दर्जेदार फुलकोबी (फ्लॉवर) उत्पादनाचे तंत्रज्ञान

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


भारतामध्ये तसेच महाराष्ट्रातही कोबीवर्गीय भाज्यांमध्ये फुलकोबी ही भाजी अतिशय लोकप्रिय आहे. या भाजीचा विशिष्ट स्वाद आणि रुची सर्वांना आवडणारीआहे, फुलकोबीला शहरी तसेच ग्रामीण भागातून वर्षभर मागणी असते. त्यामुळे महाराष्ट्रात, विशेषत: नाशिक आणि पुणे जिल्ह्यांत फुलकोबीची लागवड जवळजवळ वर्षभर केली जाते. पानकोबीप्रमाणेच हे थंड हवामानातील पीक आहे.

* महत्त्व : वनस्पतिशास्त्राच्या दृष्टीने फुलकोबी पाने भाजी मोहरी कुळातील आहे. फुलकोबीची पाने पानकोबीच्या तुलनेने जास्त लांब आणि कमी रुंद असतात. पानकोबीप्रमाणेच फुलकोबीचे खोड आखूड असून मुळे तंतुमय आणि उथळ असतात. पानकोबीचे रोप वाढून १८ ते २० पानानंतर रोपाच्या शेंड्याकडे गड्डा धरतो. फुलकोबीचा गड्डा हा रोपाच्या शेंड्याकडील कोंबापासून विकसित झालेल्या अनेक मांसल भागांपासून तयार होतो. त्यात फुलोरा किंवा फुलांच्या कोणत्याही भागाचा समावेश नसतो. युरोपातील अतिथंड हवामानात वाढणाऱ्या फुलकोबीच्या काही प्रकारांत मात्र ती फुलोऱ्याची पूर्वावस्था असते. गड्ड्याची पूर्ण वाढ झाल्यावर पोषक थंड हवामान (सरासरी १० ते १६ अंश सेल्सिअस) असल्यास त्यातून लांब दांडे निघून त्यावर मोहरीसारख्या बारीक बिया असतात. फुलकोबीच्या काही जातींचे बी उत्तर भारतातील मैदानी प्रदेशात होते, परंतु स्नोबॉलसारख्या जातीचे बी मात्र फक्त सिमला, कुलू मनाली खोरे आणि काश्मिर यासारख्या पहाडी थंड हवामानातच होऊ शकते.

फुलकोबीच्या भाजीचा स्वाद आणि चव यामुळे ही भाजी अत्यंत लोकप्रिय आहे. याचा सलाड म्हणूनही काही लोळ उपयोग करतात. फुलकोबीमध्ये प्रोटीन्स तसेच पोटॅशियम, फॉस्फरस, चुना आणि लोह ही खनिजे भरपूर प्रमाणात असतात. 'अ' आणि 'क' जीवनसत्त्वांचे प्रमाणही भरपूर असते. फुलकोबीपासून भाजी, लोणची, भजी इत्यादी अनेक रुचकर पदार्थ तयार करतात.

फुलकोबीच्या १०० ग्रॅम खाण्यायोग्य भागातील अन्नघटकांचे प्रमाण

पाणी - ९०%, प्रोटीन्स -२६%, जीवनसत्त्व 'अ' - ५१ इंटरनॅशनल युनिट, जीवनसत्त्व 'ब' - ५६ इंटरनॅशनल युनिट, जीवनसत्त्व 'क' - ०.०६ इंटरनॅशनल युनिट, पोटॅशियम - ०.१%, कर्बोहायड्रेटस - ४.०%, फॅटस - ०.४%, कॅल्शियम - ०.०३ %, फॉस्फरस - ०.०६%, लोह - ०.००२%, उष्मांक (कॅलरीज) - ३०.

भारतात फुलकोबीची लागवड २.८ लाख हेक्टर क्षेत्रावर केली जाते आणि वार्षिक उत्पादन ५० लाख टनांपेक्षा जास्त असून सरासरी उत्पादकता दर हेक्टरी १७८ क्विंटल आहे. बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि महाराष्ट्र ही फुलकोबी पिकवणारी प्रमुख राज्ये आहेत. महाराष्ट्रात ३,६०० हेक्टर क्षेत्रावर फुलकोबीची लागवड होते आणि ७२,००० टन उत्पादन मिळेते. महाराष्ट्रात नाशिक, पुणे, अहमदनगर, सातारा, कोल्हापूर, नागपूर या जिल्ह्यांत फुलकोबीची लागवड करतात.

* हवामान : फुलकोबी हे थंड हवामानात वाढणारे पीक आहे. पण तापमानाच्या बाबतीत हे पीक अत्यंत संवेदनशील आहे. ठराविक तापमानाला येणाऱ्या फुलकोबीच्या जातींची त्या ठराविक हंगामात लागवड केली तरच त्या जातीपासून अपेक्षित उत्पादन मिळू शकते.

फुलकोबीच्या हळव्या किंवा लवकर येणाऱ्या जातीस उष्ण हवामान (गड्डा धरताना २५ ते २७ अंश सेल्सिअस) आणि दीर्घ काळ सुर्यप्रकाश (मोठे दिवस) पोषक ठरतो. पिकाच्या वाढीच्या काळात तापमान खाली गेल्यास गड्डा अतिशय लहान (बटनिंग) आणि कमी प्रतीचा तयार होतो. गरव्या किंवा उशिरा तयार होणाऱ्या स्नोबॉलसारख्या जातींसाठी सुरूवातीपासूनच थंड हवामान (१० ते १६ डी सेल्सिअस) आणि छोटे दिवस मानवतात. पीकवाढीच्या काळात तापमानात अचानक चढउतार झाल्यास गड्ड्याची वाढ चांगली होत नाही. गड्डा घट्ट न होता विरळ राहतो. गड्ड्याचा पृष्ठभाग खडबडीत होणे, मधूनच लहान पाने दिसणे, गड्डा पांढराशुभ्र न राहता त्यावर पिवळसर किंवा जांभळट रंगाची छटा दिसणे, यासारखे दोष निर्माण होतात आणि त्यामुळे गड्ड्याची प्रत कमी होते. कोरड्या आणि उष्ण हवामानात गड्डा लहान आणि कठीण बनतो.

