हुमणीचे नियंत्रण विषारी किटकनाशकाशिवाय करू शकाल !

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


ज्या ठिकाणी खताचा खड्डा आहे, तेथे कडुनिंब किंवा बाभळीचे झाड असल्यास मे महिन्यात पहिल्या आठवड्यात संध्याकाळी पावसाचे अगोदर एका बांबूच्या शेकाट्यास जुना कापडाचा बोळा बांधून त्यावर वापरलेले तेल ओतावे व तो टेंभा त्या झाडातून फिरवावा म्हणजे संध्याकाळी ६ ते ७ चे दरम्यान नर मादी एकत्र येतात. त्यावेळेस जास्तीत - जास्त अंडी हुमणी घालते. या वेळी झाडातून टेंभा फिरविल्यास अनेक अळ्या खाली पडतात. अशा खाली पडलेल्या अळ्या २ - ३ मुलांना वेचायला लावून एका घमेल्यात २ - ३ लिटर पाणी व अर्धा लिटर रॉकेल टाकून या मिश्रणात ह्या नर, माद्या टाकाव्यात. म्हणजे त्या १० ते १५ मिनिटात मरून जातात व अशा तऱ्हेने खताच्या खड्ड्यात त्या जात नाहीत. हा प्रयोग सतत ८ दिवस करावा. नंतर खड्ड्यातील खत अपसून वर सावलीत घ्यावे व ते नंतर शेतात नीट पसरवून शेत कुळवून घ्यावे, म्हणजे हुमणीचा प्रादुर्भाव होत नाही.

शेतात हुमणी पसरल्यावर नियंत्रणाचा सोपा उपाय

शेतात अनविधानपणे हुमणीचा प्रादुर्भाव झाल्यास लोक बी.एच.सी. १०% किंवा ५०% अथवा क्लोरेडेन वापरतात. पण हुमणीवर त्याचा पाहिजे तसा इलाज होत नाही. याकरिता एक सोपा उपाय म्हणजे हुमणीस सुकटी किंवा फिंगेचा वापर करावा. झिंग्याचा वास हुमाणीस आकर्षित करतो. सुकटी शेतात मेथी फेकतो तशी फेकावी. हुमणीची आळी जमिनीच्या पृष्ठभागावर ती सुकटी खाण्यासाठी येते व नंतर कावळा येऊन ह्याच हुमणीला खाण्यासाठी हुमणीस अलगद उचलून नेतो. हा प्रयोग शक्यतो नांगरट चालू असताना करावा. सुकट इतर ओशट पदार्थापेक्षा स्वस्त असते. नेहमीची खाण्याची सुकट झिंगे विकत न घेता त्याचा गाळ, चुरा घेतला म्हणजे बदला भावात तो मिळतो. तसा एकरी ४० - ५० किलो लागतो. जसा हुमणीचा प्रादुर्भाव असेल तसा - कमी - अधिक प्रमाणात लागतो. हा उपाय फारच प्रभावी ठरल्याचे अनेक शेतकऱ्यांनी अनुभवने आहे.

एकदा पिकाची लागवड झाल्यावर जोपर्यंत मधली तासातली जमीन या पिकाने झाकत नाही. तोपर्यंत १५ दिवसाचे आत हा उपाय बऱ्यापैकी उपयुक्त ठरतो. कारण एकदा का जमीन झाकली की मग सुकट टाकून जरी हुमणीची आळी वर खाण्यास आली तरी ती पिकाचे आड असल्याने लगेच खाऊन जमिनीत किंवा पिकाआड लपते व कावळ्यास दिसत नाही, तेव्हा शक्यतो वरील उपाय मोकळ्या जमिनीत करावा. प्रतिबंधक उपाय हा वर सांगितल्याप्रमाणे करावा.