हळदीचा पहिलाच प्रयोग १।। एकरात २६ टन ओली हळद, तर सोयाबीनमधील आंतरपीक तूर एकरी ६ क्विंटल

श्री. भुवनेश्वर गावंडे (प्राध्यापक), मु.पो. ब्राम्हणगाव ता. उमरखेड, जि. यवतमाळ,
मो. ९५५२१३५९७७


माझ्याकडे वडिलोपार्जित ८ एकर जमीन दिग्रस तालुक्यात विठोली येथे आहे. मी ब्राम्हणगाव येथे श्री. तेजमल गांधी कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक आहे. तसे आमच्या गावाकडे हळदीचे पीक एवढे होत नाही. पण मी ब्राम्हणगाव येथे नोकरीला असल्यामुळे उमरखेड येथून जाणे - येणे करत असताना रस्त्याने हळदीचे पीक घेतलेले पाहून आपणही हळद लावून पाहूया असे ठरवले. पण आमच्या भागात नविन असल्यामुळे हे पीक घ्यावे का नाही असे वाटत होते. त्यावेळेस ब्राह्मणगाव येथे सहारा कृषी केंद्रचे शब्बीर सर व डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी कंपनी प्रतिनिधी यांनी मला हळद पिकाचे मार्गदर्शन केले व हळदीचे पीक लावा असे सांगितले. मग मी १५ जून २०१५ ला बेड तयार करून ड्रिपवर हळदीची लागवड केली. त्यावेळेस जर्मिनेटर, हार्मोनी व क्लोरोपायरीफॉसची बीजप्रक्रिया केली. त्यामुळे उगवण पुर्ण होऊन जोमदार रोगमुक्त कोंब निघाले. २० व्या दिवशीच एकसमान रोपाची उगवण दिसली.

हळद लागवडीच्या वेळेस सिंगल सुपर फॉस्फेट एकरी ३ पोते, कल्पतरू सेंद्रिय खत २ पोते आणि निंबोळी पेंड ४० किलो याप्रमाणे देऊन बेड तयार केले होते. हळद उगवाणीपासून १५ - १५ दिवसांनी सप्तामृताच्या २ फवारण्या केल्या. त्यामुळे कोंबाची मर न होता रोगापासून संरक्षण मिळाले. वाढ चांगली झाली. नंतर ३० दिवसांनी कल्पतरू सेंद्रिय खत २ पोते देऊन १९:१९:१९ एकरी ३ किलो सोबत जर्मिनेटर १ लि. याप्रमाणे ड्रेंचिंग केली असता पांढऱ्या मुळ्या सक्षम होवून मर न लागता झाडाची निरोगी वाढ झाली. तसेच २.५ ते ३ महिन्यानंतर तिसरी सप्तामृताची फवारणी घेतली. त्यामुळे पिकाची जोमदार वाढ होवून भरपूर प्रमाणात फुटवे फुटले. खोड व फुटव्याच्या जाडीत वाढ होऊन पाने रुंद झाली. तसेच रोग प्रतिकारक शक्ती वाढली. गड्ड्याच्या फुटी भरपूर प्रमाणात निघाल्या. ते गड्डे उघडे पडू नये म्हणून बेडवर पिकाला मातीची भर लावली.

त्यानंतर हळदीवर ऑगस्ट महिन्यात येणारा करपा, टिक्का येऊ नये म्हणून अगोदरच थ्राईवर, क्रॉंपशाईनर, हार्मोनी सोबत सेक्टीन या बुरशीनाशकाची फवारणी केली. त्यामुळे माझ्या शेतात शेवटपर्यंत हळदीचे कोणतेही पान पिवळे, तांबडे, तपकिरी पडले नाही. पीक काढणीस येईपर्यंत हिरवेगार दिसत होते. आमच्या गावातील लोक हे पीक पाहून आम्हाला म्हणत, "सर तुम्ही कोणती औषधे फवारली, आम्हालापण सांगा." पुढे जानेवारी, फेब्रुवारीत (२०१६) गड्डे पोसण्यासाठी थ्राईवर, क्रॉपशाईन, राईपनर, न्युट्राटोन, हार्मोनी यांच्या २ फवारण्या केल्या, त्याने गड्डे पोसण्यास मदत झाली. शिवाय मालाला चकाकीही आली.

या हळदीची काढणी केली असता १।। एकरात २६० क्विंटक ओल्या हळदीचे उत्पादन मिळाले. आमच्या गावातील काही शेतकऱ्यांनी हळद लागली होती तर त्यांना एकरी १०० ते ११० क्विंटल ओली हळद मिळाली. उमरखेड भागातील शेतकऱ्यांना सरासरी एकरी १४० ते १५० क्विंटल ओली हळद झाली. आम्हाला मात्र तालुक्यात १ नंबर उत्पादन (एकरी १७४ क्विंटल) मिळाले. हे पाहण्यासाठी उमरखेडच्या परिसरातील प्रगतिशील शेतकरी माझ्या प्लॉटवर येत असत. त्यांना मी सांगितले. तुम्ही हळदीचे नेहमी उत्पादन घेता तर एकदा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने उत्पादन घेऊन पहा. निश्चितच माझ्यापेक्षाही जास्त उत्पादन मिळवू शकाल. कारण हळद हे पीक मी पहिल्यादांच केले असल्याने हळद पिकातील अनुभव नसताना मला हे शक्य झाले, तुम्ही तर अनुभवी आहात.

मी हळदीच्या अनुभवातून लगेचच सोयाबीनमधील तुरीला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरली. सोयाबीनच्या ६ ओळीनंतर तुरीची १ ओळ अशी लागवड होती. तर त्यातील फक्त तुरीला हे तंत्रज्ञान वापरले. तर दुसऱ्या शेतातील तुरीपेक्षा या तुरीला शेंगाचे प्रमाण वाढून तुरीचे झाड जमिनीला टेकत होते. मला या सोयाबीनमधील तुरीचा एकरी ६ क्विंटल उतारा मिळाला. तुरीला भाव ९ हजार रु./क्विंटल मिळून सोयाबीनमधील या आंतर पिकापासून ५४ हजार रु. मिळाले. सोयाबीनला मात्र हे तंत्रज्ञान वापरले नव्हते. सोयाबीनचे एकरी ८ क्विंटल उत्पादन मिळाले. आता हळद व तूर या पिकांच्या अनुभवातून चालूवर्षी पुन्हा २ एकर हळदीची लागवड २५ मे २०१६ ला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने केली आहे.