आस्वाद आळू - सहज, सतत पैसा मिळवून देणारी 'आम' शेतकऱ्याची कामधेनू

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


आळू हे भाजीवर्गीय पीक असून बारमाही घेता येते खेडेगावामध्ये, प्रत्येक घराच्या परस अंगणामध्ये सांडपाण्याच्या ठिकाणी किंवा न्हाणीच्या जागेमध्येही याची लागवड चांगल्याप्रकारे होते. आळूची लागवड कंदापासून केली जाऊन कंद करड्या रंगाचे, उभट कर्दळाच्या कंदासारखे असतात. हे सहसा मरत नाहीत. आळू पिकास पाणी जादा प्रमाणात आवडते. दलदलीच्या ठिकाणी (Marshy Place) पाण्याच्या दबक्याजवळही हे चांगल्याप्रकारे वाढते. त्याचप्रमाणे साबणाचे, सांडपाण्याचे पाणी हे स्वच्छ केले जाऊन याचा वापर आळू चांगल्याप्रकारे वाढीसाठी करून घेते. डबक्याच्या ठिकाणी याची लागवड केल्यास डासांचा प्रादुर्भावही कमी होतो. हा एक चांगला अनुभव आहे. गुजरातमध्ये सकाळचा नाष्टा म्हणजे ढोकळा, भावनगरी आणि आळूची वडी, जसे महाराष्ट्रात कांदापोहे तसे हमखास ठरलेले आहे. बरेच गुजराती अमेरिकेमध्ये न्युजर्सी येथे स्थायिक झाले आहेत. न्युजर्सीमध्ये वावरताना आपण पुण्याच्या ट्रॉफिकमध्ये आहोत असे वाटते. अमेरिकेतील न्युजर्सी शहरामध्ये जे भारतीय आहेत. त्यांच्या या दैनंदिन गरजा (भाजीपाला किराणा) पुरविण्यासाठी दुकाने व हॉटेल थाटली आहेत.

आळूच्या उकडून केलेल्या ५०० ग्रॅम वड्या (४० ते ५० वड्या ) हवा बंद डब्यातून साधारण ४ ते ५ डॉंलरला तेथे मिळतात. त्या वड्यांना अमेरिकेत पात्रा (Patra ) म्हणतात. महणजे ह्या घरी तव्यावर ताबडतोब परतून न्याहरीमध्ये वापरता येतात. जपान, थायलंड, मलेशिया, ऑस्ट्रेलिया या पुर्वेकडील देशात तसेच युरोप, अमेरिकेत भारतीय लोक मोठ्या प्रमाणात नोकरी व्यवसायामध्ये स्थलांतरीत झाले आहेत. ते व त्यांचे मित्र मंडळी मोठ्या चवीने हा पदार्थ खातात.

लग्न समारंभामध्ये मसालेभाताबरोबर आळूमध्ये मुळा, शेंगदाणा, गूळ, चिंच टाकून केलेली भाजी खाणे प्रचलित आहे. पुण्यासारख्या शहरामध्ये पेशावाईच्या काळात आळूशिवाय पक्वानाचे जेवण पुर्ण होत नसे. पितृपंधरवड्यामध्ये हॉटेल्समध्ये आळूची भाजी, आळूची वडी नाविन्यपूर्ण म्हणून तर लग्नामध्ये आहारामध्ये वापरली जाते. आळूची भाजी सारक आहे. पानांपासून वड्या व देठांपासून मुळ्याबरोबर भाजी केली जाते. आळूची भाजी बद्धकोष्टता, पोटाचे विकार यावर उपयुक्त आहे.

आळूचे कंद, पाने आणि देठ यांचा उपयोग भाजीसाठी केला जातो. आळूच्या पानांपासून वड्या आणि भजी तयार करतात. आळूच्या कांदांपासून चिप्स तयार करता येतात. आळूची पाने आणि कंद यामध्ये असलेल्या 'कॅल्शियम ऑक्झेलेट, रॅफाईडस' या द्रव्यांमुळे आळू खाताना घसा खवखवतो, परंतु आळू शिजविताना चिंच व गुळाचा वापर केल्यास ही द्रव्ये कमी होतात. त्यामुळे घसा खवखवण्याचे प्रमाण कमी होते. आस्वाद आळूमध्ये मात्र कॅल्शियम ऑक्झेलेट रॅफाईडस हे द्रव्य कमी प्रमाणात असल्यामुळे याची भाजी खाताना घसा खवखवत नाही असा अनेकांचा अनुभव आहे. आळूचे कंद आणि पाने यातील प्रोटीन्समुळे कोणत्याही प्रकारची अॅलर्जी होत नसल्यामुळे बनविलेले अन्नपदार्थे लहान मुले, आजारी आणि अशक्त माणसांसाठी ही उपयुक्त आहेत.

