शबरी जांभूळ

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


जांभळाचे झाड मोठे, सदापर्णी वृक्ष आहे. फांद्या लोंबणाऱ्या असून त्यावर साधी, लांब टोकदार, समोरासमोर पाने असतात. खोडाचा रंग पांढुरका असतो. फांदीच्या टोकावर किंवा पानांच्या बेचक्यात पुष्पसंभारात पांढऱ्या रंगाची अनेक फुले असतात. फळधारणेनंतर बोंडावरील टोपी गळून पडते. फळे गर्द जांभळी, लांबट गोल, मांसल असतात. त्यात एक बी असते.

जांभूळ या फळझाडाला विविध भागात विविध नावाने ओळखतात. त्यातील काही भाषेतील नवे खालीलप्रमाणे आहेत.

कुटुंब - Myrtaceae

लॅटीन - Syzygium Cumini, or Eugenia Jambolana

इंग्लिश - Indian Black Berry

मराठी - जांभूळ

संस्कृत - जंबू, राजजंबू, फलेंद्र

हिंदी - जामून, राजजामून, बडी जामून

गुजराती - जंबु, रायजंबो

जांभळाच्या लाकडाला महत्त्व असल्यामुळे या झाडाची तोड नियमित होत आहे. त्यामुळे या झाडाच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. लाकूड मध्यम, कठीण, टिकाऊ, लालसर रंगाचे असते. याचा वापर घर बांधणी, गाड्या, नावा, खांब, तुळ्या आणि शेतीची अवजारे इत्यादीकरीता करतात, जांभूळ फळाचा वापर ताजी फळे, जाम, जेली, सरबत, मध, व्हिनेगार आणि लोणच्याकरिता करतात.

औषधी महत्त्व - औषधी उपयुक्त भाग - साल, पाने, फळे, बिया.

औषधी गुणधर्म - जांभूळ तुरट, मधुर, पाचक व मलस्तंभक आहे. रूक्ष, रुचीकर, आंबट , कंठाला हितकर असून, पित्त दाह, कृमी, श्वास, शोष, अतीसार, कास, रक्तदोष, कफ, व्रण यांचा नाश करते.

औषधी उपयोग - याचा उपयोग अतीसार, खोकला, पित्त, शोष, दाह, रक्तदोष, कंठरोग इत्यादी रोगात बरा होतो. कषाय व शीत गुणामुळे कफ व पित्ताचा नाश होतो. सालीत रक्तपित्त शामक गुण आहे. प्लीहा व यकृताच्या विकारामध्ये जांभूळ हे जालिम औषध आहे. जांभळाच्या झाडात पाणी शुद्ध करण्याचा गुणधर्म आहे. जांभळाचा शिरका अतीसार, मोडशी, उदर रोगात वापरतात. दातांच्या आजाराकरिता जांभळाची साल उपयुक्त आहे. जांभळाचा रस यकृताला कार्यक्षम बनविते. मूत्राशयाचा दाह आणि पोटाच्या तक्रारी दूर करतो. हृदयासाठी व पांडुरोगामध्ये लाभदायक आहे. प्रमेह, मधुमेह, अपचन, जुलाब, मुरडा, संग्रहणी, मुतखडा, रक्त पित्त आणि रक्तदोष आदी विकारात रसाचा उपयोग चांगला होतो.

रासायनिक द्रव्ये - जांभळात ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि सुक्रोज साखर मिळते. टॅनिनस, ऑक्झॉंलिक अॅसिड, गॅलिक अॅसिड अल्प प्रमाणात असतात. तर मॅलिक अॅसिड ०.५९ टक्के असते. जांभूळाच्या फळाला जांभळा रंग हा सायनिडीन डाय ग्लुकोसाईडसमुळे येतो. फुलामध्ये इलॉडिक अॅसिड व प्लॅबिनाइडस असतात. खोडाच्या सालीमध्ये टायटरपेन हॉयड्राक्सी अॅसिड, ओलेनोलिक अॅसिडस, Betiulinic acid, sitosterol, Firedlin इत्यादी रसायने असतात.

