हरभऱ्यास डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरल्यावर उन्हाळी भुईमूग खर्च २२ हजार, उत्पन्न १ लाख ७ हजार व कुटार ६ हजार बोनस

श्री. श्रीराम फरकाडे,
मु.पो. मांडव, ता. चांदूर रेल्वे, जि. अमरावती - ४४४९०४,
मो. ९५४५१८०२१६आमचे मित्र श्री. मोरेश्वर वाघ यांच्या शेतामध्ये डिसेंबर २०१५ मध्ये डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे प्रतिनिधी सुजित भजभुजे (मो. ९६६५२९०४९५) आले होते. त्यांनी हरभऱ्यावर फवारणीसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या उत्पादनांची माहिती दिली. त्यानुसार ती वापरली असता हरभऱ्यावर त्याचा उत्तम फरक जाणवला. घाटे भरपूर लागून त्यांचे पोषण चांगल्या प्रकारे झाले असल्यामुळे उत्पादनात वाढ झाली होती. त्यावरून मग मी आणि आमचे मित्र मोरेश्वर वाघ व मनोज फरकाडे असे आम्ही तिघांनी भुईमुगाकरीता डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरण्याचे ठरविले.

भुईमुगासाठी प्रथम जर्मिनेटर व प्रोटेक्टंट आणून त्याची आम्ही तिघांनीही बिजप्रक्रिया केली. नंतर छोट्या ट्रॅकटरच्या सहाय्याने पेरणी केली. या ट्रॅक्टरला भुईमूग पेरणी करीता फायबरचे पेरणी यंत्र असते त्यामुळे बियाण्याला इजा होत नाही. पेरणीवेळी सोबतच सिंगल सुपर फॉस्फेट एकरी एक बॅग पेरले. ८ ते ९ दिवसांनी भुईमूग बियाचे कोंब वर येऊ लागल्याचे दिसले. जर्मिनेटरच्या बिजप्रक्रियेमुळे उगवण एकसारखी झाल्यामुळे ट्रॅक्टरच्या पेरणीची तास एकसारखी झाल्यामुळे ट्रॅक्टरच्या पेरणीची तास एकसारखी दिसत होती. माझ्याप्रमाणेच दोन्ही मित्रांचे पण भुईमूग तासे एकसारखी उगवली. बिजप्रक्रियेचा चांगला फरक जाणवला. कारण आमचे दुसरे मित्र गोपाल पडोळे यांनी जर्मिनेटर वापरले नव्हते तर त्यांचा भुईमूग उगवायला १२ ते १५ दिवस लागले आणि उगवण ७० ते ८०% एवढीच झाली. आमची तिघांची मात्र ९५ ते ९६% एवढी उगवण झाली.

आम्ही उगवणीनंतर १२ दिवसांनी पहिला डवराचा फेर दिला. त्यामुळे उगवलेले तण निघून जाते आणि पिकाला एक प्रकारे हिरवळ खत मिलते. त्यानंतर ४ दिवसांनी जर्मिनेटर, थ्राईवर, प्रिझम प्रत्येकी ७५ मिली/१५ लि. पाणी (पंपास) याप्रमाणे आणि बीजप्रक्रियेसाठी आणलेले प्रोटेक्टंट रात्रभर भिजवून सकाळी कापडाने गाळून ते फवारणीसाठी वापरले. त्यामुळे भुईमुगाची वाढ निरोगी होऊन काळोखी आली. त्यानंतर आठवड्याने आळीच्या नियंत्रणासाठी किटकनाशक फवारले. ४० ते ५० दिवसांचे पीक असताना भुईमुगाला आऱ्या लागतात त्यावेळी आम्ही डवराच्या सहाय्याने मातीची भर दिली. जेणेकरून आऱ्या उघड्या न राहता जमिनीत गाडून शेंगा चांगल्या प्रकारे पोसतात. तेथून ५ ते ६ दिवसांनी दुसरी फवारणी थ्राईवर, क्रॉपशाईनर, न्युट्राटोन आणि राईपनर प्रत्येकी ७५ मिली/१५ लि. पंपाकरिता घेऊन दाट फवारणी केली. सोबत किटकनाशक वापरले. त्यामुळे आळी नियंत्रणात राहून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने पीक हिरवेगार व भरपूर फुट झाल्याचे दिसू लागले. तापमान खुप वाढू लागले होते तरीही पीक तग धरून होते. सुरुवातीला तृषार सिंचनाने ४ घंटे (तास) पाण्याच्या शिपा (छिडकाव) चालवत होतो. नंतर २ - २ घंटे काट्यावर येईपर्यंत (भुईमुगाला आऱ्या लागेपर्यंत) देऊ लागलो. त्यानंतर काट्यापासून ते अंड्यावर येईपर्यंत (आऱ्या लागल्यापासून त्यांना लहान - लहान शेंगा लागेपर्यंत) ३ - ३ घंटे शिप चालवली. त्यानंतर शेंगा भरण्यासाठी न्युट्राटोन, राईपनर आणि क्रॉपशाईनर प्रत्येकी ७५ मिली/१५ लि. पंपाकरीता याप्रमाणे घेऊन तिसरी फवारणी केली. क्रॉपशाईनरमुळे भुईमुगाचे उन्हापासून संरक्षण होऊन राईपनर आणि न्युट्राटोननी शेंगा पोसण्यास मदत झाली. दरम्यान पाण्याच्या पाळ्या नियमीत सुरू ठेवल्या, डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या ३ फवारण्यावरच भुईमुगाचे पीक उत्तम आले. शिवाय एरवी सुरुवातीला होणारी मर आढळली नाही. तसेच कोणत्याही प्रकारची कीड किंवा व्हाईरस आला नाही. पाने पिवळी पडली नाहीत. शेवटपर्यंत पीक निरोगी होते. दरवर्षी मर रोगामुळे ५ ते १०% झाडे दगावतात. तसेच बुरशीच्या प्रादुर्भावामुळे झाडे पिवळी, पिंगट पडतात. त्यामुळे झाडांची वाढ मंदावून शेंगा पोसत नाहीत. या गोष्टी यावेळी अजिबात जाणवल्या नाहीत.

२० ते २०१६ रोजी आम्ही भुईमूग सोंगायला (काढायला) सुरुवात केली तर प्रत्येक झाडाला टच्च भरलेल्या ३० ते ३५ शेंगांचा लाग होता. मला एकरी १४ क्विंटल उत्पादन मिळाले. माझ्या दोन्ही मित्रांना एकरी १३ क्विंटल उत्पादन मिळाले. यातुलनेत गोपाळ पाडळे यांना पारंपारिक पद्धतीमुळे केवळ १० क्विंटल/एकरी उत्पादन मिळाले. आता त्यांनीसुद्धा आमच्या प्रमाणे पुढील पिकांचे नियोजन डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने करायचे ठरविले आहे.

या शेंगांना मला धामणगाम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुमारे ५,१५० रु./क्विंटल भाव मिळाला. या भुईमुगाकरीता २२ हजार रु. खर्च झाला असून त्यापासून एकूण उत्पन्न १ लाख ७ हजार रु. झाले. त्याचबरोबर ३६ ढासे (मोठे डाले) कुटार (वाळलेला भुईमुगाचा पाला) यापासून ६ हजार रु. बोनस मिळाला.