आळूची पाने आणि कंद ही दोन्ही आहारदृष्ट्या पौष्टिक आहेत. आळूची पाने आणि कंद यामध्ये कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, खनिजे तसेच जीवनसत्त्व 'अ' आणि 'ब' भरपूर प्रमाणात असते.

आळूमध्ये ऑक्झलेटस (Ozalates) असते. यामुळे मुतखडा (urine Stone) होण्याची शक्यता असते. यावर कुरडूच्या पाल्याचा रस किंवा पानकुटीच्या पाल्याचा (Briophylum ) रस घेतला तर असा मुतखडा कमी झाल्याचे अनुभव आहेत. मुतखड्यावर कुरडूच्या ३ ते ५ ग्रॅम बिया चमचाभर साखरेबरोबर दररोज सकाळी ७ दिवस नियमित खाल्ल्याने मुतखडा बरा होता.

आळूच्या १०० ग्रॅम खाण्यायोग्य भागात असणारे अन्नघटक

अन्नघटक   प्रमाण (%)  
  आळूची पाने   आळूचे कंद   आळूचे देठ  
पाणी   ८३   ७३   ९४  
कार्बो हायड्रेटस   ६.८   २१.१   ३.६  
प्रोटीन्स   ३.९   ३.१   ०.३  
खनिजे   ०२   ०.०४   ०.०६  
कॅल्शियम   ०.२   ०.०४   ०.०  
लोह   ०.०१   ०.००२   ०.०००५  
कॅरोटिन   ०.०१   ०.००००२   ०.०००१  
जीवनसत्त्व 'ब'   ०.०००५   ०.०००१   ०.०००१  
जीवनसत्त्व 'क'   ०.०१२   -   ०.००३  
उष्मांक (कॅलरीज)   ५६   ९७   -  


भारतामध्ये प्रामुख्याने दक्षिण आणि पूर्वेकडील राज्यामध्ये हे पीक घेतले जाते. उत्तर भारतात आळूच्या कंदांना 'आरवी' असे म्हणतात.

आळू या भाजीपाला पिकाचे उगमस्थान भारत - मलाया यामधील प्रदेश असून तेथून त्याचा प्रसार आग्नेय आशिया, चीन, जपान आणि पॅसिफिक बेटात झाला. कोकणातील नारळ आणि सुपारीच्या बागेत आळूच्या लागवडीस बराच वाव आहे.

हवामान : आळूला उष्ण आणि दमट हवामान मानवते, कडाक्याच्या थंडीत आळूची वाढ खुंटते. आळूच्या लागवडीसाठी सरासरी २१ अंश सेल्सिअस तापमान असावे.

जमीन - रेताड आणि भुसभुशीत जमिनीत आळू चांगला फोफावतो आळूच्या योग्य वाढीसाठी जमिनीचा आम्ल - विम्ल निर्देशांक ५.५ ते ७ इतका असावा. तरीपण आळू हे पीक चोपण, खारपत जमिनीत तसेच सांडपाण्याच्या जागेतसुद्धा पानांच्या उत्पादनासाठी घेता येते.

आळूच्या जाती : आळूच्या स्थानिक जातींची लागवड बऱ्याच ठिकाणी केली जाते. उत्तर भारता त फैजाबादी, लहरा, देशी, बंडा या स्थानिक जाती लोकप्रिय आहेत. तर महारष्ट्रात काळ्या देठाचा लहान ते मध्यम पानांचा आळू चांगला समजला जातो. पंजाबमध्ये एस - ३, एस -११ या जातींची लागवड केली जाते आळूची व्यापारी तत्त्वावर लागवड करण्यासाठी अधिक उत्पादन देणाऱ्या आळूच्या जाती संशोधन करून विकसित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी कन्दयासी - ७, सी - ९, सी - १३५. सी -१४९, सी - २६६ तसेच पंचमुखी आणि सतमुखी या जाती त्यांच्या कंदांची आणि पानांची भाजी करण्यासाठी वापरतात.

महारष्ट्रात दापोली -१ ही जात आळूच्या पानांपासून वड्या तयार करण्यासाठी वापरतात.