जांभळाच्या १०० ग्रॅम खाण्यायोग्य भागात असलेले अन्नघटकाचे प्रमाण -

पाणी - ८३% प्रथिने - ००.७० %, स्निग्ध पदार्थ - ००.३० %, तंतुमय पदार्थ - ००.९० %, कार्बोदके - १४%, कॅल्शियम - १५ मि. ग्रॅम, स्फुरद -१५ ग्रॅम, लोह - १.२ ग्रॅम, सोडियम -२६ ग्रॅम, पोटॅशियम -५५ ग्रॅम, कॉपर -००.२३ ग्रॅम, सल्फर -१३ ग्रॅम, क्लोरिन - ०६ ग्रॅम, जीवनसत्व 'अ' - ८० आय. यू. थायमिन - ००.०३ मि. ग्रॅम. रिबोफ्लेव्हीन - ००.०१ मि.ग्रॅम, निकोटॉंनिक अॅसिड - ०.२० मि.ग्रॅम, जीवनसत्त्व 'क' ०१.८० ग्रॅम, कोलीन - ०७.०० ग्रॅम.

भारतामध्ये बिहारमधील भागलपूर, बंगालमधील बांकुडा, पुरुलिया या भागात जांभळा ची नैसर्गिक वाढ झालेली आढळते. महराष्ट्रात महाबळेश्वर, लोणावळा, सातारा, कोल्हापूर, नागपूर, भंडारा धुळे, नगर या भागत जांभळाची झाडे आढळतात. पण भारतात जांभळाच्या झाडाची स्वतंत्रपणे लागवड केली जात नसल्यामुळे जांभळाच्या लागवडीखालील क्षेत्र आणि उत्पादन यांची निश्चित आकडेवारी उपलब्ध नाही. जांभळाची झाडे डोंगरावर, जंगलात आणि नदी किनारी वाढलेली दिसतात. तसेच रस्त्याच्या कडेनेही आढळतात. त्यामुळे त्याचे क्षेत्र व उत्पादन यांची नोंद उपलब्ध नाही.

हवामान : जांभळाची लागवड प्रामुख्याने उष्ण आणि समशितोष्ण हवामानात केली जाते. कोकणात व पूर्व विदर्भात उष्ण दमट हवामान असल्यामुळे या वातावरणात जांभळाच्या वाढीकरीता पोषक आहे. मात्र फुलाच्या अवस्थेत कोरडे हवामान आवश्यक असते.

लागवड व जमीन - जांभळाच्या लागवडीकरीता ठराविक प्रकारच्या जमिनीची आवश्यकता नसते. हलकी, मध्यम व भारी, खोली असलेली जमीन योग्य असते. समुद्रसपाटीपासून ६५० मिटर उंचीपर्यंत या पिकाची उत्तम वाढ होते व भरपूर उत्पादन मिळते.

लागवडीची रोपे एक फूट उंचीची असावीत. लाल पोयटा जमिनीत जांभळाची वाढ चांगली होते. लागवडी च्यावेळी खड्ड्यात गांडूळखत, शेणखत तसेच २५० ग्रॅम कल्पतरू सेंद्रिय खत टाकून जर्मिनेटर वापरून बी पासून तयार केलेली रोपे किंवा कलमे ३० x ३० वर लावावीत. लागवड करताना प्रिझम व जर्मिनेटरचे द्रावण (१० मिली व २० मिली/लि. पाण्यात) प्रत्येक लावलेल्या रोपावरून चौफेर ओतावे. म्हणजे मर/नांग्या पडत नाहीत. सुरुवातीच्या काळात जांभळाची वाढ ही मंद गतीने होत असते. तेव्हा आपल्या कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार कल्पतरू सेंद्रिय खताचा आणि सप्तामृताचा वापर करावा.

