८ एकर तूर ४२ क्विंटल., फरदडची १६ क्विंटल. तर ओल्या तुरीच्या शेंगा १४२ क्विंटल

श्री. विजय सावरकर,
मु.पो. कारंजा लाड, ता.कारंजा, जि.वाशिम.
मो.८४२१००९३६४/७०५७५७८०५२


मी १६ जून २०१५ रोजी ८ एकरामध्ये सोयाबीन आणि तूर लावली. तूर ६ तशी लावली होती. सुरुवातीला मी सोयाबीन आणि तुरीला एकरी १ पोते डी.ए.पी. दिले. नंतर कीड नियंत्रणासाठी क्लोरोपायरीफॉसची फवारणी केली. नंतर कालांतराने त्यामध्ये मी डवऱ्याचे फेर सुरू ठेवले आणि तण नियंत्रणात आणत राहिले. त्या तणांचे चांगले हिरवळ खतासारखे काम होते. त्यानंतर सोयाबीनची काढणी केली (सोंगले) तेव्हा मला ८ एकरमध्ये ६४ पोते सोयाबीन झाले. हे माझ्यासाठी समाधानकारक होते. नोव्हेंबर महिन्यात तुरीच्या शेंगा सोंगल्या (काढल्या) तेव्हा ४२ पोती म्हणजे ४२ क्विंटल तूर झाली. ती अद्याप मी विकली नाही.

तुरीच्या फरदडची ओली हिरवी शेंग १४२ क्विंटल दर ५८ ते ६० रु./किलो

मग डिसेंबर महिन्यात भजभुजे साहेबांची भेट झाली आणि तुरीचा फरदड (खोडवा) घ्यायचे मी ठरविले. माझ्या तुरीच्या झाडाची उंची सरासरी ७ ते ८ फूट इतकी होती. आमच्या भागात तुरीची साधारण उंची इतकीच असते. वरून दोन फुट तुरी सोंगून टाकल्या होत्या आणि बाकी शेंगा मजुरांकडून तोडल्या होत्या. त्यानंतर लगेच तुरीला तुषार सिंचनाने पाणी दिले. नंतर त्यामधून रोटावेटर फिरवले. त्यानंतर व्ही (V) पास मारून दोन फुटाचे बेड तयार केले. तुरीकरता नंतर रिंग पद्धतीने १०:२६:२६ खताची १ बॅग आणि तेथून २५ दिवसांनी एकरी १ बॅग डी.ए.पी. खत दिले. त्यानंतर लगेच त्याला तुषार सिंचन आणि पाट पाणी दिले. मग पहिली फवारणी मी जर्मिनेटर, प्रिझम, थ्राईवरची केली. त्यानंतर पुन्हा १५ दिवसांनी मी त्यावर हीच फवारणी केली. एवढ्यावर भरपूर फुटवा होऊन तूर चांगली हिरवी कच्च झाली. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला बहार धरला. फुलांनी झाडे चांगली पिवळसर दिसू लागली. त्यानंतर गळ होऊ नये. शेंगांमध्ये रूपांतर होण्यासाठी त्यावर मी थ्राईवर, क्रॉंपशाईनर, न्युट्राटोन ची फवारणी केली असता २ फेब्रुवारी रोजी तुरीच्या शेंगांची तोडणी करावी लागली. पहिल्या दिवशी १५० किलो तुरीच्या शेंगा निघालाय, त्या मी बाजारात नेवून विकल्या. मला ५८ रु./ किलो भाव मिळाला. २ फेब्रुवारीपासून दररोज सरासरी १ ते १।। क्विंटल तुरीच्या शेंगा मी विकत होतो. कधी ५८ रु./किलो तर कधी ६० रु./किलो भाव मिळाला. दर १५ ते २० दिवसांनी मी जर्मिनेटर,प्रिझम,थ्राईवर, क्रॉंपशाईनर, न्युट्राटोन, राईपनर प्रत्येकी १ लिटर + २०० ली. पाणी याप्रमाणे फवारणी करत होतो. यामध्ये जेव्हा तूर हलकीशी पिवळी पडली होती तेव्हा ५०० मिली हार्मोनी २०० लिटर पाण्याला वापरले. सोबतच वेळोवेळी किटकनाशकाची ही फवारणी केली. या फरदड तुरीच्या ओल्या शेंगांची २ फेब्रुवारीपासून नियमीत तोड सुरू केली तर २८ एप्रिल पर्यंत १४२ क्विंटल ओल्या शेंगा मिळाल्या. त्या ५८ ते ६० रु./किलो भावाने मी विकल्या. ओल्या शेंगा तोडताना काही शेंगा सुटून जातात. त्या शेंगा वाळल्यानंतर जमा केल्या असता त्यापासून एकूण १६ क्विंटल वाळलेली तूर झाली. अशा रितीने मला आतापर्यंत ८ एकर शेतातून ५८ क्विंटल तूर व १४२ क्विंटल तुरीच्या ओल्या शेंगांचे उत्पादन मिळाले असून या ८ एकरपैकी २ एकर प्लॉट अजून चालू असून त्यामधून अजूनही २० क्विंटल तुरीच्या ओल्या शेंगा निघतील.

हिशोब केला असता मला सरासरी १४२ क्विंटल शेंगा ह्या ५० रु. किलो नफ्याने पडल्या. बाकी ८ ते १० रु. किलो होता फवारणी, मजुरी, हमाली इत्यादीसाठी खर्च आला. अशा रितीने तुरीच्या फरदडचा माझा प्रयोग मी घेतलेली मेहनत व डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने यशस्वी झाला. तुरीचे आजचे भाव पाहता ८८०० रु./क्विंटल प्रमाणे ५८ क्विंटल तूर हा माझा बोनसच आहे.