संत्र्यावरील किडी व त्यांचे व्यवस्थापन

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


१) संत्र्यावरील काळीमाशी (कोळशी) - अल्युरोकॅन्थस वोगलुमी अॅश्बी (अल्युरोडिडी, होमोप्टेरा)

नुकसानीचे स्वरूप : काळीमाशी ही संत्र्यावर नियमित येणारी कीड आहे. प्रौढ माशी व तिची पिल्ले कोवळ्या पानातील अन्नरस शोषण करतात व अंगातून मधासारखा चिकट गोड पदार्थ उत्सर्जित करतात. हा द्रवपदार्थ खालील पानांच्या वरच्या पृष्ठभागावर पडून त्यावर काळी बुरशी (कॅपनोडियम सिट्री) झपाट्याने वाढते. बुरशीमुळे पूर्ण बाग काळीशार दिसते. यालाच 'कोळशी' असे म्हणतात. कोळशीमुळे प्रकाशसंश्लेशनाची क्रिया मंदावते. किडीद्वारे रसशोषणाच्या अतिरेकाने झाडे दुर्बल बनतात व फळधारणाही कमी होते. फळे बेचव होतात व काळ्या बुरशीमुळे काळपट पडतात. अशा फळांना बाजारात योग्य मोबदला मिळत नाही. मध्य भारतात सातव्या दशकाच्या उत्तरार्धात, ८ व्या दशकात व ९ व्या दशकाच्या सुरूवातीपर्यंतच्या तब्बल १० -१५ वर्षाच्या काळात काळ्या माशीच्या भयंकर प्रकोपामुळे येथील संत्राउद्योग मोडकळीस आला होता.

पाच ते दहा प्रौढ काळ्यामाशा प्रती वर्ग से.मी. किंवा ५० ते १०० प्रथमावस्था प्रती पान, एवढी किडींची संख्या पानातील नत्राचे प्रमाण २.२ टक्क्यापेक्षा कमी आणण्याकरिता पुरेशी आहे आणी जे (पानांत २.२% नत्राचे प्रमाण असणे) उत्तम फळधारणेकरिता आवश्यक आढळून आले आहे.

जीवनक्रम : वर्षभरास काळ्या माशीच्या एकापाठोपाठ तीन पिढ्या वेगवेगळ्या तीन हंगामात उदा. आंबिया, मृग व हस्तात उपजतात आणि ऋतुमानानुसार त्यांचा जीवनक्रम अनुक्रमे १०५, १२० आणि १३५ दिवसात पुर्ण होतो. आंबियातील पिढींचे प्रौढ (माशा) फेब्रुवारी - मार्च, मृगाचे जून - जुलै आणि हस्ताचे ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यात बाहेर येतात आणि त्यानंतर दीड ते दोन महिने ते कार्यरत असतात. मादी नवीन पानांच्या खालच्या बाजूला तीन वलयात अंडी घालते. प्रत्येक वलयांमध्ये ७ ते २७ अंडी असतात. साधारणत: एका पानावर १५० वलयामध्ये अधिकतम ३००० अंडी असू शकतात. मार्च - एप्रिल आणि जून - जुलै महिन्यात अंडी उबवण्याकरिता २ ते ४ आठवड्याचा कालावधी लागत असून नोव्हेंबर - डिसेंबर मधील कमी तापमानामुळे एका महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागतो. पिल्लावस्था ६ ते १० आठवड्याचा कालावधी घेते तर कोषावस्थेचा कालावधी साधारणत: आठ आठवडेइतका असून मी (आंबिया), ऑगस्ट (मृग) आणि जानेवारी (हस्त) महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यापर्यंत असतो.

नियंत्रण :

१) स्प्लेंडर २ मिली किंवा मोनोक्रोटोफॉस १ मिली किंवा अॅसिफेट ०.८ मिली किंव फॉसॅलोन १.५ मिली किंवा डायमेथोएट २ मिली किंवा फॉस्फॅमिडॉंन ०.७ मिली प्रति लि. पाण्यामध्ये घेऊन पानांच्या खालच्या बाजूने संपुर्ण झाडावर फवारणी करावी. दुसरी फवारणी पंधरा दिवसानंतर वरीलपैकी कोणतेही एक किटकनाशक किंवा निंबोळी तेल १० मिली प्रति लिटर पाण्यात घेऊन करावी.

२) संत्र्याव्यतिरिक्त ही कीड पेरू, चिकु व डाळींब या झाडावर सुद्धा येत असल्यामुळे शक्यतोवर अशा झाडांची लागवड संत्राबागेशेजारी करू नये.

