लिंबूवर्गीय पिकावरील महत्त्वाचे रोग व एकात्मिक व्यवस्थापन

डॉ. मीना कोचे
व्ही.व्ही. कापसे व डॉ. राजेंद्र गाडे वनस्पती रोगशास्त्र विभाग, आनंद निकेतन, कुषी महाविद्यालय वरोरा, जि. चंद्रपूर - ४४२९१४


महाराष्ट्रात डिंक्या, कोरडी मुळसड, फांद्या वाळणे, फळगळ व फळसड इ. बुरशीजन्या ग्रीनिंग व देवी हे जीवाणूजन्य आणि ट्रिस्टीझा, मोझोक, रिंगस्पॉट व एकसोकॉरंटीस हे विषाणूजन्या रोग आढळून आलेले आहेत. ह्या प्रमुख रोगाची कारणे, लक्षणे आणि उपाययोजना या लेखात दिल्या आहेत.

डिंक्या : डिंक्या हा रोग मोसंबी, संत्रा व कागदी लिंबावर येणारा प्रमुख बुरशीजन्या रोग आहे. लिंबुवर्गीय बागेचा ऱ्हास होण्यामध्ये ह्या रोगाचा मोठा वाटा आहे. ह्या रोगाची लागण झाल्यामुळे झाडांची उत्पादकता कमी होते व रोगाच्या तिव्रतेनुसार झाडांचा ऱ्हास होतो. त्यामुळे आर्थिक नुकसान होते.

रोगाची कारणे : हा रोग फायटोफ्थोरा पालमिव्होरा, फायटोफ्थोरा सिट्रीफ्थोरा व फायटोफ्थोरा निकोशियाना या प्रमुख बुरशीमुळे होतो. या बुरशीचे वास्तव्य जमिनीमध्येच असते. या बुरशीचे जीवाणू व गाठी उष्ण हवामानातही जमिनीत तग धरून राहतात व पावसाळ्यामध्ये ओलसर वातावरणात बीजपिशवी तयार होऊन त्यातून अस्पोअर्स बगीचातील पाण्यात पोहत राहतात व पसरतात. हे झाडच्या मुळांच्या उतीत प्रवेश करून धाग्यासारख्या बुरशीच्या तंतुरूपात विकसित होऊन पुढे पुन्हा नवी पिढी तयार होते. अशा प्रकारे जोपर्यंत मातीत बीज आहेत, तोवर या रोगांची निर्मिती ओलसर वातावरणात सुरच राहते.

लक्षणे : ह्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे झाडाच्या बुंध्याची साल फाटून त्यातून डिंक स्त्रवतो, त्यामुळे त्याला 'डिंक्या' हे नाव आहे. त्याचा रोपे व बागेरतील झाडांना प्रादुर्भाव होतो. रोपवाटिकेतील रोपाच्या मुळांना रोगाची लागण होऊन मुळे कुजतात. त्यामुळे झाडांची वाढ खुंटते, पाने पिवळी पडून गळतात. रोगाची तीव्रता वाढल्यावर जमिनीलगत खोडे कुजतात व रोपे कोलमडून मरतात रोगग्रस्त पण न मेलेल्या रोपट्याच्या खोडावर डिंक स्त्रवतो.

बागेमधील झाडांची तंतुमय मुळे, जमिनीलगतचे खोड व सोटमुळे खोड, फांद्या, झाडाच्या जमिनीलगतच्या फांद्यावरील पाने व फळे यांना रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. प्रत्येक प्रदुर्भावीत भागावर दिसणारी लक्षणे वेगळी असतात. तंतुमय मुळे, जमिनीलगत खोड व मुळांना प्रादुर्भाव जमिनीखाली होत असल्यामुळे लवकर लक्षात येत नाही. पण खोड, फांद्या व फळे यावरील प्रादुर्भाव लवकर लक्षात येतो. फळे सोडून झाडांच्या कोणत्याही भागावर प्रादुर्भाव झाला तरी त्याची लक्षणे पानाच्या शीरा पिवळसर होऊन दृष्य होते. पुढे पिवळेपणा वाढून पानगळ होते व फांद्या शेंड्याकडून खाली वाळतात व शेवटी रोगाच्या तीव्रतेनुसार झाडाचा ऱ्हास होतो.