हे झाड सर्व प्रकारच्या वातावरणात येते. फक्त याला अति थंडी मानवत नाही. ज्याठिकाणी कडूनिंब येतो. अशा ठिकाणी उन्हाळ्यातील तापमान ३५ डी. ते ४० डी. ते ४५ डी. सेल्सिअस असते, तेथे जांभळाची झाडे चांगली येतात.

जांभूळ हे दुर्लक्षित झाड आहे तेव्हा ज्याठिकाणी जांभूळ खाऊन बी टाकले जाते तेथे ते उगवून आल्याचे आढळते.

जांभळाच्या उन्नत जाती - जांभूळ फळझाडाच्या आपल्या देशात सुधारित किंवा निवडलेल्या विशिष्ट प्रकारच्या जाती विकसित केल्या गेल्या नाहीत. जांभळाची फळे ही काही लिंबा एवढी मोठी तर काही बोराच्या आकाराची असतात. मोठ्या आकाराच्या जांभळाच्या फळांची चव गोड असते, तर लहान आकाराच्या फळाची चव तुरट असते असे आढळते. आपल्याकडे जांभळाच्या दोन प्रचलित जाती आहेत. याखेरीज आम्ही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी संशोधन केंद्रावर निवड पद्धतीतून शबरी जांभूळ हा वाण विकसित केला आहे. त्याची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे

१) शबरी जांभळाची वैशिष्ट्ये - शबरी जांभळाची फळे गोड, आंबट, तुरट चवीची असून गर मोठा, बी मध्यम, लांबट , पिकलेले जांभूळ हे पुर्ण जांभळ्या रंगाचे असते. देठाला फिक्कट जांभळी असणारी फळे दोन दिवसात तयार होतात. अशी जांभळे १५० ते २०० किलोमीटर अंतरावरील मार्केटमध्ये पाठविता येतात. पाने टोकाला व देठाला निमुळती असून मध्यभागी फुगीर असतात. याला फळे येण्यास ६ ते ७ वर्ष लागतात. ५ व्या वर्षी फळे कमी लागतात. या जांभळाला फुले मार्च अखेरीस लागून फळे येण्याचा काळ हा एप्रिल ते जून असतो. फळांचे गुच्छ असतात. जसे ऊन वाढते तशी फळे जास्त पिकतात.

एकावेळेस संपूर्ण पिकलेली ८ ते १० जांभळे खाल्लीजातात. त्यामुळे ही जांभळे मधुमेहींसाठी उपयुक्त आहेत. अर्धवट पिकलेली जांभळे तुरट लागतात. पिकलेली जांभळे ८ ते १० पेक्षा अधिक खाल्ली तर छातीत गच्च होऊन रक्ताभिसरणावर उलटा परिणाम होतो. म्हणून एकावेळी ८ ते १० च जांभळे खावीत. असे दिवसातून २ - ३ वेळा खाल्ल्यास मधुमेहावर उपयुक्त ठरते.

तीनच महिने येणारे पीक असल्याने याच्या दरात घसरण होत नाही, याला ५० ते ६० रू./ किलो होलसेल तर किरकोळ १०० ते १५० ते २०० रू./किलो भाव मिळतो.

२) रा जामून - या जातीच्या जांभळाची फळे आकाराने मोठी व लांबट असतात. पिकलेल्या फळाचा रंग गर्द जांभळा असतो. फळातील गर फिकट गुलाबी रंगाचा, गोड व चविष्ट असतो. फळाच्या तुलनेत बी लहान असते. या प्रकारातील जांभळाची फळे महाराष्ट्रात जून - जुलै महिन्यात तयार होतात.

