महाराष्ट्र आंबा व फलोत्पादन उत्पादकांचा परिसंवाद संपन्न

प्रा. डॉ. वि.सु. बावसकरमहाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघ यांनी ७ मे २०१६ रोजी पेण, जि. रायगड येथे कोकण विभागीय कृषी फलोत्पादन यावर आधारित परिषद आयोजिली होती. या परिषदेचे उद्घाटन मा. श्री. तानाजी सत्रे, विभागीय महसूल आयुक्त कोकण यांच्या हस्ते झाले.

ज्येष्ठ शेती शास्त्रज्ञ प्रा.डॉ.वि.सु. बावसकर सरांचे मार्गदर्शन झाले. त्यांनी प्रक्रिया उद्योग व मुल्यवर्धन यावर भर दिला. आंबा काजू, फणस, नारळ या व्यतिरिक्त कोकणात लिची या आयुर्वेदात उपयुक्त अशा फळास कोकणाची जमीन व हवामान हे अनुकूल आहे. म्हणजे पारंपारिक कोकणातील फळे घेण्यापेक्षा अपारंपारिक लिचीसारखी जर फळे घेतली तर याची बाजारात किंमत १५० ते २०० रु./किलो मिळते. परंतु बिहारमध्ये याची लागवड अधिक आहे. तेथे देठासह १५ ते २५ रु./किलो पर्यंत भाव मिळतात. हे फळ मार्केटमधून आणले की फ्रिज मध्ये ठेवावे लागते. तेव्हा त्याचा टिकाऊपणा वाढतो. मुल्यवर्धनामध्ये या फळाचा रस काढला जातो. अॅप्पल ज्युस प्रमाणे लिचीचा ज्यूस करता येतो. लिची ज्युस हा प्रकृतीच मानवणारा असतो. याची फळे हदयाच्या किंवा बदामाच्या आकाराची असतात. फळे साधारण १५ ते २० ग्रॅमची असतात. गर पांढरा २ एम.एम. चा अर्धपारदर्शक असतो. मध्ये काळपट रंगाची, लांब, ३ ते ५ ग्रॅम चे बी असते. याचा रस अतिशय पौष्टीक असतो. लिचीचा हंगाम हा १५ ते १५ जुलै असा साधारण २ महिन्याचा असतो. उदाहरण म्हणून सरांनी सांगितले, ३० वर्षांपूर्वी आमच्या ऑफिसमध्ये पटेल नावाचा एक पारशी माणूस डहाणूहून आला होता. त्याने सांगितले की, झाडावरील लिची काढण्यायोग्य १५ मे ते १५ जुनपर्यंत तयार होते आणि कोकणात मेच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात मान्सूनचा शिरकाव होतो व ही फळे मोसमी पावसात सापडून नासतात, सडतात तेव्हा यावर त्यांनी सल्ला विचारला तेव्हा सरांनी सांगितले, फुल लागल्यापासून फळे काढेपर्यंत पंचामृताचे (आता सप्तामृत) साधारण ३ ते ४ फवारे केले तर मोसमी पावसा अगोदर फळे काढणीस येतील. त्यानुसार त्याने औषधे नेली. त्यांनतर ६ महिन्यांनी जुलैमध्ये तो आला व त्याने सांगितले पावसाअगोदर आमची लिचीची फळे दर्जेदार, अधिक काढणी होऊन ती दक्षिण युरोपमध्ये निर्यात झाली. अशा रितीने त्याच्या समस्येवर उपाय मिळाला. (संदर्भ: लिचीचा अंक 'कृषी विज्ञान' नोव्हेंबर २०१४, पान नं. २९)

मा. श्री. तानाजी सत्रे यांनी उद्घाटनपर भाषणामध्ये पाण्याचे महत्त्व व जलसंधारण तसेच व्यापारी पिकांविषयी उत्पादन, विक्री व्यवस्था व मुल्यवर्धन या विषयी सखोल मार्गदर्शन केले. रायगड जिल्हा अधिकारी श्रीमती शितल उगले तेली यांनी मुल्यवर्धनावर भर दिला. सरांचे विद्यार्थी डॉ. रामचंद्र साबळे यांनी यंदाचे हवामान कसे असेल याचे विश्लेषण केले. कार्यक्रमाचे आयोजक महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी स्वागत व आभार प्रदर्शन केले.

डॉ. किसन लवांडे यांना जीवनगौरव पुरस्कार

राष्ट्रीय कांदा, लसूण संशोधन केंद्राचे माजी संचालक डॉ. किसन लवांडे यांना कांदा व लसूण क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल 'एनएचआरडीएफ' च्या वतीने जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल 'कृषी विज्ञान' परिवारातर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन !

भारतीय कृषी संशोधन संस्थेमध्ये अखिल भारतीय भाजीपाला कार्यशाळेमध्ये आयसीएआर चे महासंचालक डॉ. महापात्रा यांच्या हस्ते नुकताच पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. किसन लवांडे हे १९९७ ते २०११ दरम्यान राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्रात कार्यरत होते. त्यांनी कांद्याचे ७ तर लसणाचे ३ वाण विकसीत केले आहेत. कांदा उत्पादनासाठी ठिबक फार फायदेशीर असल्याचे संशोधनातून सिद्ध केले. तसेच कांदा साठवणीचे तंत्रज्ञान विकसीत करण्यामध्ये त्यांचे मोलाचे कार्य आहे. डॉ. किसन लवांडे हे २०११ ते २०१४ या काळात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून कार्यरत होते. डॉ. लवांडे हे डॉ.बावसकर सरांचे विद्यार्थी होत.