किटकनाशकांच्या फवारणीची वेळ : काळ्या माशीची फक्त पहिली व दुसरी पिल्लावस्थाच किटकनाशकांना बळी पडत असल्यामुळे फवारणीची वेळ ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. पन्नास टक्के अंडी उबण्याची स्थिती ही फवारणीकरिता योग्य वेळ असते. कारण ह्या अवधित कीडीच्या प्रथमा वस्था अधिक प्रमाणात झाडावर उपलब्ध असतात. त्यामुळे किडींचे प्रजनन व संख्या ह्यावर नियमीत नजर ठेवण्याची गरज असते. आजवरील अभ्यासानुसार तिन्ही बहारांतील खालील वेळा किडीच्या नियंत्रणासाठी योग्य ठरविण्यात आल्या आहेत.

नवती -(बहार)   पन्नास टक्के अंडे उबवण्याचा कालावधी  
आंबिया   एप्रिलचा पहिला पंधरवाडा  
मृग   जुलैचा दुसरा पंधरवाडा  
हस्त   डिसेंबरचा पहिला पंधरवाडा  


किडींच्या प्रकोपाची तीव्रता प्रत्येक बागेत एकसारखी नसते. तापमानातील बदलामुळे किडीच्या वाढीवर परिणाम होतो. हिवाळ्यात किडीच्या पिल्लावस्थेचा कालावधी लांबतो तर उन्हाळ्यात कमी होतो. म्हणून उन्हाळ्यात (आंबिया) संपूर्ण बागेची फवारणी २ ते ३ दिवसात संपविणे गरजेचे आहे.

ह्या किडीच्या जैविक नियंत्रणाला विदर्भात चांगला वाव आहे. कारण येथे बरेचशे परजीवी व परोपजीवी कीड शेतात उपलब्ध आहेत, जसे - एनकार्सिया ओपुलेन्टा, एनकार्सिया बेत्रेट्टी, एरेटमोसेरस गुन्टुरिएन्सीस इत्यादी परजीवी आणि मॅलाडा बोनिनेन्सीस व सिरन्जीयम पार्सेसेटोसम हे परोपजीवी शेतामध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध असून कीड नियंत्रणासाठी त्यांचा सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे. त्यापैकी मॅलाडा बोनिनेन्सीस या काळ्या माशीवरील परोपजीवीच्या प्रजननाची पद्धत एन.आर.सी.सी. ने विकसीत केलेली आहे.

२) संत्र्यावरील सायला:

डायफोरिना सिट्री (सिलीडी ) होमोप्टेरा
ही कीड थोड्या अधिक प्रमाणात ठिकठिकाणी आढळते. परंतु कधी - कधी ह्या किडीचा प्रकोष अतिशय गंभीर स्वरूपाचा होऊन सर्वत्र पसरतो. सन १९६० - ६२ साली तर मध्य भारतात ह्या किडीचा तीव्र स्वरूपाचा उद्रेक झाला होता. तेव्हापासून ही कीड नियमितपणे छुटपूट प्रमाणात हजेरी लावून येथील संत्रा पिकाला हानीकारक ठरत आहे.

नुकसानीचे स्वरूप : सायलाच्या बाल्यावस्था व प्रौढ दहा ते शंभराच्या समुहात राहून झाडाच्या कोवळ्या फांद्या, पाने आणी कळ्यातील रस शोषून घेतात. परिणामत: नवीन कळ्या आणि फळांची अत्याधिक प्रमाणात गळ होते आणि फांद्या सुद्धा वाळतात. पिल्ले मधासारखा चिकट गोड पांढरा पदार्थ स्त्रवित करतात, ज्यावर काळी बुरशी झपाट्याने वाढते. शिवाय सायला झाडामध्ये विषारी द्रवसुद्धा सोडतो जो फांदीमरसाठी कारणीभूत ठरतो. अधिक महत्त्वाचे म्हणजे, सायला कीड फायटोप्लाझमा सारख्या जीवामुळे होणाऱ्या 'ग्रीनिंग' नावाच्या अत्यंत हानीकारक रोगाच्या फैलावाचे माध्यम आहे. आसाम आणि पंजाबमधील लिंबूवर्गीय फळांच्या बागा ह्याच रोगाने ग्रस्त आहेत.

जीवनक्रम : सायला कीडीसाठी आंबिया आणि मृग बहाराचा काळ अनुकूल असतो. ते अर्धवट खुल्या पानाच्या गुंडाळीमध्ये किंवा कळ्यांमध्ये अंडी घालतात. अंड्यापासून प्रौढावस्थेपर्यंत उन्हाळ्यात १५ दिवस तर हिवाळ्यात ४५ दिवसांचा कालावधी लागतो. याप्रकारे एका वर्षात सायालाच्या लागोपाठ ९ ते १० पिढ्या पूर्ण होतात. हिवाळ्यात व उन्हाळ्यात सुप्तावस्थेत असणारी ही कीड सहा महिन्यापेक्षा जास्त काळ जीवंत राहू शकते.

नियंत्रण :

१) आंबिया (मार्च - एप्रिल) आणि मृग (जून - जुलै) बहाराच्या कालावधीत सायला अत्यंत नुकसानदायक असल्यामुळे ह्या वेळी कीडीचे नियंत्रण करणे आवश्यक असते.