तंतुमय मुळास प्रादुर्भाव झाल्यामुळे, ती कुजतात व त्यांची साल सहज अलग होते. मुळे सडल्यामुळे अन्न व पाणी शोषणाच्या क्रियेत अडथळा निर्माण होतो. त्याचा परिणाम पाने पिवळी पडून गळतात व फांद्या शेंड्याकडून मरू लागतात. झाडाची सर्व बाजूची मुळे सडली तर झाडे खुरटी राहून, पाने गळतात व झाडांचा ऱ्हास लवकर होतो. जमिनीलगत खोड व मुळांना लागण झाली तर त्यांची साल सडू लागते. त्यावरून जमिनीत बुरशीची वाढ झालेली आहे असे समजते. पुढे जमिनीलगत खोडाची साल चोहोबाजूने सडून, त्याची पानावर लक्षणे दिसून झाडांचा ऱ्हास लवकर होतो. खोडावर व फांद्यावर लागण झाल्यास त्या ठिकाणापासून डिंकाचा स्त्राव सुरू होतो. काही वेळा खोडावर स्त्रावांमुळे तेलकट डाग दिसतात. प्रादुर्भावीत खोडे व फांद्यावरील साल कुजते. नंतर ती कठीण होते. ती निरोगी सालीपासून वेगळी होते. निरोगी सालीच्या कडा जाड होतात. त्यामुळे प्रादुर्भाव पसरण्यास अटकाव होतो.

पावसाळ्यात जमिनीलगतच्या फांद्यावरील पाने व फळांना ह्या बुरशीची लागण झाली तर पाने करपतात व फळे सडून गळतात. फळ सडीस 'ब्राऊन रॉट' असे म्हणतात.

प्रसार : ह्या बुरशीचा प्रादुर्भाव जमिनीद्वारे होतो. रोपवाटिकेतील रोगग्रस्त रोपाद्वारे हा रोग बागेत येतो. अशा प्रसारास प्राथमिक प्रसार असे म्हणतात. बागेत रोगग्रस्त झाडाबरोबर आलेली बुरशी वाढून, निरोगी झाडांना प्रादुर्भावीत करते. त्यास दुय्य्स प्रसार असे म्हणतात. हा प्रसार पावसाचे व भिजवणीच्या प्रवाहीत पाण्याद्वारे होतो. तसेच पावसाच्या थेंबामुळे उडणाऱ्या मातीच्या कणास झुस्पोअर्स असतात, ते खोडावर, फांद्यावर जमिनीलगतच्या फांद्यावरील पाने व फळावर पडून त्यांना प्रादुर्भाव होतो.

रोगास अनुकूल घटक:

१) रोगाला बळी पडणाऱ्या मातृवृक्षाचा खुंट म्हणून वापर.

२) रोगग्रस्त झाडाच्या बुडाचा डोळाबांधणीसाठी वापर.

३) कमी उंचीवर डोळा बांधणे.

४) बगीचात, वाफ्यात बराच काळ पाणी साचून राहणे व त्याचा संबंध झाडाच्या बुंध्याशी येणे.

५) रोपवाटिकेसाठी तीच ती जमीन वारंवार वापरणे.

६) रोगग्रस्त, जुन्या बागीचाशेजारीच रोपवाटिका असणे.

डिंक्या रोगाच्या बंदोबस्ताकरीता खालील उपाययोजना अमलात आणावी.

१) फळबाग भारी जमिनीत नसावी.

२) कलमाचा खुंट शक्यतो रंगपूर लिंबू जातीचा असावा.

३) कलमयुतीचा भाग जमिनीच्या वर असावा.

४) डोळा साधारणत : ३० से.मी. उंचीवर बांधलेला असावा.