* जमीन : फुलकोबीच्या लागवडीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी, मध्यम ते भारी सुपीक जमीन निवडावी. फुलकोबीच्या हळव्या जातींसाठी मध्यम प्रतीची, रेताड, पोयट्याची जमीन योग्य आहे. गरव्या जातींसाठी नदीकाठची गाळवट किंवा भारी सुपीक जमीन निवडावी. फुलकोबी च्या लागवडीसाठी जमिनीचा सामू ५.५ ते ६.६ इतका असावा.

* सुधारित व संकरित जाती :

* सप्टेंबर - ऑक्टोबरमध्ये तयार होणाऱ्या हळव्या जाती : या गटातील जातींच्या बियांची पेरणी एप्रिल - मे या महिन्यांमध्ये करून रोपे ४ ते ५ आठवड्यांची झाल्यावर शेतात लागवड करतात. या जातींचे गड्डे सप्टेंबर - ऑक्टोबरमध्ये काढणीला तयार होतात.

१) पुसा कार्तिकी : भारतीय कृषी अनुसंधान संस्था, नवी दिल्ली येथे ही जात विकसित करण्यात आली आहे. या जातीची रोपे मध्यम वाढीची असतात. या जातीच्या रोपांची पाने निळसर हिरव्या रंगाची असून गड्डे पिवळसर पांढरे आणि मध्यम आकाराचे असतात.

२) पुसा दिपाली : भारतीय कृषी अनुसंधान संस्था, नवी दिल्ली येथे स्थानिक वाणातून ही जात विकसित केलेली आहे. या जातीच्या रोपांची पाने एकसारखी, मध्यम लांबीची, टोकाकडे गोलसर आणि उभट वाढणारी असून गड्डे पांढरे आणि भरपूर वजनदार असतात. रोपे उभट वाढीची असल्यामुळे ही जात कमी अंतरावर लागवडीसाठी उपयुक्त आहे.

* निमगरव्या जाती : या जातींच्या बियांची लागवड जुलै - ऑगस्टमध्ये केली जाते. या जातीचे गड्डे तयार होण्याच्या काळात २० ते २५ डी. सेल्सिअस तापमान अधिक उपयुक्त असते.

* इम्प्रुव्हड जॅपनीज : इस्राईलमधून आणलेल्या या जातीची पाने लांबट, उभट आणि अरुंद असून गड्डा मध्यम आकाराचा पांढराशुभ्र असतो.

२) पंत शुभ्रा : पंतनगर कृषी विद्यापीठाने ही जात विकसित केली असून या जातीच्या रोपांची बाहेरील पाने उभट वाढतात तर गड्ड्यालगतची पाने काही प्रमाणात गड्डा झाकून गड्ड्याचा प्रत्यक्ष सूर्यप्रकाशाशी संपर्क टाळतात. (सेल्फ ब्लिचिंग) त्यामुळे गड्डे पिवळे न पडता ते दुधाळ पांढऱ्या रंगाचे राहतात.

* गरव्या जाती (मुख्य हंगाम) : या जातींची रोपे ऑगस्ट - सप्टेंबर महिन्यात तयार करून लागवड केली जाते आणि गड्डे डिसेंबर - जानेवारी महिन्यात काढणीसाठी तयार होतात.

१) पुसा सिंथेटिक : भारतीय कृषी अनुसंधान संस्था, नवी दिल्ली, येथे ही जात विकसित केलेली आहे. मध्यम वाढीच्या या जातीची पाने उभट, विविध रंगांच्या छटा असलेली असतात. या जातीचा गड्डा मध्यम वजनाचा, घट्ट आणि दुघाळ पांढरा असतो. उत्पादन १५ ते २५ टन इतके मिळते.

२) पुसा शुभ्रा : भारतीय कृषी अनुसंधान संस्था, नवी दिल्ली येथे तीन वाणांच्या (ट्रिपल क्रॉस) संकरातून ही जात विकसित केलेली आहे. उभट वाढीच्या या जातीचे खोड उंच आणी पाने फिकट निळसर हिरव्या रंगाची असतात. या जातीचा गड्डा पांढराशुभ्र असून गड्ड्याचे सरासरी वजन ७०० ते ८०० ग्रॅम असते. या जातीचे गड्डे उत्तम, दर्जेदार असतात. रोप लागवडीपासून ९० ते ९५ दिवसांत या जातीचे ५०% गड्डे काढणीसाठी तयार होतात आणि संपूर्ण पीक ११५ ते १३५ दिवसांत निघते. या जातीचे उत्पादन हेक्टरी २१ टन इतके मिळते. ही जात घाण्या रोगाला (ब्लेक रॉट) प्रतिकारक आहे.

* स्नोबॉल प्रकार (उशीरा येणाऱ्या) या प्रकारात थंड हवामानातील उशिरा तयार होणाऱ्या जातींचा समावेश होतो. या जातींच्या बियांची पेरणी नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये आणि गड्ड्यांची काढणी फेब्रुवारी - मार्च या काळात करतात.

१) पुसा स्नोबॉल -१ : भारतीय कृषी अनुसंधान केंद्राने ही जात विकसित केली आहे. ह्या जातीच्या पानांच्या सरळ उभट वाढीमुळे गड्ड्याचे प्रत्यक्ष सूर्यप्रकाशापासून संरक्षण होते. त्यामुळे गड्डे अत्यंत पांढरे शुभ्र, घट्ट, मध्यम वजनाचे आणि दर्जेदार असतात. या जातीचे उत्पादन हेक्टरी २५ ते ३० टन इतके मिळते.