२) संत्र्याच्या बागेत व आजूबाजूला गोड लिंबाची झाडे नसावीत कारण ही झाडे सायला किडीच्या पहिल्या पसंतीचे खाद्य असून, प्रजननाचे फारमोठे स्त्रोत ठरू शकतात.

३) नवती फुटण्याच्या वेळी म्हणजेच जानेवारी - फेब्रुवारी, जून - जुलै आणि ऑक्टोबर - नोव्हेंबरमध्ये ह्या किडीचा प्रादुर्भाव लक्षात येताच स्प्लेंडर १.५ ते २ मिली किंवा प्रादुर्भाव लक्षात येताच स्प्लेंडर १.५ ते २ मिली किंवा मोनोक्रोटोफॉस ०.७ मिली किंवा फॉस्फॅमिडॉंन ०.३ मिली किंवा क्विनालफॉस १ मिली एका लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकता भासल्यास वरीलपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची दुसरी फवारणी १५ दिवसाच्या अंतराने करावी. परंतु कीटकनाशक बदलून वापरावे.

४) सायला पिल्लांवरील परजीवी टॅमॅरिक्झीया रेडिएटा हे कीडीस ३० ते ४० % हानिकारक ठरू शकते आणि काही ठिकाणी तर विशेषत: मार्च - एप्रिलमध्ये ९०% पर्यंत सुद्धा त्यांचा प्रभाव आढळून आला आहे. सायला किडीच्या जैविक नियंत्रणासाठी या परजीवी कीटकांची चांगली मदत होवू शकते. त्यासाठी ह्यावर सखोल अभ्यासाची गरज आहे.

सायलाची पिल्ले भक्षण करणारे, अपर्टोक्रायसा, क्रासीनरवीस, ब्रुमुस सुचुरालीस आणि कोकसीनेल्ला रेपेंडाक्स इत्यादी परोपजीवी बागांमध्ये बऱ्याच प्रमाणात आढळून येतात ते सुद्धा सायलाच्या जैविक नियंत्रणासाठी उपयोगी ठरू शकतात.

३) पाने पोखरणारी अळी : फायलोनिस्टीस सिट्रेला (फायलोनिस्टीडी, लेपिडोप्टेरा)

नुकसानीचे स्वरूप : ह्या किडीचा उपद्रव रोपवाटीकेमध्ये आणि लहान झाडांवर तर होतोच होतो पण मोठ्या झाडांवर सुद्धा होतो. किडीची अळी अंड्यातून बाहेर निघताच पानांच्या खालच्या पापुद्र्यातून आंत शिरते व त्यामुळे तेथे नागमोडी चमकदार वलये दिसू येतात. ही अळी वलयाच्या टोकाला सहज पाहता येते. ही वलये त्यात सापडलेल्या हवेमुळे पांढुरकी दिसतात. त्यामुळे ह्या अळीस कडेपासून आतल्या भागाकडे गुंडाळतात व नंतर पाने गळतात. कोवळ्या नवीन पालवीवर प्रादुर्भाव झाल्यास झाडांची वाढ एकदम खुंटते. किडीचा प्रकोप लहान झाडांच्या कोवळ्या फांद्यावरील 'शेंडेमर' रोगाला कारणीभूत ठरतो. या किडींचा प्रादुर्भाव प्रथम पानांच्या खालच्या भागाला होतो पण किडीची संख्या अत्याधिक झाल्यास पानांच्या वरच्या भागाला सुद्धा दिसून येतो. पाने पोखरणारी अळी मिलीबग आणि लिंबुवरील खैऱ्या (कँकर) रोगाच्या फैलावास सुद्धा सहाय्यक ठरते.

जीवनक्रम : वातावरणाच्या स्थितीनुसार ही कीड आपले जीवनक्रम २० ते ६० दिवसांत पूर्ण करते आणि वर्षभरात एकापाठोपाठ ९ ते १३ पिढ्या पुर्ण होतात. चंदेरी पांढऱ्या रंगाचे अगदी लहान पतंग पहाटेला बाहेर येऊन कोवळ्या पानामध्ये अंडी घालतात. ही कीड वर्षभर कार्यक्षम असते. परंतु तीव्र प्रादुर्भाव जुलै- ऑक्टोबर आणि नंतर फेब्रुवारी - मार्च महिन्यात आढळतो.

नियंत्रण :

१) नवीन पालवी फुटण्याच्या वेळी स्प्लेंडर १.५ ते २ मिली किंवा मोनोक्रोटोफॉस १.५ मिली किंवा क्विनालफॉस २ मिली किंवा फोसेलॉन मिली यापैकी कोणतेही एक कीटकनाशक एका लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. दहा दिवसानंतर परत फवारणी करावी.

