डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने ३० गुंठे दोडका, ७० गुंठे कारली रोज २४ क्रेट दोडका दर ६० रु./किलो, दररोज ७ ते ८ हजार

श्री. प्रल्हाद शेषेरावजी फले,
मु.पो. शिर्शी (बु.), ता. सोनपेठ, जि. परभणी- ४३१५१४.
मो. ९०११८२८३१५


माझी शिर्शी (बु.) येथे १५० एकर शेतजमीन आहे. ५० - ६० एकर ऊस, १० एकर आंबा, २.५ एकर लिंबू आणि बाकी क्षेत्रात कापूस, सोयाबीन अशी पिके घेत होतो . मात्र मागील सलग २ वर्षाच्या प्रचंड दुष्काळामुळे उसाला पाणी कमी पडले. त्यामुळे १०० एकर सोयाबीन पेरून येईल तेवढ्या उत्पादनावर समाधान मानण्याशिव्या पर्याय नव्हता. मात्र या मोजक्या उत्पन्नातून शेतीचा आर्थिक खर्च भागत नसल्याने २ वर्षापुर्वीचे शिल्लक आर्थिक भांडवलही संपले.

मग मोजक्या पाण्यावर तरकारी भाजीपिके करण्याशिवाय पर्याय नव्हता. म्हणून मग आम्ही १० मे २०१६ रोजी ७० गुंठे महिको कारली आणि ३० गुंठ्यात दोडका (V.N.R.) लावला. जमीन हलक्या प्रतिची असून पाणी कमी असल्याने ठिबकर ही पिके ६ फुटाच्या ओळीमध्ये २.५ फुटावर बी टोकून वेलवाढीसाठी ६ फूट उंचीवरून तार ओढून काठीच्या आधाराने तारेवर सोडले.

हा दोडका १७ जून २०१६ ला चालू झाला. सुरुवातीला ३ - ४ क्रेट माल निघत होता. नंतर पुढे माल वाढत जाऊन १५ - २० क्रेट दोडका निघू लागला. कारली ३० जून २०१६ ला चालू झाली. याच अवस्थेत मला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे परभणी प्रतिनिधी फिरोज सय्यद (मो. ९१६८२११३७६) भेटले. मी 'कृषी विज्ञान' मासिकाचा वार्षिक वर्गणीदार आहे. त्यामुळे डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीबद्दल माहिती होती. मात्र आमच्या भागात औषधे कोठे मिळतात हे माहीत नव्हते. तसेच मार्गदर्शनासाठी आमच्या भागात कोणी नव्हते. त्यामुळे तंत्रज्ञान वापरू शकलो नाही. मात्र आता फिरोज सय्यद हे वेळच्यावेळी आमच्या प्लॉटला भेट देऊन मार्गदर्शन करतात, त्याप्रमाणे आम्ही डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरत आहे. तर या दोन्ही प्लॉटमध्ये कमालीचा फरक आम्हाला जाणवत आहे. वेल एवढे वाढले आहेत, की असे वाटते २ ओळीत ६ फूट अंतर ठेवायला पाहिजे होते किंवा किमान २ रोपांतील अंतर तरी २.५ फुटाऐवजी ५ फुट ठेवायला पाहिजे होते. एवढी जबरदस्त वेलांची वाढ होऊन पानोपान फुलकळी लागली आहे. डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या सप्तामृतच्या आज (८ ऑगस्ट २०१६) अखेर १५ - १५ दिवसांच्या अंतरांनी २ वेळा फवारण्या केल्या आहेत. तर पानांना काळोखी येऊन मागील सतत ८ ते १० दिवस दररोज पाऊस पडत असूनही दोडका प्लॉट हिरवागार आहे. मालालादेखील शायनिंग असून सरळ, एकसारखे, मध्यम जाडीचे दोडके मिळत आहेत. मागे १५ ते २० क्रेट निघणारा माल आजरोजी २४ क्रेटवर गेला आहे. हा दोडका परळी (वै.) सोनपेठ परभणी, गंगाखेडला ठोक तर काही माल लोकल आठवडी बाजारात विकला. सुरुवातीस दोडक्याला ८० रु./किलो ठोक भाव मिळाला. पुढे भाव थोडा कमी - कमी होत ७० रु., ६० रु., ५० रु./किलो आणि आज रोजी (ऑगस्टमध्ये) ३५ ते ४० रु./किलो भाव मिळत आहे. दररोज २४ क्रेट म्हणजे २०० ते २५० किलो मालाचे ७ - ८ हजार रु. मिळत आहेत. अजून १।। महिना दोडका चालेल असा प्लॉट आहे. आज तिसऱ्या फवारणीसाठी सप्तामृत औषधे घेऊन आलो आहे.

१६ ते १७ क्रेट कारल्याचे रोज ४८०० ते ६०००

कारल्याचा प्लॉट ३० जुनला चालू झाला. कारल्याला देखील आतापर्यंत २ फवारण्या सप्तामृत औषधांच्या केल्या आहेत. कारली सुरुवातीस ५ - ६ क्रेट निघत होती. आज मितीस डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या फवारण्यांमुळे १६ ते १७ क्रेट म्हणजे १६० ते २०० किलो निघत आहेत. कारल्याला भाव ३० ते ४० रु./किलो मिळत आहे. मात्र मागील ८ - १० दिवसापासून दररोज पाऊस असल्याने आणि कारल्याचे शेत थोडे खोलगट भागात असल्याने वरच्या शेतातील पाणी या शेतात उतरत असल्याने ओल हटत नाही. त्यामुळे पाने पिवळी पडली आहेत. यासाठी आता पाऊस उघडल्यावर २ - ३ दिवसात जर्मिनेटर ड्रेंचिंग करून सप्तामृत फवारणार आहे.