर्वी शेणखत ४ ट्रॉली/एकरी देतो. त्यानंतर लागवड केल्यावर १ महिन्यांनी डी.ए.पी. २ बॅगा, सुपरफॉस्फेट १० बॅगा देतो. त्यानंतर दुसऱ्या महिन्यात १०:२६:२६ च्या २ बॅगा आणि सुपर फॉस्फेट दाणेदार ६ बॅगा देतो. चौथ्या महिन्यात १०:२६:२६ च्या ३ बॅगा, सुपर फॉस्फेट दाणेदार ६ बॅगा व पोटेश ३ बॅगा असा डोस देतो आणि शेवटचा डोस ६ व्या महिन्यात मेग्नेशिअम सल्फेट २५ किलो, १०:२६:२६ च्या २ बॅगा याप्रमाणे एकूण खत मात्रा देतो. कल्पतरू खत वाहतूक खर्चामुळे देऊ शकत नाही.

साधारणपणे फेब्रुवारीची लागवड असल्यास १५ सप्टेंबरपर्यंत तोडे सुरू होतात. सुरूवातीस २ - ३ तोड्याला एकरी ५०० - ६०० किलो माल निघतो. त्यानंतर दर १२ ते १५ दिवसाला तोडे चालू असतात. त्यावेळी माल वाढून १।। - २ ते ३ टन माल प्रत्येक तोड्याला निघतो. या पद्धतीने पपई ४ महिने चालते.

प्रत्येक झाडापासून सरासरी १०० किलो माल निघतो. त्यातील ७० - ८० % माल बाजारभावाप्रमाणे विकतो. त्यानंतर राहिलेला बारीक माल चेरी (पानात खातात ती) करण्यासाठी फॅक्टरीवाले १ रू. ते १.१० रू./किलो ने नेतात.

सप्टेंबर - ऑक्टोबरमध्ये सुरूवातीस ७ ते ८ रू. किलोने जागेवरून व्यापारी फळे तोडून नेतात. नंतर नोव्हेंबरमध्ये ६-५-४ रू. ने घेतात. याप्रमाणे भाव कमी - कमी होत जातात. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीत तर ३-४ रू./किलो दराने पपई विकावी लागले. ही पपई व्यापारी दिल्ली, कलकत्ता, इंदोरला पाठवितात. उन्हाळ्यात पपईस डिमांड कमी होते. त्यामुळे मार्चपासून कोणी घेत नाही.

एकराला ६० ते ६५ हजार रू. एकूण खर्च येतो. एकूण १० टनाचे ५ ट्रक माल निघतो. सरासरी ५ रू. भाव धरला तरी २ लाख ५० हजार रू. मिळून खर्च वजा जाता पावणे दोन ते दोन लाख रू. राहतात.

चालू वर्षी देखील सव्वा एकरात ८' x ६' वर ४ फेब्रुवारी २०१४ ला पपई लावली आहे. वरील पद्धतीनेच व्यवस्थापन केले आहे. आतापर्यंत (१५ सप्टेंबर २०१४) पपईवर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या ५ फवारण्या झाल्या आहेत. प्लॉट पुर्ण निरोगी होता, मात्र मागील आठवड्यात सततधार पाऊस झाल्याने काही झाडांवर पिवळेपणा जाणवत आहे. तेव्हा सरांचा फोनवरून सल्ला घेताना आज सरांनी सांगितले, "६ व्या फवारणीत थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर, न्युट्राटोन प्रत्येकी १। ते १।। लि. आणि हार्मोनी ५०० मिली २०० लि. पाण्यातून फवारा." त्याप्रमाणे फवारणी करणार आहे. सध्या झाडांवर ४०-५० फळे लागलेली असून लहान फुले चालूच आहेत. ह्या बागेचा २० सप्टेंबर २०१४ ला माल चालू होईल.

१ एकर कांदा, १२.५ टन, १८०० रू./क्विंटल. २ लाख

१ एकर कांद्याला गेल्या हंगामात डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरले होते. फेब्रुवारी २०१४ ची लागवड होती. एकरी साधारण ४ किलो कांदा बी टाकायचे असते, मात्र आमच्या कडून ७ किलो बी टाकल्याने रोपे दाट झाली. त्यामुळे रोपाची काडी बारीक व कमजोर राहिली. असे रोप पुनर्लागवडीनंतर ५०% मेले. त्यामुळे तुटाळ झाली. त्याला कल्पतरू सेंद्रिय खत अगोदरचे २ गोण्या शिल्लक होते ते वापरले आणि डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या सप्तामृताच्या दोन फवारण्या केल्या होत्या. तर एवढ्यावर पीक चांगले आले. मे महिन्यात कांदा काढला, तर १२.५ टन उत्पादन मिळाले. तो कांदा डबल पत्तीचा, गोल्टी होता. आकाराने मध्यम पण एकसारखा असल्याने १८०० रू./ क्विंटल भावाने विकला. त्याचे एकरात २ लाख रू. झाले. मी 'कृषी विज्ञान' मासिकाचा पंचवार्षिक वर्गणीदार आहे. अंकातून आम्हाला विविध पिकांचे ज्ञान मिळते. शेतकऱ्यांनी विविध हंगामात डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने यशस्वी केलेले वेगवेगळे प्रयोग मासिकातून वाचून आम्हास प्रेरणा मिळते.