२) रोपवाटिकेत किंवा लहान झाडांवर कीडीचा प्रकोप गंभीर झाल्यास कीडग्रसीत पाने तोडून त्यांना नष्ट करावे आणि त्यानंतर फवारणी करावी मात्र हे पावसाळ्यातच करावे.

३) टेट्रास्टीकस फायलोनिस्टाइडीस सिरोस्पीलस क्वाड्रीस्ट्रिएटस, सिंपीएसेस परपुरीया आणि एजीनिआस्पिस इत्यादी समुहाचे परजीवी पाने पोखरणाऱ्या अळीवर ३० ते ४५% तर कधी - कधी ८०% सुद्धा हानिकारक ठरू शकतात. ह्या परजीवींद्वारे पाने पोखरणाऱ्या अळीच्या जैविक नियंत्रणाची फार मोठी संभावना आहे.

४) पाने खाणारी अळी : पॅपिलिओ डिमोलियस (पॅपिलिओनीडी, लेपिडोप्टेरा)

नुकसानीचे स्वरूप : नागपूरी संत्रा व लिंबू झाडांवर या किडीचा प्रादुर्भाव वर्षभर दिसून येतो. परंतु जुलै - ऑगस्टच्या दरम्यान अधिक आढळून येतो. या अळीची पाने खाण्याची क्षमता फार असल्यामुळे झाडे बरेचदा निष्पर्ण होतात. यापूर्वी विदर्भात १९४०,१९६९,१९८२ आणि १९८३ मध्ये पाने खाणाऱ्या अळीचा नागपूरी संत्र्यावर उद्रेकी प्रकोप झाला होता. अलिकडे १९९६ साली सुद्धा जुलै - ऑगस्ट महिन्यात नागपूर व वर्धा जिल्हयातील काही संत्रा बागांवर किडीचा भयंकर प्रकोप आला होता.

जीवनक्रम : या किडीची अंडी नवतीच्या कोवळ्या पानांच्या टोकावर एकएकटी घातलेली दिसून येतात. गर्द कथ्थ्या, काळ्या रंगाच्या लहान अळ्यांचे रूपांतर १३ ते १६ दिवसांत हिरव्या रंगाच्या मोठ्या अळ्यात होते. ह्या मोठ्या अळ्यांना इंग्रजी 'वाय' (Y) अक्षराच्या आकाराचे एक अवयव असते, त्याला 'आस्मेटेरीयम' असे म्हणतात, जे बाह्य इजा होताक्षणी तोंडा जवळून बाहेर निघते व त्यातून अळी उग्र वर्प बाहेर सोडते. शत्रुंपासून रक्षणासाठी ही प्रतिक्रिया असते. अळ्या झाडावर कोषावस्थेत जातात. साधारणत: किडीचे जीवनचक्र १८ ते ४० दिवसात पूर्ण होते मात्र हिवाळ्यात १४५ दिवससुद्धा लागू शकतात. एका वर्षात एकामागेमाग ४ ते ५ पिढ्या तयार होतात.

नियंत्रण :

१) झाडांवर लहान अळ्यांचा प्रादुर्भाव लक्षात येताच स्प्लेंडर १.५ ते २ मिली किंवा डायमेथोएट १.५ मिली फेनिट्रोथिआन १ मिली, कार्बारिल (भुकटी) २ ग्रॅम किंवा एन्डोसल्फान १.४ मिली ह्यापैकी कोणतेही एक कीटकनाशक एक लि. पाण्यात घेऊन फवारणी करावी.

२) डाईपेल (बेसीलस थुरीन्जीएन्सीस बर्ल) ०.०५% तीव्रतेची फवारणी केल्याने किडीचा चांगला बंदोबस्त होतो. बैक्टेरिया सेरासींया मारसेंस आणि फुसारीयम समूहातील बुरशी सुद्धा कीडींचा नायनाट करायला प्रभावी ठरतात.

३) ब्रॅकोनिड, एपान्टेलिस फ्लेविपेस आणि इक्न्युमोनिड मेलॅलोफेचारोप्स समूह हे अळ्यांचे प्रमुख परजीवी आहेत आणि प्टेरोमॅलस पुपेरियम आणि इक्न्युमोनिड होल्कोजोप्पा सिलोपायगा हे कोषावस्थेचे प्रमुख परजीवी आहेत. हे परजीवी आहेत. हे परजीवी ह्या कीडीचे जैविक नियंत्रण करण्यात फारच उपयोगी ठरू शकतात.