२) पुसा स्नोबॉल के - १: भारतीय कृषी अनुसंधान संस्थेच्या कटराईन (हिमाचल प्रदेश) या प्रादेशिक संशोधन केंद्राने विदेशी वाणातून निवड पद्धतीने ही जात विकसित केलेली आहे. या जातीची पाने उभी असून कडा नागमोडी, फिकट हिरव्या रंगांच्या असतात. या जातींची पाने उभट असल्यामुळे गड्डे पानाआड झाकले जातात. या जातीचे गड्डे अत्यंत पांढरेशुभ्र, घुमटाकार आणि उत्तम प्रतीचे असतात. या जातीच्या गड्ड्यांची काढणी ११५ ते १४० दिवसांत पूर्ण होते. ही जात घाण्या रोगाला प्रतिकारक आहे. या जातीचे उत्पादन हेक्टरी ३० ते ३५ टन इतके मिळते. स्नोबॉल - १ ६ हा वाणदेखील याच गटात मोडतो. याशिवाय व्यापारी कंपन्यांनी अर्ली स्नोबॉल, अर्ली विंटर, अॅडम्स व्हाईट, सिल्व्हर काइंड यासारख्या अनेक जाती बाजारात आणलेल्या आहेत.

* संकरित (हायब्रीड) जाती : पानकोबी आणि भाजीपाल्याच्या इतर पिकांप्रमाणे फुलकोबीमध्येही संकरित वाणांचा विकास आणि व्यापारी तत्त्वावर बीजोत्पादन सुरू झालेले आहे. काही संकरित वाणांची माहिती खाली दिलेली आहे.

१) पुसा हायब्रीड : हा वाण भारतीय कृषी अनुसंधान संस्थेच्या कटारईन येथील प्रादेशिक केंद्रावर १९९२- ९३ मध्ये विकसित केला आहे.

२) हिमानी : बंगलोर येथील इंडो - अमेरिकन हायब्रीड सीड कंपनीने ही संकरीत जात विकसित केली आहे. ही जात लवकर तयार होणारी असून अधिक तापमान (२० ते २८ डी. सेल्सिअस) सहन करू शकते. या जातीची रोपे उभट वाढीची असल्यामुळे गड्डे झाकून राहतात आणि त्यांचा रंग दुधाळ पांढरा असतो. या जातीचे गड्डे घट्ट, उत्तम दर्जाचे असून गड्ड्या चे सरासरी वजन ४०० ते ६०० ग्रॅम असते.

३) स्वाती : बंगलोर येथील इंडो - अमेरिकन सीड कंपनीने ही संकरित जात विकसित केलेली असून या वाणाची वैशिष्ट्ये बहुतेक हिमानी या जातीप्रमाणेच आहेत. मात्र ही जात एक आठवडा उशीरा काढणीला येते. या जातीचे गड्डे पांढरे ते किंचित पिवळसर पांढरट रंगाचे असून गड्ड्याचे सरासरी वजन ५०० ते ७०० ग्रॅम असते. ही जात गड्डे धरण्याच्या सुरूवातीच्या आणि पोसण्याच्या काळात उष्ण हवामान सहन करू शकते.

याशिवाय इतर व्यापारी बियाणे कंपन्यांनी निरनिराळे संकरित वाण विकसित केलेले आहेत, तर काही कंपन्या परदेशातून फुलकोबीच्या संकरित वाणांचे बियाणे आयात करून त्यांची विक्री करीत आहेत.

४) पावस : ही सिंजेंटा कंपनीची जात असून रोपे उंच, सरळ वाढतात, गड्डा पांढराशुभ्र असून पाने हिरवी, रुंद गड्ड्याला झाकून ठेवताना, उष्ण कटिबंधातही चांगली येते, गड्डा गोल, पांढराशुभ्र असतो. गड्ड्याचे सरासरी वजन ५०० ग्रॅम ते १२५० ग्रॅमपर्यंत असते. रोप लागवडीपासून ५० ते ५५ दिवसांत गड्डा काढणीस येतो.

५) सुहासिनी : ही जात सुद्धा सिंजेंटा कंपनीची असून थंड व कोरड्या हवामानात लागवडीस योग्य जात आहे. गड्डा घट्ट, मोठा, उभा असून पानांनी गड्डा झाकला जातो. रोप लागवडीपासून ६५ ते ७० दिवसांत गड्डा काढणीस येतो. गड्डा साधारण १.५ ते २.५ किलोचा असतो.

* रोपे तयार करणे : फुलकोबीच्या पिकासाठी प्रथम रोपवाटिकेत गादीवाफ्यावर निरोगी, जोमदार रोपे तयार करावीत, रोपे तयार करण्यासाठी बियाणे नेहमी खात्रीशीर ठिकाणाहून घ्यावे. तसेच विशिष्ट हंगामास योग्य आणि शिफारस केलेल्या जातीचेच बियाणे निवडावे. रोपवाटिकेतील 'सॉफ्ट ब्लॅक रॉट' या रोगाला प्रतिबंध करण्यासाठी तसेच कमी काळात उत्तम उगवण होण्यासाठी बियाण्यास जर्मिनेटर ३० मिली + २० ग्रॅम प्रोटेक्टंटची पेस्ट चोळून बीजप्रकिया करावी. गादीवाफ्यावर रुंदीशी समांतर ५ ते ६ सेंटीमीटर अंतरावर रेषा आखून घ्याव्यात. प्रत्येक ओळीत सारख्या अंतरावर बी पडेल अशा तऱ्हेने बी विरळ टाकावे. उन्हाळी आणि खरीप हंगामात बी पेरणीपासून २५ ते ३० दिवसांत रोपे तयार होतात. हिवाळी हंगामात रोपे तयार होण्यास ३० ते ३५ दिवस लागतात. रोपांना आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. बी उगवून आलायनंतर ८ ते १० दिवसांच्या अंतराने २ ते ३ वेळा जर्मिनेटर २५ मिली + थ्राईवर २५ मिली +क्रॉपशाईनर २५ मिलीच्या १० लि. पाण्यातून फवारण्या घ्याव्यात. म्हणजे रोपे कमी काळात निरोगी व जोमदार तयार होतील.

