शेळी - गरीबाची गाय

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


शेळी पालन हा किफायतीशीर शेतीपूरक व्यवसाय म्हणून सिद्ध झालेला आहे. परंपरागत व्यवसायामध्ये गरीब व भूमिहीन शेतकरी यांच्याकडे गरीबाची गाय म्हणून मान्यता पावलेली शेळी आज समाजातील अनेक घटकांसाठी उपजीविकेचे व उत्पन्नाचे साधन ठरत आहे. म्हणून शेळी पालन व्यवसायासाठी उपलब्ध हमखास बाजारपेठ, दिवसेंदिवस वाढत असलेली माणसाची मागणी यांचा विचार करता व्यवसायिक तत्वावर शेळीपालन करण्याकडे लोकांचा कल वाढत चाललेला आहे. गेल्या काही वर्षापासून शेळी वळणारा या संज्ञेंची जागा एका कृषी औधोगीक व्यवसायाने घेतली आहे.

भारतात प्रामुख्याने शेळी पालन हे मांसासाठी केले जाते. अर्ध बंदिस्त शेळी पालनाने सर्व शेतकऱ्यांचे व व्यवसायिक तत्वावर शेळीपालन करणाऱ्या इतर वर्गाचे लक्ष वेधले असून उत्तम प्रतीचे मांस कमीतकमी दिवसात जास्तीत जास्त वजनाची करडे देणाऱ्या शेळ्यांची मागणी आज शेतकरी करतात. शेळीपालन उपेक्षित ग्रामीण किंवा डोंगराळ भागातील व्यवसाय न राहता शहरातील उद्योगपतीनीही आपली दृष्टी या व्यवसायाकडे वळवली आहे. देशाची परकीय चलनाची गरज भागवून गरीबांची गाय म्हणून मान्यता पावलेली शेळी कुबेराची धनलक्ष्मी होऊ शकते.

* महाराष्ट्रातील शेळ्यांच्या जाती : महाराष्ट्रामध्ये उस्मानाबादी, संगमनेरी, बेरारी, कोकण कन्याल आणि सुरती जातीच्या शेळ्या आढळतात. राज्यामध्ये १५ - २० टक्के शेळ्या जातीवंत असून उर्वरीत शेळ्या कोणत्याही जात नसलेल्या म्हणजे विजातीय / नॉन -डिस्क्रिप्ट प्रकारच्या शेळ्या आहेत.

१) उस्मानाबादी शेळी:

उस्मानाबादी शेळी ही राज्यातील शेळ्यांची प्रमुख जात असून ती नावाप्रमाणे उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी आणि त्या लगत असणाऱ्या अहमदनगर सोलापूर, कर्नाटक, राज्यातील बिजापूर आणि आंध्र प्रदेशाच्या जिल्ह्यामंध्ये आढळतात. ह्या शेळ्यामधील मांस आणि दुध हे उभय गुण असून त्या दरवर्षी नियमाने वितात, ह्या शेळ्यामध्ये ५० ते ५५ टक्के जुळे ३- ५ टक्के तिळे करडांना जन्म देण्याची क्षमता आहे. तर काही वेळा ४ - ५ ते ७ करडांना जन्म दिल्याची देखील उदाहरणे आहेत. ह्या शेळ्या सरासरी २१० दिवसांच्या कालावधीमध्ये १८० किलो दुध देतात.

२) संगमनेरी शेळी :

ह्या प्रामुख्याने अहमदनगर मधील संगमनेर तालुका आणि त्याला लागून असलेले पुणे आणि नाशिकच्या जिल्ह्यांमध्ये आढळतात. ह्या शेळ्यांमध्ये मनास आणि दूध असे उभयगुण असून त्यांच्यामध्ये जुळ्याचे प्रमाण ५० - ५१ टक्के, तिळे ३ - ४ टक्के आणि ४० - ४५ टक्के एकेक करडे देण्याचे प्रमाण आढळते. संगमनेरी शेळया १६८ दिवसाच्या कालावधीमध्ये ८५ किलोपर्यंत दुध देतात.

३) सुरती शेळी :

ह्या शेळ्या गुजरात राज्याच्या सुरत जिल्ह्याला लागून असलेल्या महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, जिल्ह्यामध्ये आढळतात. ह्या १६५ दिवसाच्या वेतामध्ये १५० किलो दूध देतात.

४) बेरारी :

ह्या जातीच्या शेळ्या प्रामुख्याने नागपूर, चंद्रपूर, वर्धा जिल्ह्यामध्ये आढळतात. ह्या शेळ्या मांसासाठी प्रसिद्ध असून ह्या सरासरी दिवसाला ५०० - ७०० मिली दुध देतात.

५) कोकण कन्याल :

ह्या जातीच्या शेळ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग, मालवन परिसरामध्ये आढळतात. ह्या शेळ्यामध्ये जुळे देण्याची क्षमता ३४ - ३७ टक्के आढळते आणि एका वेतामध्ये सरासरी ६० किलो दुध देतात.

* शेळ्यांचे प्रजनन :

शेळी साधारणतः वयाच्या ७ ते १० महिन्यात माजावर येते. पण एक वर्ष पुर्ण वयाच्या शेळीसच फळवावे, जेणेकरून जोमदार करडे पैदा होतील व त्यांचे पोषणाकरीता शेळी पुरेसे दूध देऊ शकते. शेळ्या पावसाळ्यात जून - जुलै, हिवाळ्यात ऑक्टोबर - नोव्हेंबर आणि उन्हाळ्यात मार्च - एप्रिल या काळात फळतात. शेळ्या दर १८ ते २० दिवसात माजावर येतात, गर्भकाळ साधारण ५ महिन्याचा असतो. शेळी १५ ते १६ महिन्यात दोनदा विते.