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने निर्माण केलेला आस्वाद आळू

आस्वाद आळू : पानांमध्ये कॅल्शियम ऑक्झेलेट रॅफाईडसचे प्रमाण कमी असते त्यामुळे घसा खवखवत नाही. वड्या बनवताना तेल कमी लागते. पीठ कमी लावल्यानंतरही वड्या जास्त खुसखुशीत व चविष्ट लागतात. ज्याप्रमाणे पॅटिस, मूगवडा, भजी खाल्ली जातात त्यापेक्षाही अधिक चविष्ट या वड्या लागतात. म्हणून याला आस्वाद आळू असे नाव दिले आहे. प्रत्येकाने या आळूचा एकदा तर आस्वाद घ्यावा यासाठी आपल्या परसात १०० कंद तरी लावावेत. इतर पदार्थांसारख्या या आळूच्या वड्या लवकर खराब होत नाहीत

महारष्ट्र, भारतच नव्हे तर जगातल्या अनेक कोरड्या, मध्यम थंड हवामानात व हलक्या ते मध्यम पोयटा, काळ्या जमिनीत जगभरातील बऱ्यापैकी पाण्याची उपलब्धता असलेल्या शंभरहून अधिक देशात या आळूची लागवड करून गृहीणींना व उद्योजकांना फार मोठे आर्थिक श्रोताचे दालन खुले होणार आहे. आळूच्या कंदाचा वापर करण्यासाठी प्रामुख्याने दक्षिण भारतात आणि उत्तर पुर्व भारतात शिफारस करण्यात आलेल्या जाती पुढे दिलेल्या आहेत.

१) सतमुखी : आळूच्या या वाणाच्या झाडांची उंची १०० -१५० सेंमी. कंद मध्यम आकाराचे पुष्ट आणि संख्येने जास्त असतात. शिजवल्यानंतर चांगले गळतात. कंदाचे सरासरी उत्पन्न हेक्टरी १५ -२० टन मिळते.

२) श्रीरश्मी : आळूच्या या वाणाच्या झाडांची उंची १०० - १५० सेंमी, उंची सरळ वाढ, पाने मध्यम आकारीची रुंद, पानांचे देठ गर्द हिरव्या जांभळ्या रंगाचे, कंद मध्यम मोठे, लांबुळक्या आकाराचे, सरासरी उत्पन्न हेक्टरी १५ - २० टन येते. या वाणाच्या कंदा मध्ये १५ % स्टार्च आणि २.५ % प्रोटीन्स असतात.

३) श्री पल्लवी : आळूच्या या वाणांच्या झाडांची उंची १०० - १५० सेंमी, सरळ उंच वाढ, पानांचे देठ हिरव्या रंगाचे, कंद मोठ्या आकाराचे, संख्येने जास्त (२० -२५) असून शिजल्यानंतर सहजपणे गळतात. उत्पन्न हेक्टरी १५ - १८ टन, कंदामध्ये १६ - १७% स्टार्च आणि २ - ३ % प्रोटीन्स असतात.

अभिवृद्धी : आळूच्या लागवडीसाठी कोंब फुटलेले आणि निवडक कंद वापरावे. हेक्टरी ८०० - १००० किलो बेणे लागते.

बेणे लागवडीपूर्वी जर्मिनेटर १ लि. आणि प्रोटेक्टंट १ किलोचे १०० लि. पाण्यात बॅलरमध्ये द्रावण तयार करून त्यामध्ये कंद बुडवून लावावेत.

हंगाम आणि लागवड पद्धती : जमीन नांगराने १५ ते २० सेंटिमीटर खोल नांगरून ढेकळे फोडून भुसभुशीत करावी. जमीन तयार करताना हेक्टरी २५ ते ३० टन शेणखत किंवा कंपोस्ट खत आणि २०० किलो कल्पतरू सेंद्रिय खत द्यावे.

आळूची लागवड फेब्रुवारी - मार्च किंवा जून - जुलैमध्ये सरी - वरंबा पद्धती ने करतात. ४५ x ३० सेंमी अंतरावर ६ - ८ सेमी खोल लागवड करावी.

खते आणि पाणी व्यवस्थापन : अधिक उत्पादनासाठी हेक्टरी ५० - ६० गाड्या कुजलेले शेणखत लागवडीपूर्वी द्यावे. आळूच्या पिकाला हेक्टरी १०० किलो नत्र, १०० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश द्यावे. नत्र २ - ३ हप्त्यांत विभागून द्यावे.