३) कड जामून - या प्रकारातील जांभळाची फळे गोलाकार व बारीक असतात. पिकलेल्या फळाचा रंग गर्द जांभळा ते काळसर असतो. फळातील गर जांभळाच्या रंगासारखा राहत असून चवीला तुरट आणि कीम चविष्ट असतात. या फळातील बिया आकाराने मोठ्या असतात. या प्रकारातील जांभळाची फळे ऑगस्ट महिन्यात तयार होतात.

अभिवृद्धी आणि लागवड पद्धत : जांभळाची लागवड बहुतांशी बियांपासून करतात. परंतु याप्रकारच्या अभिवृद्धीमुळे उत्पादन अशिरा सुरू होते तसेच झाडावर फळे एकसारखी येत नाही. म्हणून काही ठिकाणी अभिवृद्धी भेट कलम किंवा डोळा भरून करतात.

बियांपासून अभिवृद्धीमध्ये ताजे पक्व जांभळातून बी स्वच्छ पाण्याने घुवून स्वच्छ करावे आणि बियाला जर्मिनेटर आणि प्रोटेक्टंटची प्रक्रिया करावी. प्रक्रिया केलेले बियाणे तयार गादी वाफ्यावर किंवा प्लॅस्टिक पिशवीत टोकून लावावे. अनुकूल वातावरण असल्यास १२ ते १५ दिवसात बीजांकूर बाहेर येतात आणि एक बियापासून ३ ते ४ रोपे तयार होतात. त्यातील कमजोर रोपे कमी करून सशक्त रोपांची लागवडीकरिता देखभाल करावी. ६ महिन्यात रोपांची उंची २० सें. मी. पर्यंत वाढते. १० महिन्यांची रोपे पुनर्लागवडीकरीता वापरावे.

जांभळाचे भेट कलमाने अभिवृद्धी करण्याकरिता प्लॅस्टिक पिशवीत रोपे तयार करावी. लागवडीकरिता तयार पिशवीमध्ये जांभळाचे बी लावून रोपे तयार करावी. १ ते २ वर्षे वयाच्या रोपावर निवड केलेल्या जांभळाची भेट कलम आंब्याप्रमाणे करावे. भेट कलम ६ आठवड्यात कलमाचा जोड सांधला जातो. पण या पद्धतीत यशस्वी कलमाचे प्रमाण २५ ते ३० टक्के पर्यंतच असते.

जांभळाचे भेट कलमाकरिता तयार केलेल्या रूट स्टॉंकप्रमाणे रोपे तयार करावी. तीन महिन्याने निवड केलेल्या जातीचा पूच पद्धतीने डोळा फेब्रुवारी ते मार्च महिन्यात भरावा. या पद्धतीमध्ये डोळे भरल्यास ७० टक्के पर्यंत यश मिळते.

जांभळाची अभिवृद्धी उत्तर प्रदेशात काही ठिकाणी गुटी पद्धतीने केली जाते. या पद्धतीत ८० ते ८५ टक्केपर्यंत यशस्वीता मिळते.

आंतरपिके : जांभळाला जांभळे येण्यासाठी ६ ते ७ वर्षाचा कालावधी लागतो. त्यामुळे तोपर्यंत जांभळामध्ये 'सिद्धीविनायक' शेवग्याचे आंतरपीक घेणे फायदेशीर ठरते. ३०' x ३०' वर जांभळाची लागवड केल्यानंतर त्यामध्ये ८ ते १० फुटावर 'सिद्धीविनायक' शेवगा लावावा आणि शेवग्यात उन्हाळ्यात मेथी, कोथिंबीर, पालक, शेपू यासारखी पालेभाज्या घ्याव्यात. ही पिके सर्वसाधारण दोन महिन्यात मोकळी होतात आणि उन्हाळ्यात त्यांना अधिक बाजारभाव मिळतात. शक्यतो या आंतर - आंतरपिकासाठी भेंडी, टोमॅटो, वांगी व वेलवर्गीय पिके घेवू नयेत. कारण या पिकावरील बुरशीचा प्रादुर्भाव शेवगा व जांभळावर होऊ शकतो.