५) ओलीत करतांना दुहेरी आळे पद्धतीचा वापर करावा.

६) पाण्याचा उत्तम निचरा ठेवावा.

७ ) ज्या ठिकाणाहून डिंक ओघळतो तेथील साल झाडाच्या आतील भागास इजा नाही अशा प्रकारे पटाशीद्वारे खरवडून काढावी. नंतर १% पोटॅशियम परमँगनेट या द्रावणाने धुऊन काढावी व बोर्डोमलम लावावे.

८ ) तरीही प्रादुर्भाव आढळल्यास जखमेवर पावसाळ्यापुर्वी व पावसाळ्यानंतर ५० ग्रॅम मेटॅलॉफ्झिल १ लिटर पाण्यात मिसळून हे द्रावण लावावे.

९ ) संपूर्ण झाडावर फॉसीटिल ए. एल. २० ग्रॅम/१० लिटर पाणी या द्रावणाची झाडाच्या वयानुसार फवारणी करावी.

१० ) पावसाळ्यापुर्वी व पावसाळ्यानंतर बोर्डोमलम जमिनीपासून १ मीटर उंचीपर्यंत लावावे.

ट्रिस्टीझा : हा एक विषाणूजन्य रोग असून, लिंबुवर्गीय झाडाचा ऱ्हास होण्यामध्ये ह्याचा मोठा वाटा आहे. रोगाची झाडास लागण झाल्यानंतर विषाणू नष्ट करण्यासाठी अजून उपाय सापडलेला नाही. पण एकात्मिक पद्धतीने रोगाचे व्यवस्थापन करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित झालेले आहे.

नुकसान : भारतासह इतर अनेक देशात ह्या रोगामुळे लिंबुवर्गीय फळबाग संपूर्णपणे उध्वस्त झालेल्या आहेत. त्यामुळे बागायतदाराचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे.

रोगाचे कारण : हा रोग ट्रिस्टीझा नावाच्या विषाणूमुळे होतो. हा विषाणू झाडाच्या सालीतील फ्लोयम नावाच्या उतीस प्रादुर्भावीत करतो, त्यामुळे मुळास अन्न पुरवठा होत नाही व मुळे अशक्त होऊन अकार्यक्षम होतात. त्यामुळे झाडास पाण्याचा ताण पडून झाडे ऱ्हास पावतात.

रोगाची लक्षणे : पिकांची जात, विषाणूची प्रजात व हवामान इ. कारणामुळे ह्या रोगाच्या लक्षणामध्ये मोठ्या प्रमाणावर विविधता आढळून येते. प्रादुर्भावीत झाडांच्या पानावर येणारे लक्षण स्पष्ट दिसेल असे नसते. परंतु पानांचा हिरवागारापणा व चमक कमी होऊन संपूर्ण झाड मलुल झालेले दिसते. अशा झाडाची पाने संपूर्णपाने थोड्या कालावधीत गळून जातात व झाडांचा ऱ्हास होतो. ऱ्हास झालेल्या झाडावरील फळे न गळता लटकलेली राहतात. दुसऱ्या प्रकारात प्रादुर्भावीत झाडाची पाने मलुल होऊन, ते शीरासहीत पिवळी पडून हळूहळू गळतात. त्यामुळे झाडावरील पाने विरळ होतात. फांद्या शेंद्याकाधून मरण्यास सुरुवात होते व झाडांचा ऱ्हास मंद गतीने होतो. रोगग्रस्त झाडांना निरोगी झाडापेक्षा अधिक फुले व फळे लागतात. ते आकाराने लहान राहून अकाली पिवळी पडतात. पण गळत नाहीत. रोगग्रस्त होऊन ऱ्हास पावलेल्या झाडाच्या खोडावर खड्डे पडलेल दिसतात.

