नागपूर संत्र्यास शिक्रापूर संत्र्याने भावात मागे टाकले प्रिझम व पंचामृतामुळे

श्री. बुवाजी मारुती धुमाळ,
मु. पो. पिंपळे धुमाळ, ता. शिरूट, जि. पुणे.
फोन नं. (०२१३८) २७५२५०


१५ वर्षापुर्वी १ एकरमध्ये संत्र्याची लागवड १० x १०' वर केली. पंचामृत, प्रिझम औषधे संत्र्यासाठी नेली होती. मृग बहारासाठी बहार निघतेवेळी जून २००४ मध्ये पहिली फवारणी केली. दुसरी फवारणी ऑक्टोबर महिन्यात केली.

संत्र्यापासून ८० झाडांत १ लाख ३० हजार

लागवडीनंतर ५ वर्षांनी माल चालू झाला. ५ ते ८ वर्षे उत्पन्न फार कमी म्हणजे वर्षाला ३० - ३५ हजार रू. मिळत होते. मात्र गेल्यावर्षी (२००४) श्री. बाळासो सयाजी धुमाळ यांनी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी विषयी माहिती सांगितली. ते ५ - ६ वर्षापासून ही औषधे वापरत आहेत. तर वरील दोनच फवारण्यामध्ये जानेवारी २००५ मध्ये माल चालू झाला. १।। महिना सतत चालू होता दररोज १० खोकी माल निघत होता. एका खोक्यात २५० ते ३०० फळे बसतात. १०० - १२० रू. ३ डझनला भाव मिळत होता. संत्रा पुने मार्केटला निवृत्ती बळवंतराव तावरे यांचे गाळ्यावर विक्रीसाठी आणत होतो. गाळ्या वर एक नंबरने मालाची विक्री होत होती. ८० झाडांपासून १ लाख ३० हजार रुपये उत्पन्न मिळाले.

नवीन लागवड दोन वर्षाची झाली. ७०० झाडे १३' x १३' अंतरावर आहेत. जमीन तांबट काळी आहे. त्याला तिसऱ्या वर्षी (सप्टेंबर - ऑक्टोबर २००५)हस्तबहार धरणार आहे. या जमिनीत कांदा, हरभरा, काकडी अशी आंतरपिके घेतल्याने पाणी बरे मिळाले. शिवाय आंतरपिकाचा बेवड मिळाल्याने झाडांची वाढ झपाट्याने झाली आहे. झाडे २ वर्षाची आहेत अशी वाटत नाही.

जुन्या बागेचा मार्च अखेर माल संपतो नंतर गुढीपाडव्यानंतर ७ जूनपर्यंत बागेला ताण देतो. जूनच्या सुरुवातीला झाडाभोवती आळे करून एका झाडाला २ -२ पाट्या शेणखत टाकतो. नंतर पाणी देतो. पंचामृत, प्रिझमची पहिली फवारणी करतो. त्यामुळे फुट चांगली निघते. नंतर नेहमीप्रमाणे दसऱ्याचे दरम्यान सुपारी, लिंबाएवढी फळे झाल्यानंतर फळे पोसण्यासाठी दुसरी फवारणी केली.

नागपूर संत्र्याला आमच्या संत्र्याने मागे टाकले

अमरावती, नागपूर जिल्हातील व्यापाऱ्यांनी आमचा माल खरेदी केला. नागपूर संत्र्याचा भाव १०० रू. ३ डझन आहे आणि आमच्या संत्र्याला १२० रू. ३ डझन असा भाव मिळत आहे. पाणी विहिरीचे, १५ दिवसांनी बसते. पाण्याची तशी कमतरताच आहे. सध्या नागपूरचा संत्रा आकाराने मोठा आहे. आपला त्यामानाने लहान आहे. तरी आपल्या मालाला भाव जादा मिळतो. त्याचे कारण नागपूरचा माल लुज असतो. आपला कडक राहतो. त्यामुळे ट्रान्सपोर्टमध्ये टिकाऊपणा वाढतो. शिवाय त्यापेक्षा गोडी अधिक आहे. एका झाडावर २ - ३ खोकी माल आहे. खोके मोठे (चहाचे) असते. यंदा पाऊस लवकर पडल्यामुळे बहार लवकर निघाला. त्यामुळे नेहमी फेब्रुवारीत चालू होणारा माल यावर्षी जानेवारी (२००५) च्या सुरूवातीलाच चालू झाला. माल लवकर आल्याने बाजार भावही चांगला मिळतो. कारण फेब्रुवारीनंतर जवळ - जवळ सगळीच फळे मार्केटला येत असतात. त्यामुळे अगोदर आल्याने परवडते. एकूण ७५ झाडांना बहार आला आहे. ९५ हजार रू. ला शिरूरमधील व्यापाऱ्यांनी मागितला इसारही (अॅडव्हान्स) दिला मात्र तरीही त्यांना बाग दिला नाही. कारण स्वत: मालाची विक्री केल्यावर फायदा होतो हा गेल्यावर्षीचा अनुभव आहे.