आंतर - आंतरपिकामध्ये आले, हळदीच्या प्रयोग करायला हरकत नाही. यावरील विशेष माहिती उपलब्ध नाही. तेव्हा असे प्रयोग करून त्याचे निष्कर्ष शेतकऱ्यांनी आम्हास कळवावेत झेंडू, गॅलार्डिया, गुलछडी ही आंतरपिके म्हणून घ्यावीत. गुलाब करू नये, कारण यावरील भुरी, मावा, पाने खाणारी अळी यांचा प्रादुर्भाव शेवगा व जांभळावर होऊ शकतो.

बिहारमध्ये शेवगा, जांभूळ मोहरी या पिकांचे स्पेशल मध मिळते. मधुबनी जिल्ह्यात पिकवार मध मिळते. तसेच महाबळेश्वरला जांभळाचे मध उपलब्ध होते. त्याप्रमाणे ज्या ज्या फळपिकांचे क्षेत्र आहे. तेथे तेथे पिकवार मधाचे प्रकार उपलब्ध होतात, त्याप्रमाणे जांभळाचे मध अजून एवढे प्रचलित नाही.

वळण आणि छाटणी पद्धत : जांभळाचे झाड मोठे वृक्ष होत असल्यामुळे नियमीत वळण अथवा छाटणी करण्याची आवश्यकता नसते. पण सुरूवातीच्या रोपाच्या वाढीच्या काळात जमिनीपासून सुमारे १०० सें. मी. उंची पर्यंतचे फुटवे काढून टाकावेत. तसेच दरवर्षी वाळलेल्या रोगट अथवा जखमी फांद्या हंगाम संपल्यावर छाटून काढाव्यात.

खते व आंतरमशागत - जांभळाच्या रोपांची पुनर्लागवड केल्यानंतर कडक उन्हाळ्यात पाण्याचे ओलीत करण्याची पहिल्या वर्षी गरज असते. जांभळाच्या झाडाला खते देण्याची गरज नसते. पण दर्जेदार भरघोस उत्पादनाकरिता प्रत्येक वर्षी पावसाच्या सुरूवातीस प्रत्येक झाडाला ३० किलो कंपोस्ट खत, कल्पतरू सेंद्रिय खत २५० ग्रॅम आणि २५० ग्रॅम संपूर्ण मिश्रखत द्यावे व गरज असल्यास पाण्याची पाळी द्यावी.

जांभळाच्या झाडासाठी दरवर्षी पुढीलप्रमाणे कल्पतरू सेंद्रिय व सप्तामृत वापरावे.

पहिले दोन वर्षे वयाच्या झाडांसाठी

१) जून महिन्यात - कल्पतरू अर्धा किलो देऊन सप्तामृत १०० मिली व हार्मोनी १०० मिली १०० लिटर पाण्यातून फवारावे.

२) सप्टेंबर महिन्यात - सप्तामृत २५० मिली व हार्मोनी २०० मिली १२५ लिटर पाण्यातून फवारावे.

३) मार्च महिन्यात - सप्तामृत ५०० मिली व हार्मोनी २५० मिली १५० लिटर पाण्यातून फवारावे.

तिसऱ्या व चौथ्या वर्षाच्या झाडांसाठी -

१) मे - जून महिन्यात - कल्पतरू अर्धा किलो देऊन सप्तामृत २५० मिली व हार्मोनी १५० मिली १०० लिटर पाण्यातून फवारावे.

२) सप्टेंबर महिन्यात - सप्तामृत ५०० मिली व हार्मोनी २०० मिली १२५ लिटर पाण्यातून फवारावे.

३) मार्च महिन्यात - सप्तामृत ७५० मिली व हार्मोनी २५० मिली १५० लिटर पाण्यातून फवारावे.