जीवनक्रम : हा संपूर्ण परोपजीवी विषाणू असून तो लिंबूवर्गीय पिकांना प्रादुर्भावीत करून, त्या पिकांची झाडे जिवंत असेपर्यंत त्यांच्या फ्लोअम पेशीमध्ये वाढतो. झाडाचा ऱ्हास होण्यापुर्वी मावा या किटकाद्वारे ह्याचे संक्रमण निरोगी झाडावर होते व रोगाची लागण होते. अशा तऱ्हेने ह्या विषाणूच्या पिढ्या लिंबूवर्गीय पिकांवर वाढतात.

प्रसार : ह्या रोगाचा प्रसार दोन प्रकारे होतो. प्राथमिक प्रसार रोगापासून रोगग्रस्त रोपाद्वारे होतो. अशा रोगग्रस्ट रोपापासून बागेतील निरोगी झाडांना माव्यामुळे होणाऱ्या प्रादुर्भावास दुय्यम प्रसार म्हणतात. तपकिरी व काळा मावा ह्या रोगाचा प्रसार बागेत फार झपाट्याने करतात. तसेच रोपावटिकेत व बागेत वापरात येणाऱ्या अवजाराद्वारे सुद्धा रोगाचा प्रसार होतो.

व्यवस्थापन : ह्या रोगांचे एकात्मिक पद्धतीने क्वारंटाईन, प्रमाणिकरण, निर्जंतुकीकरण, रोगवाहक मावा किडीचे नियंत्रण व प्रतिसंरक्षण इ. घटकाचा वापर करून उत्तमरित्या व्यवस्थापन केले जाऊ शकते.

१) कायद्याद्वारे दुसऱ्या देशातील ट्रिस्टीझाग्रस्त रोपे किंवा रोपे करण्यासाठी लागणाऱ्या कळ्या आपल्या देशात आणण्यासाठी प्रतिबंध करणे.

२) निरोगी रोपे तयार व्हावेत महणून मातृवृक्ष रोगमुक्त असल्याचे प्रमाणिकरण व त्यापासून तयार झालेली रोपे रोगमुक्त असल्याचे प्रमाणिकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच रोपे बंदिस्त मावा विरहीत रोपवाटिकेत करणे गरजेचे आहे.

३) रोप तयार करण्यासाठी व बागेत वापरात येणाऱ्या औजारांचे निर्जंतुकीकरण सोडीयम हायपोक्लोराईड च्या १ ते २ टक्के द्रावणात करावे.

४) ट्रिस्टीझा वाहक मावा किडींचे आंतरप्रवाही कीटकनाशकांचा वापर करून नियंत्रण करावे. फवारणीसाठी प्रत्येक वेळी वेगळे औषधे वापरावे.

ग्रीनिंग : हा रोग लिबरीबॅक्टर आशीयाटिक्स नावाच्या अतिसुक्ष्म जीवाणूमुळे होतो. त्यामुळे मुळांना अन्न पुरवठा होत नाही. मुळे कमजोर होऊन झाडाच्या जमिनीवरील भागास पाणी व अन्न योग्यरितीने पोहोचविण्यास असमर्थ होतात. त्यामुळे झाडे ऱ्हास पावतात.