* हंगाम, बियाण्याचे प्रमाण आणि लागवडीचे अंतर : फुलकोबीचे पीक खरीप, रब्बी आणि उन्हाळी या तिन्ही हंगामात घेता येते, परंतु प्रत्येक हंगामासाठी योग्य जातीची निवड आणि डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर केल्यास अपेक्षित उत्पादन मिळते.

एक हेक्टर लागवडीसाठी हळव्या, निमगरव्या जातीचे ६०० ते ७५० ग्रॅम बी लागते. तर गरव्या आणी स्नोबॉल जातीचे हेक्टरी ३७५ ते ४०० ग्रॅम बी पुरेसे होते. संकरित वाणांचे बी २५० ते ३०० ग्रॅम लागते.

सर्वसाधारणपणे हळव्या जातींची लागवड ४५ x ४५ सेंटीमीटर अंतरावर करावी. लहान ते मध्यम आकाराच्या (५०० ते ७५० ग्रॅम) गड्ड्यांना बाजारात जास्त मागणी असते. फुलकोबीची लागवड ४५ x ३० सेंटीमीटर किंवा ३० x ३० सेंटीमीटर अंतरावर केल्यास रोपांची संख्या वाढल्यामुळे हेक्टरी उत्पादन वाढते. लहान ते मध्यम आकाराचे जास्त गड्डे मिळतात. उशिरा येणाऱ्या जाती ६० x ६० सेंटीमीटर अंतरावर लावाव्यात.

* लागवड पद्धती : रोपे उपटताना ती सहज उपटली जावीत आणि मुळांना फारशी इजा होऊ नये म्हणून रोपवाटिकेतून रोपे काढणीपूर्वी एक दिवस आधी रोपवाटिकेस पुरेसे पाणी द्यावे. वाफ्यातून सर्व रोपे एका वेळी न काढता ती लागतील तशी काढून त्यातील निवडक निरोगी रोपेच लागवडीसाठी वापरावीत.

पुन: लागवडीसाठी उपटलेली रोपे जर्मिनेटर ५० मिली + प्रोटेक्टंट ५० ग्रॅम १० लि. पाण्यात घेऊन त्या द्रावणात रोपे बुडवून लागवड करावी. म्हणजे नांगी न पडता रोपे लगेच सरळ उभी राहून पांढऱ्या मुळ्यांच्या जारवा वाढतो. त्यामुळे रोपे लवकर स्थिरावून जोमाने वाढ सुरू होते.

खरीप हंगामात फुलकोबीची लागवड सरी - वरंब्यावर ही करता येते.

शेतात रोपांची पुनर्लागवड संध्याकाळच्या वेळी करावी. कोणत्याही कारणामुळे फुलकोबीच्या रोपाचा शेंडा दुखावला गेल्यास रोपाची वाढ होते, मात्र अशा रोपावर गड्डा धरत नाही. अशा रोपांना वांझ (ब्लाइंड) रोपे म्हणतात. रोपांच्या लागवडीनंतर लगेच पाणी द्यावे. दुसरे पाणी त्यानंतर तिसऱ्या दिवशी द्यावे.

* खते आणि पाणी व्यवस्थापन : फुलकोबीच्या पिकाला हेक्टरी लागवडीपूर्वी १५ ते २० टन शेणखत आणि १५० किलो कल्पतरू सेंद्रिय खत द्यावे. रोपलागवडीनंतर २५ ते ३० दिवसांनी पुन्हा ७५ ते १०० किलो कल्पतरू सेंद्रिय खत बांगडी पद्धतीने गाडून देऊन लगेच पाणी द्यावे. रोप लागवडीनंतर लगेच पाणी द्यावे. तिसऱ्या दिवशी आंबवणीचे पाणी द्यावे. पावसाळी किंवा खरीप हंगामात शेतात पावसाचे पाणी साचू देऊ नये. तसेच जास्त दिवस पावसाचा ताण पडल्यास आवश्यकतेप्रमाणे रोपांना पाणी द्यावे. रब्बी हंगामात जमिनीचा प्रकार आणि हवामानाचा अंदाज घेऊन ७ ते ८ दिवसांनी पाणी द्यावे, तर उन्हाळी हंगामात ४ ते ५ दिवसांनी पाणी द्यावे. फुलकोबीची मुळे उथळ असल्यामुळे फुलकोबीच्या पिकाला ठिबक सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास फुलकोबीचे उत्पादन आणि मालाचा दर्जा सुधारतो आणी पाण्याची ४० ते ५० % बचत होते.

* आंतरमशागत : नियमितपणे पिकातील तण काढून रान स्वच्छ ठेवावे. विशेषत: खरीप हंगामात तणाची वाढ अतिशय झपाट्याने होते. रोपांच्या लागवडीनंतर पहिली खुरपणी ३ ते ४ आठवड्यात करावी. त्यानंतर आवश्यकतेप्रमाणे खुरपणी करून रोपाभोवतालची जमीन भुसभुशीत ठेवावी. फुलकोबीची मुळे उथळ असल्यामुळे खोलवर खांदणी किंवा खुरपणी करू नये. फुलकोबीला गड्डा घरू लागल्यावर रोपांना भर द्यावी. त्यामुळे गड्ड्याच्या ओझ्याने रोपे कोलमडणार नाहीत.

* फुलकोबीचे पांढरे गड्डे मिळण्यासाठी :

फुलकोबीच्या दुधाळ पांढऱ्या गड्ड्यांना बाजारात जास्त मागणी असते. फुलकोबीच्या हळव्या जातींचे गड्डे पिवळसर पांढऱ्या रंगाचे असतात तर निमगरव्या आणि गरव्या तसेच स्नोबॉल जातीचे गड्डे पांढरेशुभ्र असतात. अनेकदा फुलकोबीच्या गड्ड्यांवर प्रत्यक्ष सूर्यप्रकाश पडल्यामुळे गड्ड्यांना नैसर्गिक पांढऱ्या रंगाऐवजी त्याच्यावर पिवळी झाक येते आणि गड्ड्यांचा रंग पांढरा राहण्यासाठी गड्डे धरण्यास सुरुवात झाल्यावर लगेच गड्ड्याभोवतालची ३ - ४ पाने गड्ड्यावर एकत्र आणून घायपाताने किंवा रबर बँडने बांधून टाकावीत, याला 'ब्लिचिंग म्हणतात. त्यामुळे गड्ड्याचा प्रत्यक्ष सूर्यकिरणांशी संपर्क येत नाही आणि ते पांढरे शुभ्र राहतात. तसेच या अवस्थेत थ्राईवर ३० मिली + क्रॉपशाईनर ४० मिली + न्युट्राटोन ३० मिलीची १० लि. पाण्यातून फवारणी करावी. म्हणजे गड्ड्याचे पोषण होऊन घाण्या, काळी कूज न होता पांढराशुभ्र गड्डा मिळेल.

* महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे संरक्षण : कोबीवर्गीय भाजीपाला पिकांचे अनेक प्रकारच्या किडींमुळे मोठ्याप्रमाणावर नुकसान होते. पिकावर किडींची लागण झाल्यानंतर घाईघाईने मिळेल ते औषध फवारण्यापेक्षा कोणत्या किडी पिकावर केव्हा येतात, किडीची कोणती अवस्था पिकाचे नुकसान करते, नुकसानीचा प्रकार आणि किडींच्या कोणत्या अवस्थेमध्ये औषध फवारणी केल्यास किडीचा परिणामकारक बंदोबस्त होऊ शकतो, इत्यादी गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे.

१) मावा (आफिडस) : ही कीड कोबीवर्गातील सर्व भाजीपाला पिकांवर मोठ्या प्रमाणात आढळते. ह्या किडीची पिल्ले रंगाची असतात, तर प्रौढ कीड काळसर रंगाची असते. ह्या किडीची पिल्ले तसेच प्रौढ किटक कोवळ्या पानांतून अन्नरस शोषून घेतात. पानाच्या बेचक्यात, पानाखाली, फुलकोबीच्या गड्ड्याच्या आतील बाजूस ही कीड लपून बसते. किडींनी पानातील अन्नरस शोषून घेतल्यामुळे पाने पिवळी पडून गळून पडतात. रोपाची वाढ खुंटते, पाने आकसल्यासारखी रोगट, पिवळी दिसतात आणि उतपादन कमी येते.

* उपाय : थंडी आणि मधूनच पडणारे ढगाळ हवामान या किडीला अत्यंत पोषक असून अशा हवामानात या किडीची झपाट्याने वाढ होते. अशा हवामानात कीड दिसण्यापूर्वी किंवा दिसताच औषधे फवारणी केल्यास या किडीचा बंदोबसत करता येतो. यासाठी २० मिली मॅलॅथिऑन + २० ग्रॅम प्रोटेक्टंट १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

२) चौकोनि ठिपक्याचा पतंग (डायमंड बॅक मॉथ) : भुरकट रंगाच्या ह्या पाकोळीच्या पाठीवर चौकटीच्या आकाराचा पांढरा ठिपका असतो म्हणून ह्या किडीला 'चौकोनी ठिपक्याचा पतंग ' हे नाव पडले आहे. या किडीचा पतंग कोबीवर्गीय भाज्यांच्या पानांवर पिवळसर राखी रंगाची अंडी घालतो. त्यातून फिकट हिरव्या किंवा भुरकट रंगाच्या अळ्या बाहेर पडतात. ह्या अळ्या पानाच्या खालच्या बाजूस राहून पानाचा पृष्ठभाग खरडून खातात. त्यामुळे पानांवर असंख्य छिद्रे पडून पान चाळणीसारखे दिसते. किडीचे प्रमाण वाढल्यास पानाची चाळणी होऊन पानाच्या शिराच शिल्लक राहतात. सप्टेंबर ते मार्च ह्या काळात कोबीवर्गीय पिकांवर महाराष्ट्रात ही कीड सर्वत्र आढळते.

* उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी रोपांची पुनर्लागवड केल्यानंतर १० -१२ दिवसांच्या अंतराने १० लिटर पाण्यात २० मिली क्विनॉलफॉस आणि २० ग्रॅम प्रोटेक्टंट या प्रमाणात मिसळून २- ३ फवारण्या कराव्यात.

३) मोहरीवरील काळी माशी (मस्टर्ड सॉफ्लाय) : ही बारीक, जाडसर, काळपट पिवळस रंगाची माशी असून ती पानांच्या पेशीत अंडी घालते. त्यातून काळसर रंगाच्या अळ्या बाहेर पडतात. या अळ्या कोवळ्या पानाच्या कडेपासून पाने खाण्यास सुरुवात करून संपूर्ण रोपंवरील पाने खातात. पानकोबी, फुलकोबी ह्या पिकांशिवाय मुळा, मोहरी इत्यादी पिकांवर ही कीड आढळते.

४) कोबीवरील फुलपाखरू (कॅबेज बटरफ्लाय) : कोबीवर्गीय भाज्यांच्या पानांवर पांढऱ्या रंगाचे मोठे फुलपाखरू अंडी घालते. त्यातून निघणाऱ्या हिरव्या अळ्या पानांचा पृष्ठभाग खातात आणि पाने गुंडाळून स्वत: भोवती जाळी तयार करतात. त्यामुळे पानांवर असंख्य छिद्रे दिसतात. पिकाचे खूप नुकसान होते.

५) पानावर जाळी विणणाऱ्या अळ्या (लिफ वेबर) : ह्या किडीच्या फिकट हिरव्या रंगाच्या अळ्या पानांचा पृष्ठभाग खातात आणि पाने गुंडाळून स्वत:भोवती जाळी तयार करतात. त्यामुळे पानांची अन्न तयार करण्याची क्रिया मंदावते.