५) संत्रा खोडाची साल खाणारी अळी : (जाळीचा कीडा) इंडरबेला क्वाड्रीनोटाटा (मेलारबेलीडी, लेपिडोप्टेरा)

नुकसानीचे स्वरूप : दुर्लक्षीत आणि अस्वच्छ बागेत या अळीचा उपद्रव अधिक दिसून येतो. अळी दोन फांद्याच्या सांध्यात छिद्र पोखरते ज्यात ती दिवसभर विश्राम करते आणि रात्री बाहेर पडून आजूबाजूची साल खाते. ग्रसित झाडांचे आयुष्य आणि उत्पादन क्षमतेत घट होते. ही कीड अलिकडे लहान झाडांवर सुद्धा झपाट्याने पसरत आहे.एका आठ वर्षाच्या झाडावर ह्या किडीचे एकूण १७ छिद्र दिसून आले आहेत. अशा प्रकारची झाडे व बागा मरकटलेली दिसतात. ग्रसित फांद्या वाळतातसुद्धा

जीवनक्रम : मादी पतंग मे व जून महिन्यात १५ ते २५ च्या गटात झाडांच्या सालीवर अंडी घालते आणि ८ ते ११ दिवसात अंडी उबवतात. लहान अळी सुरुवातीला साधारणपणे सप्टेंबरपर्यंत सालीखाली राहून उपजीविका करते. नंतर दोन फांद्यांच्या सांध्यात छिद्र करते. अशी अवस्था एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत राहते. ह्याच छिद्रात अळी कोषावस्थेत जाते. कोषावस्था २१ ते ४१ दिवसाची असते. एकावर्षात किडीची एकच पिढी पुर्ण होते.

नियंत्रण : सर्वप्रथम ग्रसीत भागावरील जाळे काढून छिद्राजवळील भाग साफ करावा व नंतर कापसाचा बोळा मोनोक्रोटोफास (१%) किंवा डायक्लोरवास (१%) आणि स्प्लेंडर (२% ) च्या द्रावणात भिजवून खोडातील छिद्रात घालावा किंवा वरील कोणत्याही एका किटकनाशकाचे तीन - चार मिली द्रावण किडीच्या छिद्रात टाकण्यासाठी इंजक्शनच्या पिचकारीच्या उपयोग करावा, तसेच नुकसान झालेल्या सालीच्या जागेवर या द्रावणाचा छिडकाव करावा.

६) संत्र्यावरील मिलीबग : प्लेनोकोक्कस सीट्री (सुडोकोक्सीडी होमोप्टेरा)

नुकसानीचे स्वरूप : ही कीड लहान रोप आणि मोठ्या झाडांना सुद्धा हानिकारक आहे. वसंत आणि शरद ऋतुत नुकसानीचे स्वरूप तीव्र असते.पानं आणि कोवळ्या फांद्या विकृत होतात आणि त्यांच्या गुंडाळ्या वा लूप तयार होतात. ही कीड फळांच्या देठातून अन्नरस शोषण करते व त्यामुळे बहुधा फळांची गळ होते. शाखांच्या सांध्यावर मिलीबगचे पांढऱ्या रंगाचे लहान - लहान समुह दिसतात त्यात शेकडोंच्या मिलीबग बसून झाडाचा रस शोषण करतात व त्यामुळे झाडे दुर्बल होतात. मिलीबग मधासारखा गोड चिकट द्रव पदार्थही उत्सर्जित करतात ज्यावर काळी बुरशी वाढते.

जीवनक्रम : मिलीबग निरंतर प्रजनन करीत राहतात. तंतुमय मेद्यापासून बनलेला समुहात त्या पिवळ्या रंगाची अंडी घालतात. एका पंधरवाड्यात एका ओव्हीसॅकमध्ये (पिशवीत) जवळपास ६०० ते ८०० अंडी घातली जातात. जी ७ ते १५ दिवसात उबवतात. मादी पिल्ल्यांच्या तीन अवस्था असतात. तर पंख असलेल्या नरामध्ये चार पिल्लावस्था असतात. एका वर्षा लागोपाठ तीन पिढ्या तयार होतात.

नियंत्रण :

१) किडीच्या नियंत्रणासाठी स्प्लेंडर २५० मिली आणि डायमेथोएट १५० मिली १०० लिटर पाण्यात मिसळून किंवा कार्बारिल १० मिली + आणि तेल १० मिली किंवा मॅलाथिआन २० मिली दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

२) पिल्लांचे आणी प्रौढ किडीचे परजीवी लेप्टोमेस्टीक्सस डॅक्टीलोपी आणि परोपजीवी, क्रिप्टो लेमस मान्ट्रोझिएरी व मॅलाडा बोनीनेन्सिस हे मिलीबगच्या नियंत्रणासाठी सहाय्यक ठरतात व त्यामुळे त्यांचा वापर वाढवणे आवश्यक आहे. ह्या परजीवींच्या मोठ्या प्रमाणावर उत्पादनिसाठी वैज्ञानिक तंत्रज्ञान सुद्धा उपलब्ध आहे. तेव्हा आवश्यकतेनुसार जैविक नियंत्रणाचा उपयोग व्हायला पाहिजे.