पाचव्या ते सातव्या वर्षाच्या झाडांसाठी -

१) मे - जून महिन्यात - कल्पतरू १ ते १॥ किलो देऊन सप्तामृत १ लिटर व हार्मोनी २५० मिली १५० लिटर पाण्यातून फवारावे.

२) सप्टेंबर महिन्यात - सप्तामृत १ ते १॥ लिटर व हार्मोनी ३०० मिली २०० लिटर पाण्यातून फवारावे.

३) मार्च महिन्यात - सप्तामृत १।। ते २ लिटर व हार्मोनी ५०० मिली २५० ते ३०० लिटर पाण्यातून फवारावे.

जांभूळ काढणी एक समस्या ?

जांभळाचे खोड व फांद्या ह्या ठिसूळ असतात आणि जांभळाच्या पिकलेल्या फळांची कातडी मऊ असते. त्यामुळे जांभूळ काढताना २ - ४ जणांनी खाली कापड घरून त्यावर फळे तोडून टाकली जातात. ज्याप्रमाणे आंबे काढण्याचा झेला असतो, त्याप्रमाणे जांभूळ काढणीचा झेला निर्माण केल्यास तो फळे काढण्याच्या दृष्टीने सोयीचा होईल. जांभळाची फळे ही नाशवंत स्वरूपाची असतात. २४ तासात त्यांना आंबूस वास येतो.

अती गोड जांभळांना बारीक छेद असतो. त्या जागी जांभळाचा गर दबलेला असतो. तेथून अळी आत प्रवेश करून ती बी खाते. तेव्हा अशा फळांचे नुकसान होऊ नये म्हणून मार्च - एप्रिलमध्ये क्विनॉलफॉस किंवा क्लोरोपायरीफॉसची फवारणी करावी. सप्तामृतात हार्मोनी व प्रोटेक्टंट देही फायदेशीर ठरते.

जांभळाची काढणी पावसाळ्यात मृग नक्षत्रात सापडू नये यासाठी सप्तामृतात न्युट्राटोन चे प्रमाण ५ ते ७ मिली प्रति लिटर प्रमाणे घ्यावे.

काढणी - जांभळाच्या झाडाला ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यात फुलांचा बहार येतो आणि फेब्रुवारी - मार्च महिन्यात फळे काढणीस तयार होतात. फळे पूर्ण पिकल्यावर, पूर्णपणे काळसर झाल्यावर फळांची काढणी करावी. फळे नाजूक व नाशवंत असल्यामुळे अतिशय काळजीपूर्वक फळे काढावीत. काढलेल्या फळांची प्रतवारी करून प्रतवारीनुसार बांबूच्या करंड्यात पॅकिंग करून विक्रीकरीता त्वरित पाठवावे.

उत्पन्न - जांभळाच्या एका झाडापासून १०० ते २५० किलोपर्यंत फळे मिळतात. अशी फळे ६० ते ७० वर्षापर्यंत मिळत राहतात. चांगले वाढलेले १० ते १५ वर्षाचे, ३० ते ३६ फूट उंचीचे एक झाड ५ ते १० हजार रुपयाचे उत्पन्न देते, तेव्हा अशी बांधावर १० ते १५ झाडे असल्यास बांधावरील झाडांपासून वर्षाला ५० हजार ते लाखभर रुपयाचे उत्पन्न मिळते.

कीडव रोग - जांभळाच्या पिकास इतर पिकाप्रमाणे पाने खाणारी अळी, फळमाशी किडींचा प्रादुर्भाव होतो. तसेच पानावरील ठिपके व फळकुज रोगाचाशी प्रादुर्भाव होतो. जांभळात प्रादुर्भाव होणाऱ्या किडीचे अथवा रोगाचे निदान करून योग्य त्या औषधाचा वापर करून कीड व रोगाचे नियंत्रण करावे.