* गाभण काळात शेळीची घ्यावयाची काळजी :

* शेळीला उंच सखल भागात चराई करण्यास पाठवू नये, तिला कमीत कमी थकवा येईल अशी काळजी घ्यावी.

* कळपातील इतर शेळ्यांपासून वेगळे ठेवावे जेणेकरून तिची निगा व पोषण व्यवस्थितरित्या करता येईल.

* गर्भपात झालेल्या शेळ्यांसोबत गाभण शेळीचा संपर्क टाळावा.

* स्वच्छ पिण्याचे पाणी मुबलक उपलब्ध राहील याकडे लक्ष द्यावे.

* शेळीचे उन्हापासून तसेच रात्रीच्या थंडीपासून संरक्षण करावे.

* करडयांचे संगोपन :

नविन जन्मलेल्या पिलांना त्यांच्या आईचे दूध (चीक) जन्मल्यानंतर १- २ तासांच्या आत पाजवावे. या कच्चा दुधात प्रथिने, जीवनसत्वे आणि क्षार यांचे प्रमाण जास्त असते. रोगप्रतिकारक शक्तीदेखील असते. करडांना अडीच महिन्यापर्यंत दूध पाजविणे आवश्यक आहे. करडे दीड महिन्याची झाल्यावर त्यास थोडा कोवळा चारा देण्यास सुरुवात करावी. अडीच महिन्यानंतर हळुहळु दुधाचे प्रमाण कमी करून पुर्ण बंद करावे. तीन महिन्यानंतर करडे त्याच्या आईपासून पुर्ण वेगळी करावीत.

* शेळ्यांची निगा :

शेळ्यांना सतत स्वच्छ, थंड पाण्याचा पुरवठा करण्यात यावा, साधारणपणे शेळीच्या प्रत्येक किलो वजनामागे १५० मिली एवढी रोजची पाण्याची गरज असते. सर्वसाधारणपणे ४० किलो वजनाच्या शेळीला ५ ते ६ लि. पाणी दररोज लागते. दुध देणाऱ्या शेळ्या मात्र दर लिटर दुधामागे १.५ लि. पाणी जास्त पितात. शेळ्यांना विविध प्रकारचा झाडपाला आवडतो. झाडांची कोवळी पाने, कोवळ्या फांद्या व शेंगा त्या आवडीने खातात. शेळीला तिच्या वजनाच्या ३ - ४ टक्के शुष्क पदार्थ खाद्यातून मिळणे आवश्यक आहे. या दृष्टीने एका प्रौढ शेळीस दररोज साधारण ३ ते ४ किलो हिरवा चारा ७५० ग्रॅम ते १ किलो वाळलेला चारा व प्रथिनांच्या पुर्ततेसाठी २०० - २५० ग्रॅम संतुलित आहार प्रतिदिन द्यावा.

प्रत्येक शेळीस गोठ्यात १० चौ. व मोकळी २० चौ. फुट जागा असावी. ३० x २० फुटाच्या गोठ्यात ६० शेळ्या चांगल्या ठेवता येतात. गोठ्याच्या दोन्ही बाजूस तितकीच जागा ठेवून कुंपण घालावे. गोठ्याची लांबी पुर्व - पश्चिम असून मध्यभागी गोठ्याचे छप्पर उंच ठेवावे व दोन्ही बाजूस उतरते असावे. गोठ्याच्या आत चारा टाकण्यासाठी जमिनीपासून १ ते १।। फुट उंचीवर गव्हाण असावी. पाण्याची व्यवस्था गोठ्याच्या बाहेरील हौद किंवा सिमेंटचे अर्धेपाईप ठेवून करावी. बोकडांचा गोठा वेगळा असावा.

शेळ्यांचे लसीकरणाचे वेळापत्रक

अ. क्र.   लसीचे नाव   लसीकरणाचा महिना   लस मात्रा  प्रतिकार क्षमता
टिकण्याचा कालावधी  
शेरा  
१   पीपीआर   डिसेंबर - जानेवारी   १ मिली कातडी खाली   ३६ महिने    
२   आंत्रविषार   एप्रिल - मे (मान्सुन पूर्व ऑक्टोबर - नोव्हेंबर (मान्सून पश्चात)   १ मिली कातडी खाली बुस्टर मात्रा १५ दिवसांनी   १२ महिने    
३   लाळखुरकत   एप्रिल व ऑक्टोबर वर्षातून २ वेळा   १ मिली स्नायुमध्ये   ६ महिने   फक्त रोगप्रवण भागात  
४   घटसर्प   मे - जुन (मान्सून पूर्व)   अॅलम प्रेसीपीटेड १ मिली कातडी खाली   ६ महिने   फक्त रोगप्रवण भागात  
५   फऱ्या   एप्रिल (मान्सून पूर्व)   १ मिली कातडी खाली   १२ महिने   फक्त रोगप्रवण भागात  
६   अथ्रॅकस   एप्रिल (मान्सून पूर्व)   ०.५ मिली कातडी खाली   १२ महिने   फक्त रोगप्रवण भागात  


टीप : लसीकरण पशुवैद्यांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.