७) संत्र्यावरील मावा : टोक्झोप्टेरा सीट्रीसिडा किरकाल्डी आणि टोक्झोप्टेरा औरंसी (अफीडीडी, होमोप्टेरा): मावा या किडीच्या दोन प्रजाती आहेत. १) तांबड्या रंगाचा मावा व २) काळ्या रंगाचा मावा. ही कीडसुद्धा नवती निगडित असून ती सर्व वयाच्या संत्राच्या झाडांवर दिसून येते. थोड्याच कालावधीत त्याचे जलद प्रजनन होऊन हजारो मावा तयार होतात.

नुकसानीचे स्वरूप : पुर्ण विकसीत असलेले कीड आणि पिल्ले कोवळ्या पानातील आणी फांद्यातील रस शोषून घेतात. त्यामुळे झाडांची वाढ खुंटते. ही कीड साखरी द्रवाचा स्त्राव करते ज्यावर काळ्या बुरशीची लागण होते. 'ट्रिस्टेजा' नावाच्या विषाणूजन्य रोगाच्या फैलावासाठी तांबड्या रंगाचा मावा कारणीभूत असतो.

जीवनक्रम : १ ते ३ आठवड्याच्या कालावधीमध्ये मावा किडीचे अलैंगिक प्रजननाद्वारे दिवसाला ५ पिल्ले इतका जन्मदर आहे. पिल्ले ६ दिवसात प्रौढ होतात. फेब्रुवारी - मार्च महिन्यातील हळू - हळू वाढणारे दिवसाचे तापमान कीडसंख्या वाढीसाठी सहाय्यक ठरते. ह्याच काळात किडीला पंख येतात व त्यामुळे मावा समुह फार मोठ्या संख्येनी इतरत्र उडताना दिसतात. ह्यावेळी मादी कीड सरळ पिल्लांना जन्मास घालते. काळ्या मावाच्या पिल्लास जर दोन बोटांच्या चिमटीत दाबले तर 'लाल' रंगाचा आणि तांबड्या मावाच्या पिल्लातून 'पिवळ्या' रंगाचा द्रव बाहेर निघतो.

नियंत्रण :

१) ह्या किडीचे नियंत्रण करण्यासाठी सात दिवसाच्या अंतराने स्प्लेंडर २ मिली/लि. किंवा क्विनॉलफॉस किंवा मॅलॅथिआन (०.०५%) च्या फवारण्या द्याव्यात.

२) इक्न्युमोनिड परजीवी लिपोलेक्झिस स्कुटेलॅरीस आणि परोपजीवी क्रिसोपिड्स कोक्कीनेलीड्स आणि सिरफीड्स इत्यादी या कीडीवर जीवन जगतात.

८) संत्र्यावरील फुलकीडे : स्किर्टोथ्रीप्स समूह, हेलिओथ्रीप्स हीमोरेओडालीस (थ्रिपीडी, थायसेनोप्टेरा)

नुकसानीचे प्रकार : पिल्ले आणि प्रौढ कीड अविकसीत, अर्धविकसीत पाने, उमलणारी फुल तसेच लहान आणी मोठ्या फळांतून सुद्धा रस शोषण करतात. पाने कपाच्या आकारात मुरडली जातात व रबरी बनतात. पानांच्या मध्येरेषेला समांतर दोन पांढऱ्या रंगाच्या रेषा आणि फळांच्या गळ्याभोवती चमकदार पांढरे वर्तुळाकार वा पसरट पांढुरके डाग पडणे फुलकीड्यांच्या प्रादुर्भावाची लक्षणे आहेत.

जीवनक्रम : प्रत्यक्षरित्या नराची उत्पत्ती दिसत नाही आणी प्रजनन अलैंगिक पद्धतीने होते. मादी पानाच्या पेशीमध्ये चिरा देवून त्यात अंडी देते. अंडी २ ते ७ दिवसात उबवतात. वातावरणानुसार पिल्लांची कोषावस्था ३० ते ६० दिवसांपर्यंत होऊ शकते. ३ ते ४ पिल्लावस्थानंतर पिल्लाचे प्रौढात रूपांतर होते. एका वर्षात अनेक पिढ्या तयार होतात.

नियंत्रण : पानकळ्या उमलण्याचे वेळी, लहान फळांवर आणि भोवतालच्या गवतावर सुद्धा स्प्लेंडर २ मिली किंवा डायमेथोएट किंवा फास्फॅमिडॉंन किंवा मोनोक्रोटोफॉस १ मिली एक लिटर पाण्यात मिसळून फवारणी द्यावी. कारण त्यावर ही कीड जीवनयापन करते.

९) फळातील रस शोषणारे पंतग : ओफेडेरीस समूह, अकेया जनाटा (नोक्टुईडी, लेपिडोप्टेरा)

नुकसानीचे स्वरूप : प्रौढ पतंग सायंकाळी बाहेर पडतात व पिकणाऱ्या आणि पिकलेल्या फळाच्या सालीत छिद्र पाडतात. या छिद्रातून बुरशी व इतर जीवाणूंचा आंत प्रवेश होवून फळांची सडण सुरू होते व फळे पिकण्यापूर्वीच गहतात. फळगळीचे प्रमाण २० ते ४ टक्क्याइतके असते तर कधी - कधी ह्याहूनही अधिक असते.

