बेल

डॉ.प्रज्ञा सुरेश गुडधे,
उद्यानविद्या विभाग, डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला


भारत, श्रीलंका, ब्रम्हादेश, थायलंड या ठिकाणी बेल हा वृक्ष आढळतो. भारतात देवळाच्या आसपास बऱ्याच ठिकाणी आढळणाऱ्या वृक्षाचा उल्लेख वैदिक वाड्:मय, पाणिनीची अष्ठाध्यायी, महाभारत, चरक संहिता, सुश्रुत संहिता अशा अनेक संस्कृत ग्रंथांत पहावयास मिळतो. मध्यम आकाराचा हा पानझडी वृक्ष आहे. 'ईगल मॉर्मेलॉस' हे या वृक्षाचे शास्त्रीय नाव. हा वृक्ष साधारण १८ मीटर उंच वाढतो. खोडाची साल जाड, फिकट राखाडी रंगाची असून त्यावर खवले असतात. फांद्यावर पानांच्या बगलेत काटे असतात. त्यात बाष्पनशील तेलद्रव्य असते. फुले माध्यम आकाराची, हिरवट, पांढरी, सुगंधी असून पाकळ्यांवर दाट ठिपके असतात. फळ गोलसर गरयुक्त, कठीण कवचाचे, करडे - पिवळ्या रंगाचे असते. फळात नारिंगी रंगाचा, चिकट, घट्ट, गोड आणि सुवासिक गर असतो. फळातील 'मार्मेलोसिन' हे औषधी द्रव्य असते. ते मूत्रविकार, निद्रानाश, हृदयविकार, घाम कमी करणे यासाठी वापरतात. त्याच्या बियांचे एल रेचक म्हणून उपयुक्त आहे. मुळावरच्या सालीचा उपयोग मत्स्यविष म्हणून होतो. फळातील गर शीतकारक, पाचक, अतिसार व आमांश यावर उपयुक्त आहे. बहिरेपणा आणि कर्णदोष यावरही बेलफळ उपयोगी आहे. बेलफळाचा मुरांबा पोटातील मुरड्यावर उत्तम औषध आहे. बेलफळ औषधात निरनिराळ्या प्रकारे वापरतात. अर्घवट पिकलेले बेलफळ वाळवून ठेवतात. त्याला बेलाची काचरी अथवा वैद्यकीय भाषेत बिल्वपेशिका म्हणतात. अतिसार आणि रक्तीआव बंद होण्यासाठी बिल्वपेशिका उपयुक्त आहे. पोट फुगणे, वारंवार लघवी होणे यावर बेलफळाचा काढा घेतला जातो. क्षयरोगावर बेल उपयुक्त आहे. दशमुळातील एक घटक आहे. शक्तिवर्धक म्हणून बेलाच्या पानांच्या रसाचा उपयोग होतो. दमा, श्वास यामध्ये पानाचा काढा मिऱ्याच्या पुडीबरोबर देतात. सूजसंग्रहणी, व्रण, जुलाब, वांती, आम्लपित्त यावर उपचार म्हणून बेलफळाचा मुरांबा किंवा सरबताचा उपयोग होतो.

फळाच्या गरातील चिकट पदार्थ वॉर्निश, चिटकवण्याचा पदार्थ म्हणून वापरतात. कच्च्या फळापासून पिवळा रंग बनवतात. खोडाचा उपयोग घरबांधणी, बैलगाड्या, तेलघाणे, मुसळ, उसाचे चरक अशी विविध अवजारे बनवण्यासाठी करतात.