लागवड पूर्ण झाल्यावर एक हलके पाणी द्यावे. नंतर नियमित पाणी द्यावे, पण वाफ्यात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. अन्यथा मूळकूज रोगाची संभावना राहते. उन्हाळ्यात १० -१२ दिवसांच्या अंतराने आणि हिवाळ्यात १८ -२० दिवसांच्या अंतराने नियमित पाणी द्यावे.

कंदासाठी लागवड केलेल्या आळूपिकामध्ये खुरपणी करून शेत स्वच्छ ठेवावे. मातीची भर द्यावी. फुटवे जास्त निघाल्यास १ - २ जोमदार फुटवे ठेवून बाकीचे कापून घ्यावीत.

महत्त्वाच्या किडी, रोग आणि त्याचे नियंत्रण : आळू पिकावर काही वेळा पाने कुरतडणारी आळी आणि मावा किडीचा प्रादुर्भाव होतो. त्यांच्या नियंत्रणासाठी थायोडान ०.२% प्रमाणे किंवा मॅलॅथिआन ०.१ प्रमाणे फवारणी करावी. या पिकामध्ये हुमणी किंवा वाळवीचा उपद्रव आढळल्यास क्लोरोपायरीफॉस या कीटकनाशकाचा जमिनीतून वापर करावा.

आळू पिकावर फारसे रोग पडत नाहीत. काही वेळा करपा रोगाचा पावसाळ्यात प्रादुर्भाव होतो. त्यासाठी रोगट पाने काढून टाकावी आणि १% बोर्डो मिश्रण फवारावे.

वरील किडी व रोगांस प्रतिबंधक उपाय म्हणून तसेच पानांचे उत्पादन, पानांचा दर्जा म्हणजे मोठ्या आकाराची हिरवीगार, रसरशीत पाने मिळण्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या खालीलप्रमाणे फवारण्या कराव्यात -

फवारणी :

१) पहिली फवारणी : (कोंब फुटल्यानंतर १० ते १५ दिवसांनी ) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली.+ प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम १०० मिली. + हर्मोनी १०० मिली + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (पीक १ महिन्याचे असताना ) : जर्मिनेटर ३५० ते ४०० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली.+ प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + हार्मोनी २०० मिली + १५० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : (पीक दीड महिन्यासे असताना) : जर्मिनेटर ५०० ते ६०० मिली. + थ्राईवर ७५० मिली. + क्रॉंपशाईनर ७५० मिली.+ राईपनर २५० मिली. + प्रोटेक्टंट ७५० ग्रॅम + न्युट्राटोन ५०० मिली + हार्मोनी ३०० मिली + २०० लि.पाणी.

४) चौथी फवारणी : (पानांची काढणी चालू झाल्यानंतर दर १५ दिवसांनी ): जर्मिनेटर ७५० मिली + थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर ५०० मिली + प्रिझम ५०० मिली + प्रोटेक्टंट १ किलो + न्युट्राटोन ५०० मिली + हार्मोनी ४०० मिली + २५० लि. पाणी.

वरीलप्रमाणे सतत पाने मिळण्यासाठी कल्पतरू व गांडूळ खत, जमीन हलक्या असल्यास वरील खतांबरोबर काही प्रमणात रासायनिक खत २ ते ३ महिन्यांनी एकदा द्यावे. तसेच महिन्यातून १ ते २ वेळा जरुरीप्रमाणे सप्तामृताची फवारणी करावी.

या फवारणीमुळे पानांच्या कापणीनंतर नवीन पाने लवकर मोठी होऊन त्याचा आकार व दर्जा उत्तम मिळतो. पानांचे उत्पादन वाढते.

आळूची पाने लागवडीनंतर १.५ ते २ महिन्यांतच काढायला येतात. पाने देठासह कापून गड्ड्या बांधून विक्रीला पाठवावीत. एकदा केलेल्या लागवडीपासून १.५ ते २ वर्षे पाने मिळत राहतात.

आळूचे कंदासाठी लावलेले पीक ८ - ९ महिन्यात तयार होते. पाने पिवळी पडून सुकू लागतात, तेव्हा कुदळीने खणून कंद काढावेत.

कंदांचे हेक्टरी २० - ३० टन उत्पादन मिळते. काढणीनंतर हे कंद ५ - ६ दिवस सावलीत पसरून वाळवावेत. नंतर नासके कंद काढून टाकावे आणि निवडक चांगले कंद पोत्यात किंवा करंड्यात भरून विक्रीला पाठवावेत.