लक्षणे : ह्याचे प्रथम लक्षण प्रादुर्भावीत पानावर चट्ट्याच्या रूपाने दृष्य होते. हे पानाच्या दोन्ही बाजूस कमी अधिक प्रमाणात असतात. रोगग्रस्त काही पानावर एक किंवा अधिक इंग्रजीतील 'व्ही' आकाराच्या खाचा तयार होतात. काही वेळा पानाच्या खालच्या बाजूच्या शिरा फुगतात. त्यानंतर शिरांमधील पानाचा भाग पिवळा होण्यास सुरवात होते. हा पिवळेपणा सुद्धा मध्यशीरेच्या दोन्ही बाजूस सारखा नसतो. पाने शेवटी संपूर्णपणे पिवळी होतात. त्यापैकी बऱ्याच पानावर अनेक हिरवे ठिपके आढळून येतात. रोगट पाने आकाराने लहान राहून ती फांद्यावर उभट सरळ होतात. फांद्याची कांदे आखूड झाल्यामुळे पानाचा सौम्य गुच्छ झालेला दिसतो. शेवटी रोगग्रस्त पाने फांद्याच्या शेंड्याकडून गळण्यास प्रारंभ होतो व फांद्या शेंड्याकडून वाळण्यास सुरुवात होते. झाडांची एक किंवा एका पेक्षा अधिक फांद्या किंवा संपूर्ण झाड रोगग्रस्त होऊ शकते. रोगग्रस्त झाडे खुरटी राहतात व लागण झाल्यापासून ५ ते ८ वर्षात त्यांचा ऱ्हास होतो. रोगग्रस्त झाडास लागलेली फुले व फळे अकाली गळून जातात. फळे आकाराने लहान राहून त्यांची वाढ असमतोल होते. फळातील बिया काळ्या पडून नष्ट होतात. फळातील रसाची चव कडू होते. रोगग्रस्त झाडावरील फळांचा उन्हाकडील भाग पिवळा व सावलीतील किंवा पानात झाकलेला भाग गडद हिरवा राहतो. फळांच्या गडद हिरवेपणामुळे ह्या रोगास 'ग्रीनींग' असे म्हणतात.

प्रसार : प्राथमिक लागण रोगग्रस्त मातृवृक्षापासून तयार केलेल्या रोपांद्वारे होते. अशा रोगग्रस्त रोपाची शेतात लागवड झाल्यानंतर त्यापासून रोगाचा प्रसार 'सायला' नावाच्या किडीद्वारे मोठ्या प्रमाणात होतो. ह्या किडीची, पिले जीवाणू घेतात व प्रौढ झाल्यावर निरोगी झाडास रोगाची लागण करतात. रोगग्रस्त प्रौढ त्यांच्या जीवनभर रोगाचा प्रसार करीत असतो. ह्या किडीशिवाय बागेत व रोपवाटिकेत वापरण्यात येत असलेल्या औजाराद्वारेही ह्या रोगाचा प्रसार होतो.

व्यवस्थापन : ह्या रोगाचे खालील घटकांचा एकात्मिक पद्धतीने अवलंब करून व्यवस्थापन केल्यास, रोग नियंत्रणात राहून रोगग्रस्त झाडाचे आयुष्य ५ ते ८ वर्ष वाढविणे शक्य आहे.

१) क्वारंनटाईन : रोगग्रस्त रोपे किंवा रोगग्रस्त झाडांचे डोळे, रोगमुक्त राज्यात किंवा देशात आणणे व नेणे ह्यावर कायद्याचे प्रतिबंध करणे.

२) रोगमुक्त रोप तयार करणे : ह्यासाठी रोपे बंदिस्त रोपवाटिकेत तयार करणे गरजेचे आहे. ह्याशिवाय मातृवृक्ष व तयार होणारी रोपे रोगमुक्त असल्याचे प्रमाणित करणे व त्यासाठीच्या तांत्रिक सोयी उपलब्ध करणे आवश्यक आहे.

३) छाटणी : रोगग्रस्त फांद्या ३० ते ४० से. मी. निरोगी फांदीसह छाटाव्यात, झाड संपूर्ण रोगग्रस्त असेल तर काढून नष्ट करावे.

४) सायालाचे नियंत्रण : प्रत्येक नवीन पालवी फुटण्याच्या वेळी १० ते १५ दिवसाच्या अंतराने कोणत्याही अंतरप्रवाही कीटकनाशकाच्या दोन फवारण्या कराव्यात. प्रत्येक फवारणीत एकच कीटकनाशक वापरू नये.

५) टेट्रासायक्लीन ६०० पी. पी. एम. (६ ग्रॅम/१० लि. पाण्यात) ची जानेवारी ते मार्च महिन्यात फवारणी करावी.

देवी : देवी हा जीवाणूजन्य रोग असून, ह्याचा प्रादुर्भाव प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर लिंबू पिकावर महाराष्ट्रात होतो. मोसंबी व संत्रा पिकावर ह्याचा प्रादुर्भाव अगदी नगण्य आढळून येतो.