जांभळावर करावयाची प्रक्रिया - जांभळाची पक्व फळांची काढणी केल्यानन्तर २ - ३ दिवसापर्यंत चांगली राहतात. तसेच जांभळाचे पीक एकाच वेळी बाजारात विक्रीकरीता येत असल्यामुळे बाजारभाव कमी होतात. हा फळांचा ठराविक हंगाम संपल्यानंतर जांभळाची उपलब्धता नसते. त्यामुळे उपभोग वर्षभर घेता यावा याकरिता फळावर प्रक्रिया करणे गरजेचे असते. जांभळाच्या फळावर प्रक्रिया करून टिकाऊ पदार्थ तयार करता येतात.

१ ) जांभळाचा रस - जांभळाच्या रसाकरिता परिपक्व रसरशीत फळे घ्यावी. त्यांचा हातांनी कुसकरून लगदा करावा. लगदा मंद आचेवर १० मिनीटे गरम करावा. जांभळाचा शिजवलेला लगदा पातळ मखमल कापडातून गाळून घ्यावा. त्यापासून जांभळाचा शुद्ध रस मिळेल. हा रस एकूण लगद्याच्या ४० % पर्यंत मिळतो. त्याला जांभळाचा मूळ रंग, चव व सुगंध असतो.

२) सरबत - सरबत करताना जांभळाचा रस १०% घ्यावा. त्यात साखर मिसळून त्याचा ब्रिकस १५ डी व सायट्रीक आम्ल मिसळून ०.२५ % आम्लता करावी आणि बाकी पाणी वापरून सरबत तयार करावे.

३) जांभळाचा रस साठविणे - जांभळाचा तयार रस ८० डी. सें. ग्रे. तापमानाला २० मिनीटे तापवावा नंतर निर्जंतुक केलेल्या बाटलीत रस भरून त्यांना झाकण लावून हवाबंद करावीत. मोठ्या पसरट आकाराच्या भांड्यात पाणी घेऊन तळाला जाड फडके ठेवावे व शेगडीवर ८५ डी. सें.ग्रे. पर्यंत तापवून त्यात रसाने भरलेल्या बाटल्या ठेवाव्यात. ही क्रिया २५ ते ३० मिनीटे पर्यंत करावी. नंतर थंड करून कोरड्या जागी साठवण करावी किंवा प्रती किलो रसात ७१० मि. ग्रॅम प्रतीसंरक्षके सोडियम बेन्झोएट किंवा मेटाबायसल्फेट वापरूनही साठवण करता येते. जांभळाच्या रसातील मूळरंग नष्ट होणार नाही याची काळची घ्यावी.

४) जॅम - जांभळापासून उत्कृष्ट प्रतीचा जॅम तयार करता येतो. त्याकरिता परिपक्व जांभळाची फळे निवडून स्वच्छ पाण्याने धुवावे व फळापासून गर वेगळा करावा. जॅमकरिता गराच्या वजना एवढी साखर आणि प्रति किलो १.५ ग्रॅम सायट्रीक अॅसिड मिसळून एकजीव मिश्रण करावे व मंद आचेवर शिजवावे. मिश्रणाचा ब्रिक्स ६८.५ अंश इतका झाल्यावर उष्णता देणे बंद करावे. हा तयार झालेला जॅम निर्जंतुक केलेल्या काचेच्या बरणीत गरम भाराव व बाटल्याची साठवणूक थंड कोरड्या जागी करावी.

५) जेली - जांभळाची जेली करण्याकरिता जांभळाचा शुद्ध रस घ्यावा. रसाच्या वजनाएवढी साखर आणि प्रती किलो १.५ ग्रॅम सायट्रीक अॅसीड टाकवे. जेलीला घट्टपणा येण्याकरिता ४ ग्रॅम पेक्टीन (ग्रेड १५ ) वापरावे आणि मंद आचेवर तापवावे. ६८ अंश ब्रिक्सचे प्रमाण झाल्यावर जेली तयार झाली असे समजावे आणि उष्णता देणे बंद करावे. तयार जेली निर्जंतुक बाटल्यात भरून त्यात थंड झाल्यावर मेणाचा थर द्यावा आणि झाकण लावून हवाबंद करावे. तयार बाटल्या थंड कोरड्या ठिकाणी साठवाव्यात.