जीवनक्रम : मादी पतंग गुळवेल, वासनवेल, चांदवेल, या सारख्या जंगली झाडांवर २०० ते ३०० अंडी घालते. अंड्यातून ३ ते ४ दिवसांत सुरवंट बाहेर येतो. झाडांची पाने खाऊन १३ ते १७ दिवसात सुरवंट आपल्या पाच अवस्था पूर्ण करतो आणि जमिनीत १२ ते १८ दिवसांकरिता कोषावस्थेत जातो. अशाप्रकारे ३० ते ४० दिवसात ह्या पतंगाची एक पिढी तयार होते.

नियंत्रण :

१) पतंगांना आकर्षिक करून मारण्यासाठी २० ग्रॅम मॅलॅथिआन किंवा ५० मिली डायझिनॉन, दोन लि. पाण्यात २०० ग्रॅम गुळ किंवा फळांचे रस मिसळून विषारी बेट तयार करावे. आणि रुंद तोंडाच्या बाटल्या भरून २५ ते ३० झाडांसाठी दोन या प्रमाणे बाटल्या ठेवाव्यात. पण ही योजना केवळ आंशीक प्रमाणात प्रभावी ठरते.

२) पतंगे पकडण्याकरिता रात्रीच्यावेळी दिव्याच्या सापळ्याचा उपयोग करावा.

३) बागेसभोवताली असणाऱ्या तणांवर मॅलॅथिआन किंवा स्प्लेंडरची फवारणी करावी कारण या तणांवर किडीची पिल्लावस्था राहते.

४) गळलेल्या फळांना एकत्र करून मातीत दाबून नष्ट करावे.

५) ह्या कीटकांचा प्रसार थांबवण्यासाठी बगीचा स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे.

१०) फळमाशी : डेकस डारसेलिस हेन्डेल (ट्रिप्टेरा) :

नुकसानीचे स्वरूप : प्रौढमाशी पिकलेल्या फळांत अंडी घालते. अंडी अबवल्यानंतर अळी फळाच्या आतमधील गूदा खाते. छिंद्रातून बुरशी आणी जिवाणूंचा फळांत शिरकाव होतो. त्यामुळे फळ सडू लागतात व शेवटी फळगळ सुरू होते.

जीवनक्रम : मादी परिपक्व फळाच्या सालीमध्ये २ ते १५ अंडी घालते. एक मादी एक महिन्याच्या कालावधीत २०० पर्यंत अंडी घालते जी उन्हाळ्यात २ ते ३ दिवसात बाल्यावस्था पूर्ण होते व नंतर जमिनीत ३ ते ७ इंच खोलीवर ती कोषावस्थेत जाते. वातावरणानुसार ६ ते १४ दिवसांत कोषातून प्रौढ बाहेर येतो.

नियंत्रण :

१) फळ पिकण्याच्या दोन महिन्यापूर्वी दहा दिवसांच्या अंतराने, माशीला आकर्षित करण्यासाठी स्प्लेंडर २ मिली/लि. किंवा मॅलॅथिऑन किंवा ट्रायक्लोफॉन किंवा फेनीथिआन ०.०५% यांच्या सोबत १ टक्का गुळाची मात्रा मिसळून फवारणी करावी.

२) नर माशीला आकर्षित करण्यासाठी ०.१ टक्के मिथाइल युजेनाल आणि ०.०५ टक्के मॅलाथिआन चे मिश्रण रुंद तोंडाच्या शिशीत घेऊन बागेत ठेवल्याने नर माशा त्याकडे आकर्षित होवून त्यास बळी पडतात. फळं तोडणीच्या ६० दिवसापासूनच ह्या मिश्रणाच्या २५ शिशा प्रति हेक्टर या प्रमाणात बागेत ठेवव्यात . ह्यातील कीटकनाशकांचे द्रावण दर सात दिवसांनी बदलावे.

३) गळलेली फळं गोळा करून जमिनीत दाबून नष्ट करावीत.

११) संत्र्यावरील कोळी (अष्टपदी) : युटेट्रॅनिकस ओरिएन्टॉंलिस (टेट्रॅनिकोडी, एकेरीना )

