शतावरी - औषधी वनस्पती

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


शतावरी (Asparagus Wild) ही लिलीएशी (Liliaceae) फुलातील प्राचीन कालापासून उपयोगात असणारी वनौषधी आहे. आयुर्वदामध्ये या वनस्पतीस महत्त्वपूर्ण स्थान असून तिच्या शत गुणांच्या प्रभावांवरूनच 'शतावरी' हे नाव दिले आहे. ही वनस्पती मूळची भारतीय असली तरी तिची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जात नाही. महाराष्ट्रात सर्व कृषी विभागांमध्ये हिची लागवड करता येऊ शकते. तिचा औषधांमधील शतगुणांचा प्रभाव पाहता लागवडीस मोठा वाव आहे.

शतावरी 'पौष्टिक' पीक म्हणून प्रगत देशात प्रसिद्ध असली तरीही आपल्याकडील नैसर्गिकरीत्या जंगलात आढळणारी शतावरी हळूहळू नष्ठ होत चालली आहे. डोंगर - दऱ्यातील आदिवासी या वनस्पतींच्या मुळांच्या विक्रीपासून थोडी फार कमाई करत असले, तरीही ही दिव्य वनौषधी नामशेष होत असल्याची जाणीव होण्यास मोठा कालावधी लागणार आहे. या वनस्पती मुळासकट काढल्या जातात व त्यांचे पुनरुत्पादन शाखीय पद्धतीने मुळांपासून होत असल्याने त्या समूळ नष्ट होताहेत. त्यांचा ऱ्हास रोखण्यासाठी लागवड अत्यावश्यक ठरते व त्यामध्ये शेतकरी बांधवांचा सहभाग मोलाचा आहे. जास्त खर्चिक पिकासाठी पर्याय म्हणून शतावरी हे नवीन कमी कष्टाचे व अधिक अर्थप्राप्ती करून देणारे पीक म्हणून पुढे येत आहे.

* वनस्पती परिचय : शतावरीमध्ये औषधी शतावरी, भाजीची शतावरी, शोभेची शतावरी व महाशतावरी अशाप्रकारे २२ प्रजाती आहेत. ही एक वेलवर्गीय वनस्पती असून निसर्गात डोंगरउतारावर काटेरी झुडपातून हिचा वेल झाडांच्या आधाराने वाढतो. औषधांसाठी उपयोगात व रानटी अवस्थेत वाढणारी ही वनस्पती बागायती पीक म्हणून लागवड करू शकतात. हिची मांसल मुळे जमिनीखाली खोडाच्या बुंध्याजवळ सभोवार वाढतात. ती दंडाकृती दोन्हीकडे निमुळती व रंगाने पांढरी असतात. फुले साधी, मंजिरीची, पांढऱ्या/गुलाबी रंगाची, लांबट आकाराची असतात.

उन्हाळ्यात शतावरीची झाडे सुप्त अवस्थेत जातात व उन्हाळी एक -दोन पावसानंतर सुप्त गड्ड्यांना नवीन कोंब फुटतात. पावसाळ्यात वेलीची वाढ झपाट्याने होते व वसंत ऋतूत वेलीवर बारीक व झुपकेदार फुले येतात. काही कालावधीत वाटाण्यासारखी गडद हिरव्या रंगाची व पिकल्यानंतर लाला दिसणारी फळे बियांसाठी काढतात. लागवडीतील शतावरी वर्षभर हिरवी राहते. शतावरीच्या मुळ्या औषधी असून त्या रंगाने पांढऱ्या शुभ्र व झुपकेदार असतात.