६) वाईन (मद्य) - जांभळापासून वाईन तयार करण्याकरिता शुद्ध रस घ्यावा. त्याला ७० डी. सें.ग्रे. पर्यंत तापवून निर्जंतुक करावे. त्या रसाचा ब्रिक्स २३ अंश आणि आम्लता ०.७ % असावी. त्या थंड रसात सॅकॅरोमायसी सिरिव्हिसी नावाचे शुद्ध यीस्ट घालावे व मिश्रण ३० डी. सें.ग्रे. तापमानात २ आठवडे ठेवावे. आंबलेले द्रावण मखमलच्या कापडातून गाळून घन पदार्थ वेगळे करावे. या वेळी द्रावणाचा ब्रिक्स ६ पर्यंत आणि अल्कोहोलचे प्रमाण १० पर्यंत होईल. ही तयार वाईन निर्जंतुक बाटलीत भरून थंड व कोरड्या ठिकाणी साठवणूक करावी.

७) टॉंफी - जांभळाच्या गरापासून टॉंफी तयार करता येते. टॉंफीकरिता जांभळाच्या एक किलो गराकरिता १.५ किलो साखर आणि १२० ग्रॅम वनस्पती तूप घ्यावे. हे मिश्रण एकत्र करून मंद आचेवर शिजवावे.

मिश्रणाचा,ब्रिक्स ७० अंश झाल्यावर त्यात ५ ग्रॅम मीठ मिसळावे व शिजवायची क्रिया सुरू ठेवून ८३ अंश ब्रिक्स होईपर्यंत ठेवावे. एका पसरट भांड्यातील मिश्रण थंड झाल्यावर योग्य त्या आकाराचे तुकडे करावे व ५५ ते ६० डी. सें.ग्रे. तापमानास वाळवावे व थंड कोरड्या ठिकाणी साठवण करावी.

८) बियांपासून पावडर - जांभळाच्या बियांची भुकटी फार गुणकारी असते. त्याकरिता गर काढल्यानंतर शिल्लक बिया स्वच्छ पाण्याने धुवून उन्हात वाळवाव्यात. त्या वाळलेल्या बिया पॅल्व्हीनायीझरमध्ये दळून भुकटी तयार करावी. या भुकटीचा वापर डायरीया, मधुमेह, रंग कामाकरिता आणि जनावरांच्या खाद्यात होतो. याशिवाय चामडे कमविण्याकरिता मोठ्या प्रमाणात वापर होतो.

इतर फळझाडांसारखी याची लागवड प्रचलित का होत नाही.

जांभूळ लागवडीचे आंतर हे जास्त असून याला फळे उशीरा लागतात. तसेच हे फळझाड वर्षातून तीन महिनेच हंगामा देते. जांभळाचे झाड हे जास्त दिवस (४० ते ५० वर्षे) राहणारे असल्याने कोकण, खान्देश विदर्भ येथे हे पीक प्रचलित झाले नाही. त्यामुळे यापिकाची झाडे फक्त बांधावरच आढळतात. याची सलग लागवड आढळत नाही. परंतु जगभरात आणि भारतात ४० टक्के लोकांना मधुमेहाची लागण असल्याने हे झाड वरदान ठरणार आहे.

उद्याचे ते मधुमेहाचे आधारवड फळ आहे. त्यामुळे त्यावर अधिक प्रयोग/ डेमो जगभर होणे गरजेचे आहे. आयुर्वेद व रोगनिदान चिकित्सा शास्त्रात जांभळाच्या गुणधर्म, उपयुक्तता नवीन आरोग्यवर्धक, औद्योगिक शोधांचे जननीसाठी प्रचंड वाव आहे.