रोगाचे कारण : हा रोग 'झॉंन्थोमोनास अॅक्झोनोपोडीस' पीव्ही सीट्री ह्या अणूजीवामुळे होतो.

रोगाची लक्षणे : ह्या रोगाची लक्षणे पाने, कोवळ्या फांद्या आणि फळावर दिसतात. देवीच्या फोडाची सुरुवात अतिशय लहान ठिपक्याने होते ते आकाराने ३ ते १० मिमी पर्यंत वाढतात. फोड सुरुवातीस वर्तुळाकार असतात. मोठे झाल्यावर ते आकाराने अनियंत्रीत होतात. फोडाचा आकार पिकाची जात, पानाचे वय व हवामानावर अवलंबून असतो. कागदी लिंबावरील फोड आकाराने मोठे व स्पष्ट दिसणारे असतात. फोडांच्या भोवती पिवळी वर्तुळे तयार होतात. फोडांचे संख्या जास्त झाल्यास ती एकमेकात मिसळून मोठी व अनियमित आकाराचे चट्टे तयार होतात. अशी तीव्र रोग असलेली पाने व फळे अकाली गळतात. कोवळ्या फांद्या शेंड्याकडून खाली वाळत जातात. फळावर आलेली फोडे फक्त फळाच्या सालीवर असतात. त्यांचा फळाच्या फोडी व रसाच्या गुणवत्तेवर काहीही परिणाम होत नाही.

जीवाणूचा जीवनक्रम : जीवाणू रोगग्रस्त पाने, फांद्या व फळे जोपर्यंत झाडावर असतात तोपर्यंत त्यात जीवंत राहतात. जमिनीवर पडलेल्या रोगग्रस्त झाडाच्या अवशेषामध्ये ते काही महिने जिवंत राहतात. त्यामुळे ह्या रोगाचा प्रसार जमिनीद्वारे होत नाही. रोगग्रस्त झाडापासून निरोगी झाडांना लागण होते. अशा तऱ्हेने जीवाणूचा जीवनक्रम चालू राहतो.

रोगाचा प्रसार : रोगाचा प्रसार प्रामुख्याने पावसाचे थेंब, पाने पोखरणारी अळी व अवजारांद्वारे होतो.

१) रोगग्रस्त झाडावर पाऊस पडून उडणारे थेंब, ज्यात जीवाणू असतात, वाऱ्याबरोबर वाहत जाऊन शेजारील झाडावर पडून रोगाचा प्रसार होतो.

२) पाने खाणारी अळी ह्या रोगाचा प्रसार करते.

३) रोपवाटिकेत किंवा बागेत वापरत येणाऱ्या औजाराद्वारे सुद्धा ह्या रोगाचा प्रसार होतो.

४) रोगग्रस्त रोपवाटिकेत काम करणाऱ्या मजुरांद्वारे सुद्धा रोगाची लागण होऊ शकते.

हवामान : ह्या रोगास पावसाळ्यातील उष्ण, दमट, व ढगाळ व आर्द्रतायुक्त हवामान अतिशय अनुकूल असते.

रोगाचे व्यवस्थापन :

१) निरोगी रोपे लागवडीस वापरावीत.

२) रोगग्रस्त पाने, फळे वेचून नष्ट करावीत. तसेच रोगग्रस्त फांद्याची छाटणी करून त्या नष्ट कराव्यात

३) पावसाळा सुरू होताच कॉपर ऑक्सिक्लोराईद (३० ग्रॅम ) अधिक स्ट्रेप्टोसायक्लिन (१ ग्रॅम) १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे किंवा १ टक्का बोर्डोमिश्रणाची फवारणी करावी. रोगाची तीव्रता व पावसाच्या प्रमाणानुसार १ महिन्याच्या अंतराने ४ फवारण्या पावसाळ्यात कराव्यात. नवीन पालवी आल्यावर सुद्धा फवारण्या कराव्यात.

४) पाने पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण करावे.