* औषधी वनस्पती : शतावरीच्या मुळ्या शक्तीवर्धक आहेत. विशेषतः स्तनदा मातांचे दूध वाढविण्यासाठी त्यांचा चांगला उपयोग होतो. बाळंतपणानंतर मातेचा अशक्तपणा भरून काढण्यासाठी आणि तिची शक्ती वाढविण्यासाठी शतावरी गुणकारी आहे. त्याचबरोबर गर्भाशयाचे विकार, पदर रोग, मुतखडा, फेफरे जाण्यासाठी व शक्रजंतू वाढविण्यासाठी शतावरी उपयुक्त आहे. शतवारीपासून तयार केलेली औषधे संधिवात व इतर विकारांवर गुणकारी आहेत. शतावरी तेलाचा नियमित उपयॊग केल्यास त्वचा मऊ होऊन कांती सुधारते. अशक्त व्यक्तींचे पोषण होते. तसेच स्थूल व्यक्तींची स्थूलता कमी होते व रोगप्रतिकारशक्ती वाढते. गर्भावस्थेपासून वृद्धावस्थेपर्यंत शतावरी सर्वांना उपयुक्त असून तिचा वापर अनेक औषधे तयार करण्यासाठी होतो.

* औषधी उत्पादने : शतावरीघृत, नारायण तेल, फलघृत, विष्णूतेल, शतमूल्यादिलेह, शतावरीपानक, शतावरी चूर्ण, शतावरीकल्प, शतावर्यादिक्वाथ, प्रमेह मिरातेल, नरसिंह चूर्ण इ.

* हवामान व जमीन : शतावरी पिकास समशीतोष्ण व उष्ण हवामान चांगले मानवते. महाराष्ट्रात सर्व विभागात हिची लागवड करता येते. पावसाचे प्रमाण चांगले असणाऱ्या भागात कोरडवाहू पीक म्हणून शतावरीची लागवड करता येऊ शकते. उत्तम निचऱ्याच्या वाळूमिश्रित पोयटा व सेंद्रिय खताचे जास्त प्रमाण असणाऱ्या जमिनीत या वनस्पतीच्या वेल व मुळांची वाढ उत्तम होते. तसेच हलक्या, मध्यम डोंगरउतारावरील माळाच्या पडीक जमिनीतही शतावरी लागवड करता येते.

* पूर्वमशागत : शतावरीचे पीक दोन वर्षांपासून पंधरा वर्षांपर्यंत शेतात राहत असल्याने चांगली पूर्वमशागत गरजेची ठरते. लागवडीचे क्षेत्र तयार करण्यासाठी उन्हळ्यात नांगरट करून कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत व सपाट करावी. त्यांनतर हेक्टरी २० ते २५ टन चांगले कुजलेले शेणखत/कंपोस्ट खत मिसळावे. शतावरी मुळांची जमिनीत चांगली वाढ होण्यासाठी जमिनीत पोकळपणा अत्यावश्यक आहे.

* लागवडीची पूर्वतयारी : शतावरी लागवडीसाठी ७५ ते ९० सें.मी. रुंद व १० मी. लांबीच्या सऱ्या व वरंबे तयार करावेत किंवा १ मी. रुंद, २० - २५ सें.मी. ऊंच व ५ मी. लांबीचे गादीवाफे तयार करावेत. माळरानाची जमीन असल्यास उतार पाहून आडवे. २x०.६०x०.३० चौ.मी. आकाराचे चर एकमेकांना समांतर न काढता एकाआड - एक काढावेत. त्यामुळे पावसाने वाहून जाणारी माती खालील चरात येते. दोन चरांमध्ये परिस्थितीनुरूप १ ते २ मी. अंतर ठेवावे. चरांमध्ये चांगले कुजलेले ८ - १० किलो शेणखत ५०० ग्रॅम कल्पतरू सेंद्रिय खत, चांगली माती, पालापाचोळा भरण्यापूर्वी चरांमध्ये लिंडेन पावडर टाकावी व त्यानंतर चर भरून घ्यावेत.

ज्या जमिनींमध्ये वरीलपैकी कोणत्याच पद्धतीने लागवड शक्य नसते. तिथे दोन ओळीत १.५ मी. व दोन रोपांत १.० मी. अंतरावर ०.४५x०.४५x०.४५ मी. आकाराचे खड्डे काढावेत. प्रत्येक खड्डा भरण्यापूर्वी ३० ग्रॅम लिंडेन पावडर खड्ड्याच्या आतून टाकावी व नंतर १ पती शेणखत, ५०० ग्रॅम कल्पतरू सेंद्रिय खत आणि चांगली माती मिसळून खड्डे भरून घ्यावेत.