* गड्डा पोखरणारी अळी (ग्रॅम केटरपिलर) :

फिकट पिवळसर विटकरी रंगाचे हे पतंग कोबीच्या पानांवर अंडी घालतात. त्यातून बाहेर पडलेल्या अळ्या तांबूस करड्या रंगाच्या असतात. ह्या अळ्या पाने खातात आणि पानांमागे लपून बसतात. ह्या अळ्या गड्डे पोखरून आत शिरतात आणि आतील भागावर उपजीविका करतात. त्यामुळे गड्ड्यांची प्रत खराब होते.

* उपाय : वरील सर्व किडींच्या नियंत्रणासाठी १० लिटर पाण्यात २० ग्रॅम प्रोटेक्टंट, १० मिली मॅलॅथिऑन आणि २० मिली क्विनॉलफॉस (इकॅलक्स) मिसळून लागवडीनंतर १५ ते २० दिवसांच्या अंतराने २ ते ३ फवारण्या केल्यास कोबीवरील पाने कुरतडणाऱ्या तसेच गड्डा पोखरणाऱ्या सर्व प्रकारच्या अळ्यांचे नियंत्रण होते.

* फुलकोबीतील शारीरिक विकृती व त्यांचे नियंत्रण :

१) बटनिंग (गड्डा अतिलहान पडणे) : काही वेळा खते, पाणी आणि चांगली मशागत करूनही फुलकोबीचा गड्डा अतिशय लहान बटनासारखा येतो.

*उपाय : रोपवाटिकेत तसेच रोपांची शेतात लागवड केल्यानंतर वाढीच्या काळात खते, पाणी, आंतरमशागत तसेच किडी व रोगांचे नियंत्रण, इत्यादी बाबी लक्षपूर्वक हाताळून पिकाची एकसारखी जोमदार वाढ होईल याची काळजी घ्यावी. अतिशय जून, खुरटलेली, कीड आणि रोगग्रस्त रोपे लागवडीसाठी वापरू नयेत.

२) रायसीनेस : या विकृतीमध्ये फुलकोबीच्या गड्ड्याचा पृष्ठभाग तांदूळ पसरल्यासारखा खडबडीत किंवा फुलांच्या बारीक कळ्या पसरल्यासारखा दिसतो. त्यामुळे फुलकोबीच्या गड्ड्याची प्रत खालावाते. विशेषत: फुलकोबीच्या ठराविक हंगामातील जातींसाठी पोषक तापमानापेक्षा कमी अथवा अधिक तापमान असल्यास ही विकृती दिसून येते. काही जाती तापमानातील बदल सहन करू शकतात तर काही संवेदनशील जातीत तापमानात थोडासा बदल झाला तर ही विकृती दिसून येते. फुलकोबीच्या गड्ड्यांची काढणी उशिरा केल्यावर ही विकृती निर्माण होते. काही प्रमाणात हा अनुवांशिक दोष समजला जातो.

* उपाय : तापमानात जास्त चढउतार असणाऱ्या भागात प्रतिकारक जातींची निवड करावी. फुलकोबीची काढणी योग्य वेळी करावी. ठराविक हंगामासाठी योग्य जातींची निवड करावी आणि खात्रीलायक बियाणे वापरावे.

३) ब्लाइंडनेस (वांझ रोप ) : फुलकोबीच्या रोपाचा शेंडा खुडला गेल्यास अथवा किडी किंवा रोगांमुळे त्याला इज झाल्यास अशा रोपाला गड्डा धरत नाही. अशा रोपांची पाने रुंद, मोठी, काळपट हिवरी आणि जाडसर राठ असतात.

* उपाय : फुलकोबीच्या लागवडीसाठी निवडक, जोमदार, निरोगी आणि शेंडा असलेली रोपे वापरावीत. शेंडा नसलेली रोपे लागवडीत दिसल्यास नांगे भरताना ती काढून टाकून त्या ठिकाणी निरोगी शेंडा असलेली रोपे लावावीत.

४) गड्डा कुजणे (ब्राऊन रॉट) : ह्या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे ही विकृती आढळून येते. फुलकोबीचा गड्डा धरू लागेपर्यंत सहसा हा दोष दिसून येत नाही. पण गड्डे धरण्यास सुरुवात झाल्यावर खोड आणि गड्ड्यावर भुरकट डाग दिसतात आणि त्यातून पाणी बाहेर येते. गड्ड्याचा दांडा पोकळ आणि काळपट पडून कुजू लागतो. संपूर्ण गड्ड्यावर भुरकट काळे, कुजकट डाग दिसतात. म्हणून ह्या विकृतीला गड्डा कुजणे (ब्राऊन रॉट) ही विकृती म्हणतात. बाजारात अशा गड्ड्यांना अजिबात मागणी नसते.

* उपाय : ज्या जमिनीत सेंद्रिय खतांची कमतरता आहे. अशा जमिनीत हा रोग अधिक प्रमाणात दिसून येतो. म्हणून फुलकोबीच्या पिकाला शेणखत, लेंडीखत अथवा हिवळीच्या खतांचा नियमित पुरवठा करावा. एकाच जमिनीत सतत कोबीवर्गीय पिके न घेता मूग, उडीद, हरभरा, वाटाणा यासारखी कडधान्याची पिके फेरपालट म्हणून घ्यावीत. बोरॉनची कमतरता असलेल्या जमिनीत बोरॅक्स पावडर हेक्टरी २० किलो या प्रमाणात मिसळून घ्यावी किंवा प्रत्येकी ३ ते ४ मिली प्रती लि. पाण्यातून थ्राईवर, क्रॉपशाईनर पिकावर फवारावे.

५) व्हिप टेल : या विकृतीमध्ये फुलकोबीच्या पानाची नेहमीसारखी वाढ न होता पाने अरुंद आणि खुरटलेली दिसतात. पण चाबकाच्या (व्हिप टेल ) टोकासारखे लांब वाढलेले दिसते. झाडाचा शेंडा खुरटलेला राहतो आणि गड्डा भरत नाही. मॉलिब्डेनम ह्या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे ही विकृती दिसून येते. ज्या जमिनीचा सामू ४.५ पेक्षा कमी असतो अशा ठिकाणी ही विकृती दिसून येते.