नुकसानी चे स्वरूप : संत्र्यावरील कोळी पानातील आणि फळातील रस शोषून घेते. पानांवर राख किंवा धुळे साचल्याप्रमाणे पानांचा पृष्ठभाग धुळकट दिसतो. त्यामुळे पानांच्या वरच्या भागाला फिक्कट गोलाकार चट्टे पडतात जे खालच्या भागाला दिसत नाहीत. अत्याधिक प्रकोप झाल्यास फळांवर मोठे, चंदेरी वा करड्या रंगाचे चट्टे पडतात जे खालच्या भागाला दिसत नाहीत. अत्याधिक प्रकोप झाल्यास फळांवर मोठे. चंदेरी वा करड्या रंगाचे चट्टे पडतात. जेव्हा हिरवी फळं पिकायला लागतात व फळांवर पिवळसर रंग येतो. तेव्हा हे चट्टे नाहीसे होतात. पिकलेल्या फळांवर जास्त प्रकोप झाल्याने हे चट्टे स्थिरावतात. बहुधा पाने गळतात आणि फांद्या शेंड्यापासून वाळायला लागतात. पिकलेल्या फळांवरील करड्या रंगाच्या असंख्य छटांमुळे फळाची प्रत बिघडते. त्यामुळे समस्या गंभीर होते. झाडांवरील नवीन पालवी कोळीसंख्या वाढण्यास सहाय्यक ठरते. संख्येतउ निरंतर वाढ झाल्यामुळे अष्टपदीचा बरेचदा उद्रेक होतो.

जीवनक्रम : अष्टपदी वर्षभर सक्रिय असते परंतु नोव्हेंबर ते मे त्यांचा प्रभाव जास्त आढळून येतो. फेब्रुवारी ते जून महिन्यात एकाच पानावर अधिकतम १५ पर्यंत कोळी आढळतात. मादी मुख्यत: पानांच्या मध्यरेषेलगत दिवसाकाठी आठ अंडी घालते. सामान्यत: १० ते १५ दिवसांत अंडी उबवतात. तर तीन महिन्यात बाल्यावस्था पूर्ण होते. एक पिढी पुर्ण होण्यासाठी १७ ते २० दिवसांचा अवधी लागतो व एका वर्षात अष्टपदींच्या लागोपाठ अनेक पिढ्या तयार होतात.

नियंत्रण :

१) कोळी किडीचा प्रादुर्भाव दिसताक्षणीच स्प्लेंडर २ मिली किंवा डायकोफाल १.५ मिली किंवा मोनोक्रोटोफॉस १ मिली किंवा आक्सीडेमेटान मिथाईल १.५ मिली किंवा द्राव्य गंधक ३ ग्रॅम एक लिटर पाणी ह्या दराने द्रावण बनवून फवारणी करावी. आवश्यकता भासल्यास दुसरी फवारणी एका आठवड्याच्या अंतराने द्यावी.

२) परोपजीवी कोळी यूसियस हिबिस्की आणि दुसरे परोपजीवी एजीस्टेमस समूहातील आणि एम्बिलेसियस हिबिस्की आणि दुसरे परोपजीवी एजीस्टेमस समूहातील आणि एम्बिलेसियस हिबिस्की हे अष्टपदीचे प्रमुख प्राकृतिक शत्रु आहेत.

३) पाण्याच्या अभावात अष्टपदीचा अधिक उपद्रव दिसून येतो. तेव्हा पाण्याचा ताण दिलेल्या झाडांना पाणी योग्य प्रमाणात मिळत आहे. याची खात्री करून घ्यावी. विशेषत: उन्हाळ्यातील ताणाच्या वेळी हे जरूरीचे आहे.

कीडनियंत्रणाबाबत महत्त्वाच्या सुचना

१) प्रतिबंधक उपाय म्हणून झाडांवर नवीन पालवी येताच पहिली फवारणी द्यावी.

२) बागेत असलेली मुंग्याची वारूळे/वस्त्या नष्ट कराव्यात कारण त्यांच्या मार्फत इतर किडी बागेत गोळा केल्या जाता. एवढेच नव्हे तर त्या किडींचा इतर परभक्षी नुकसानकारक माध्यमातून बचावसुद्धा करतात.

३) झाडांची दाट लागवड आणि बागेतील पाण्याचा खराब निचरा ह्यामुळे किडींसाठी पोषक वातावरण बनते व किडींची संख्या झपाट्याने वाढते. म्हणून झाडांची दाट लागवड व अनावश्यक पाणी साचणे इत्यादी बाबी टाळाव्यात.

४) झाडांच्या सक्रीय वाढीच्या कालावधित फांद्या कापू नये कारण त्यामुळे झाडाला अनियमित आणि वारंवार नवीन पालवी येते व त्यामुळे किडींचा प्रादुर्भाव अखंड राहतो. फळाची तोडणी झाल्यावर ग्रसित वाळलेल्या फांद्या (सल) काढून टाकाव्यात व लगेच बुरशी नाशकाचा एक फवारा द्यावा.

५) नत्रयुक्त खताच्या अत्याधिक आणि वारंवार वापरामुळे झाडाला सारखी नवीन पालवी येत राहते. ज्यामुळे किडींच्या प्रसाराकरिता पोषक वातावरण निर्मित होते म्हणून खतांचा वापर गरजेनुसारच करावा.

६) संत्र्याच्या झाडाचा घेर असा ठेवावा की, ज्यामधून भरपूर सूर्यप्रकाश जमिनीवर पोहचू शकेल व मोकळा वारा खेळू शकेल.