* रोपवाटिका : मे- जून महिन्यात पाण्याची सोया असलेल्या शेतामध्ये रोपवाटिका तयार करावी. त्यासाठी जमीन भुसभुशीत करून १ x ३ मी आकाराचे गादीवाफे तयार करावेत. प्रत्येक वाफ्यात १ पाटी चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. एक हेक्टर लागवडीसाठी १ किलो बियाणे पुरेसे होते. बियाणे पेरणीपुर्वी जर्मिनेटर ३० मिली + १ लि. पाण्यात २४ तासांसाठी भिजत घालावे. तरंगणाऱ्या बिया अगोदर काढाव्यात व भिजलेल्या बिया सुकवाव्यात किंवा टिपकागदाने कोरड्या करून त्यांना ताम्रयुक्त बुरशीनाशक किंवा प्रोटेक्टंट पावडर चोळावी असे प्रक्रिया केलेले बियाणे २४ तासाच्या आत पेरावे. यासाठी गादी वाफ्यावर ५ - ७ सें.मी. अंतरावर २ - ३ सें.मी. खोलीच्या काकऱ्या पाडून त्यामध्ये ओळीने बी पेरून ते मातीने झाकावे. लगेच झारीने/पाटाने हलके पाणी द्यावे, म्हणजे बी वाहून जाणार नाही. पहिले ४ - ५ दिवस रोज सकाळ - सायंकाळ हलके पाणी द्यावे. त्यानंतर २० ते २५ दिवसांनी प्रत्यके वाफ्यात ५०० ग्रॅम कल्पतरू खताची मात्रा द्यावी. तसेच सप्तामृत २५० मिलीची १०० लि. पाण्यातून ८ ते १० दिवसांच्या अंतराने २ ते ३ वेळा फवारणी करावी, म्हणजे रोप ६ ते ७ आठवड्यांमध्ये पुनर्लागवडीसाठी तयार होते. गादीवाफ्याशिवाय प्लॅस्टीक पिशव्यांमध्ये बियांपासून किंवा खोडांपासून रोपे तयार करता येतात.

खोडांपासून रोपे तयार करण्यासाठी जाड व जुन्या खोडांची निवड करावी. त्यावर ३ ते ५ डोळ्यांच्या छाट कलमावर बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी. चांगली फूट होण्यासाठी १० लि. पाण्यात १०० मिली जर्मिनेटर घेऊन त्यामध्ये काड्यांची टोके बुडवावीत व अशा काड्या गादीवाफ्यावर/प्लॅस्टीक पिशव्यांत लावाव्यात. योग्य काळजी घेतल्यास ५० ते ७०% पर्यंत फूट होते.

* लागवड : चांगला पावसाळा सुरू झाल्यावर अगोदर तयार केलेल्या जमिनीत जुलै - ऑगस्ट महिन्यात रोपांची पुनर्लागवड करावी. रोपे काढण्याअगोदर रोपवाटिकेस आदल्या दिवशी हलके पाणी द्यावे. त्यामुळे रोपे काढताना मुळे तुटणार नाहीत. रोप काढल्यावर ज्या रोपांची मुळे मांसल असतील अशीच रोपे लागवडीसाठी वापरावीत. रोपे लागवडीच्या वेळी जर्मिनेटर १०० मिली + १० लि. पाणी या द्रावणात बुडवून लावावीत. त्यामुळे मर होणार नाही. रोप लागवडीनंतर ताबडतोब पाणी द्यावे. पावसाने ताण दिल्यास वेळ चांगले वाढेपर्यंत ८ ते १० दिवसांनी पाणी द्यावे. त्यानंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे व हंगामानुसार १५ - २० दिवसांनी पाण्याची पाळी द्यावी. वेळ चांगले वाढू लागल्यावर पाणी उशिराने दिले तरी चालते.