* उपाय : जमिनीत चुना मिसळून जमिनीची आम्लता कमी केल्यास ही विकृती कमी होते. हेक्टरी १.२ किलो अमोनियम किंवा सोडियम मॉलिब्डेट जमिनीत मिसळल्यास ही विकृती टाळता येते.

* महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण :

१) रोपे कोलमडणे (डॅपिंग ऑफ) : हा रोग जमिनीत वाढणाऱ्या बुरशीपासून होतो. प्रामुख्याने उष्ण आणि दमट हवामान, पाण्याचा योग्य निचरा न होणाऱ्या जमिनीत असलेल्या रोपवाटिकेतील रोपांवर या रोगाची लागण होते. बुरशीची लागण झालेली रोपे निस्तेज, पिवळसर दिसतात. रोपांचे जमिनीलगतचे खोड कुजून रोपे कोलमडतात.

* उपाय : या रोपाची लागण पावसाळी हंगामात जास्त प्रमाणात होते म्हणून पावसाळी हंगामात रोपे नेहमी पाण्याचा उत्तम निचरा असलेल्या ठिकाणी गादीवाफ्यावर तयार करावीत. लागवडीपुर्वी जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर, प्रत्येकी २५ मिली १० लिटर पाण्यात मिसळून हे द्रावण गादीवाफ्यावर झारीने शिंपडावे. तसेच लागवडीपुर्वी रोपे जर्मिनेटर ५० मिली + ५० ग्रॅम प्रोटेक्टंट + १० लि. पाणी या द्रावणात बुडवून लागवड करावी.

२) काळी कूज (ब्लॅक लेग) : हा बुरशीजन्य रोग पावसाळी हंगामात बहुतेक सर्व भागांत आढळतो. ह्या रोगाचा प्रसार बियाण्यात वाढणाऱ्या बुरशीपासून होतो. त्यामुळे रोपाच्या वाढीच्या सुरूवातीसच रोगाचा प्रादुर्भाव होतो. रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या रोपांची सर्व मुळे खालून वरच्या भागाकडे कुजत जाऊन रोप सुकून कोलमडते रोपाचे खोड उभे कापल्यास आतील भाग काळा झालेला असतो.

* उपया : ह्या रोगाचा प्रसार बियाण्यामार्फत होत असल्यामुळे लागवडीपूर्वी बियाण्याचे निर्जंतुकीकरण करावे.

३) केवडा (डाऊनी मिल्ड्यू) : केवडा हा बुरशीजन्य रोग कोबीवर्गीय पिकांवर सर्वच भागांत आढळून येतो. रोगग्रस्त पानांवर पिवळसर किंवा जांभळट रंगाचे डाग दिसतात. पानाच्या खालच्या भागावर त्या ठिकाणी भुरकट केवड्याच्या बुरशीची वाढ झालेली दिसते. गड्ड्याची काढणी लांबल्यास गड्ड्यांवर काळपट चट्टे दिसतात आणि असे गड्डे सडू लागतात. पावसाळी दमट हवेत हा रोग झपाट्याने पसरतो.

* उपाय : रोगाला पोषक हवामान आढळून आल्यास किंवा रोगाची प्राथमिक लक्षणे दिसताच पिकावर १% बोर्डो मिश्रण फवारावे तसेच १० लिटर पाण्यात हार्मोनी १५ मिली आणि थ्राईवर, क्रॉपशाईनर, न्युट्राटोन प्रत्येकी २५ मिलीच्या १० दिवसांच्या अंतराने २ फवारण्या कराव्यात.

४) करपा (ब्लॅक स्पॉट) : ह्या बुरशीजन्य रोगाचा प्रसार बियाण्यात वाढणाऱ्या बुरशीपासून होतो. बुरशीचा प्रादुर्भाव झालेल्या रोपांची पाने, देठ आणि खोडावर वर्तुळाकार किंवा लंबगोला काळसर रंगाचे डाग दिसू लागतात. नंतर हे डाग एकमेकांत मिसळून लागण झालेला सर्व भाग करपल्यासारख्या काळपट रंगाचा दिसतो. कोबी आणि फुलकोबीच्या तयार गड्ड्यावर तसेच बियाणे तयार होणाऱ्या काळात रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. अशा रोगट झाडापासून तयार झालेल्या बियाण्यापासून रोगाचा प्रसार होतो.

* उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी पिकावर १० लिटर पाण्यात थ्राईवर ३० मिली + क्रॉपशाईनर ३० मिली + २५ ग्रॅम प्रोटेक्टंट + १ ग्रॅम स्ट्रेप्टोसायक्लीन औषध मिसळून फवारणी करावी.

५) भुरी (पावडरी मिल्ड्यू) : कोबीवर्गीय पिकांवर भुरी हा बुरशीजन्य रोग क्वचित प्रसंगी आढळतो. सुरूवातीला पानाच्या वरच्या बाजूला पांढऱ्या रंगाचे ठिपके दिसतात. नंतर संपूर्ण पानावर करड्या पांढरट रंगाची बुरशी वाढलेली दिसते.

* उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी रोगाची लागण दिसून येताच १० लिटर पाण्यात ३० ग्रॅम पाण्यात विरघळणारे गंधक मिसळून फवारणी करावी.

६) मूळकुजव्या (क्लबरूट) : बुरशीजन्य रोगामुळे झाडाच्या मुळांवर अनियमित गाठी तयार होतात. झाडाची पाने पिवळी पडतात आणि सुकतात. ज्या जमिनीचा सामू ७ पेक्षा कमी आहे अशा जमिनीत ह्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळतो.

* उपाय : जमिनीत चुना टाकून जमिनीचा आम्लविम्ल निर्देशांक वाढवावा. तसेच लागवडीपूर्वी रोपे जर्मिनेटरच्या द्रावणात बुडवून नंतर रोपांची लागवड करावी.