* लागवडीनंतरची निगा : शतावरी वेल चांगले वाढू लागल्यानंतर वेलीला ५ ते ६ फूट उंचीचे बांबू/एरंड लावून आधार द्यावा. याशिवाय लोखंडी - अँगल्स व तारेचा वापर करून २ मी. उंचीच्या मंडपावरही शतावरीचे वेल वाढविता येतात. दोन ओळीत १.५ मी. अंतर असल्याने तणांचा बंदोबस्त कुळवणी करून करता येतो. याशिवाय अधून - मधून झाडांच्या बुंध्यालगतचे तण खुरपणी करून काढावे. शतावरीच्या पिकावर सहसा कीड/रोगांचा प्रादुर्भाव आढळत नाही. परंतु पावसाळ्यात येणाऱ्या कूज व पाने खाणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यासाठी कूज होऊ नये यासाठी जर्मिनेटर १ लि. + प्रिझम १ लि. + हार्मोनी ५०० मिली + कॉपरऑक्सीक्लोराईट १ लि. + १०० लि. पाणी याप्रमाणे आळवणी (ड्रेंचिंग) करावी. तसेच अळीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रोटेक्टंट या वनस्पतीजन्य किटकनाशकाची फवारणी करावी.

* खते : जमिनीत सेंद्रिय खते अधिक असल्यास रासायनिक खताची गरज भासत नाही. शक्यतो लागवडीअगोदर मृदचाचणी करूनच खतांच्या मात्रा निश्चित कराव्यात. चांगल्या व निकोप वाढीसाठी योग्य प्रमाणात खतांचा वापर करावा. लागवडीनंतर वेल चांगले वाढू लागल्यावर आळे पद्धतीने ५० ते १०० ग्रॅम कल्पतरू खताची मात्रा द्यावी.

* काढणी व उत्पादन : प्रत्येक वर्षी शतावरीला डॉ.बावसकर तंत्रज्ञानाच्या जून - जुलै, ऑगस्ट या महिन्यात वाढीसाठी तसेच नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये कंद पोसण्यासाठी सप्तामृताच्या ३ ते ४ फवारण्या कृषी विज्ञान केंद्रातील तज्ञांच्या सल्ल्यानुसार कराव्यात. म्हणजे शतावरी मुळांची पहिली काढणी दीड ते दोन वर्षांनी करता येऊन पुढे १० ते १५ वर्षांपर्यंत मुळांचे उत्पादन घेता येते. प्रत्येक वर्षी अशी मुळे फेब्रुवारी - मार्च महिन्यात काढल्यास पुढे ती सुकविणे सोपे जाते. शतावरीची मुळे काढण्याअगोदर शेताला हलके पाणी द्यावे व वाफसा आल्यानंतर मुळांची काढणी करावी. मुळे काढताना शतावरीचे मुख्य खोड तसेच ठेवून बाजूने जमीन कुदळीने/टिकावाने खोदून झुपक्याने वाढलेली मांसल मुळे काळजीपूर्वक काढावीत. मुळे काढताना काही मुळे मुख्य खोडाशी ठेवावीत, जेणेकरून ती वनसंपत्ती समूळ नष्ट होणार नाही. त्यानंतर लगेच मुळावरची साल काढून मुळे स्वच्छ धुवून १० ते १५ सें.मी. लांबीचे तुकडे करावेत. तसेच मुळातील शीर ओढून काढावी. जेणेकरून वाळवण्याची प्रक्रिया लवकर पुर्ण होते. मुळे सावलीत सुकवावीत, कारण उन्हात सुकविल्याने मुळातील रासायनिक द्रव्यांचे अपघटन होण्याची शक्यता असते. योग्य काळजी घेतल्यास प्रति हेक्टरी १५ क्विंटल सुकलेल्या मुळ्यांचे उत्पादन मिळते.