७) घाण्यारोग किंवा काळी कुज (ब्लॅक रॉट) : कोबीवर्गीय पिकांची लागवड असलेल्या जागातील सर्व भागांत हा रोग आढळून येतो. हा रोग जिवाणूंमुळे होतो. उष्ण आणि दमट हवामानात ह्या रोगाचा अतिशय झपाट्याने प्रसार होतो. ह्या रोगामुळे पाने पिवळी पडतात. पिवळेपणा हा पानाच्या कडांपासून सुरू होतो आणि मध्यभागाकडे वाढत जाऊन शेवटी इंग्रजी 'v' आकाराचा डाग तयार होतो. हा डाग पानाच्या मुख्य शिरेपर्यंत पसरत जाऊन लागण झालेला भाग कुजून वाळून जातो. रोगट भागातील पानाच्या शिरा काळ्या पडतात. असा भाग मोडून पहिल्यास त्यातून काळसर द्रव निघतो आणि त्याला दुर्गंधी येते. म्हणून त्याला 'घाण्यारोग' असे म्हणतात. अशी रोगट रोपे गड्डा न घरताच सुकून जातात. रोगाची लागण उशिरा झाल्यास रोग गड्ड्यापर्यंत पसरतो. त्यामुळे कोबी - फ्लॉवरचे गड्डे पूर्ण सडून जातात.

* उपाय : या रोगाचे जिवाणू बियाण्यामार्फत पसरतात म्हणून रोगमुक्त बियाणे वापरावे.

* रोग : कीड आटोक्यात ठेवण्यासाठी पिकांची फेरपालट ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची बाब आहे. सतत एकाच जमिनीत कोबीवर्गीय भाज्यांचे पीक घेण्याचे टाळावे. एका जमिनीत तीन वर्षांतून एकदाच कोबीवर्गीय पीक घेऊन नंतर इतर पिकांची फेरपालट होईल असे नियोजन करावे.

घाण्यारोगाबरोबरच इतरही रोग व किडींच्या तसेच विकृतीच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून तसेच दर्जेदार अधिक उत्पादनासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या खालीप्रमाणे नियमित वेळेवर फवारण्या घ्याव्यात.

फवारणी :

१) पहिली फवारणी : ( लागवडीनंतर १० ते १५ दिवसांनी ) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली.+ प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + प्रिझम १०० मिली. + हार्मोनी १५० मिली + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (लागवडीनंतर २५ ते ३० दिवसांनी) : जर्मिनेटर ३५० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + हार्मोनी २५० मिली + १५० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : (लागवडीनंतर ४० ते ४५ दिवसांनी) : थ्राईवर ७५० मिली. + क्रॉंपशाईनर ७५० मिली.+ राईपनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + न्युट्राटोन ५०० मिली. + हार्मोनी ३०० ते ३५० मिली + २०० लि.पाणी.

४) चौथी फवारणी : (लागवडीनंतर ५५ ते ६० दिवसांनी) : थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर ७५० मिली. + न्युट्राटोन ७५० मिली.+ हार्मोनी ४०० मिली + २५० लि. पाणी.

* काढणी आणि उत्पादन : फुलकोबीच्या पूर्ण वाढलेल्या गड्ड्याची लगेच काढणी करावी. तयार गड्डे एकदोन दिवस शेतात राहिल्यास त्यांची प्रत खराब होते. गड्ड्यांचा रंग पिवळसर होतो. त्यांचा तजेलदारपणा आणि आकर्षकपणा कमी होतो. गड्डे एकसंघ घट्ट न राहता ढिले पडतात आणि गड्ड्याचा पृष्ठभाग खडबडीत दिसू लागतो. अशा गड्ड्यांना बाजारात मागणी नसते.

हळव्या जाती रोपांच्या लागवडीपासून ६० ते ७५ दिवसांत काढणीला तयार होतात. तर निमगव्या आणि गरव्या जाती ७५ ते १०५ दिवसांत तयार होतात. अशा तयार गड्ड्याचा खालचा दांडा भोवतालच्या पानांसह कापावा. नंतर गड्ड्याभोवतीची तीन - चार पाने ठेवून बाकीची मोठी पाने आणि दांडा गड्ड्यालगत कापावा. या पानांचा जनावरांसाठी वैरण म्हणून उपयोग होतो. गड्ड्याभोवती राखलेल्या ३ - ४ पानांमुळे वाहतुकीत गड्डे एकमेकांना घासून खराब होत नाहीत. गड्ड्यांची वाहतूक ट्रक अथवा ट्रोलीतून करायची असल्यास गड्ड्याभोवताली जास्त पाने राखावीत.

गड्ड्याचा आकार, घट्टपणा आणि रंग पाहून मालाची प्रतवारी करावी. लांबच्या बाजारासाठी गड्डे लाकडी खोक्यांत, करंड्यांत अथवा प्लास्टिक क्रेटमध्ये भरून पाठवावेत. अशा वेळी गड्ड्याभोवती अतिशय कमी पाने राखावीत.

फुलकोबीच्या पिकाचे उत्पादन योग्य जातीची निवड, स्थानिक हवामान आणि शेतकऱ्यांची उत्पादन कुशलता आणि नियोजन या गोष्टींवर अवलंबून असते. फुलकोबीचे गड्डे तयार होताना तापमान २५ डी सेल्सिअसपेक्षा जास्त असल्यास गड्डे लहान, विरळ, पिवळसर रंगाचे, कमी प्रतीचे तयार होतात आणि हेक्टरी ९ ते १० टनांपर्यंत उत्पादन मिळते. अनुकूल हवामान असल्यास १० ते १२ टन उत्पादन येते, तर गरव्या जातींचे उत्पादन १५ ते २० टन मिळते. दीर्घ काळ थंडी आणि अनुकूल हवामान असल्यास स्नोबॉल गटातील जातींचे उत्पादन २० ते ३० टनांपर्यंत मिळते. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वेळापत्रकाप्रमाणे वापर करून प्रतिकूल हवामानातही याहून अधिक, दर्जेदार उत्पादन मिळविल्याचे महाराष्ट्रातील विविध भागातील (नाशिक, पुणे, नारायणगाव, सातारा, सांगली ) शेतकऱ्यांचे अनुभव आहेत.