बी.टी. कापूस ओळख व आवश्यकता

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


बी. टी. कापसाविषयी प्रथम आपण जाणून घेऊ या

केंद्र सरकारने जनुकीय बदल केलेले बियाणे वापरण्यासाठी परवानगी दिल्यामुळे आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या जैविक बियाण्यास किडी -अळींचा प्रादुर्भाव होत नाही. त्यामुळे दरवर्षी कापसावरील बोंड अळीच्या नियंत्रणासाठी जी २ हजार कोटी रुपयांची किटकनाशके वापरूनही किडका, निकृष्ट दर्जाचा कापूस पदरात पडतो. तेथे बी. टी. कापसामुळे बोंड अळीचे प्रभावी नियंत्रण होते.

'बॅसिलस थिरूजिअनसिस' नावाचा हा जनिमितील बॅक्टेरियम जीवाणू आहे. हा जीवाणू बोंड अळीच्या पोटात गेल्यानंतर अळी मरते. हे लक्षात आल्यानंतर बी. टी. जीवाणूंची शिफारस बोंड अळीच्या नियंत्रणासाठी करण्यात आली. पुढे बी. टी. जनुक कापसाच्या झाडावरील जनुकांशी संशोधनातून जोडल्यामुळे त्यास बी. टी. कॉटन म्हणतात. बी. टी. जीवाणूतील विषारी जीवाणू कापसात घातल्यामुळे कापसाच्या झाडतच बोंड अळीस प्रतिकार करण्याची शक्ती तयार होऊन इतर गुणधर्म जसेच्या तसे राहतात.

सर्व सजीवांच्या पेशीतील क्रोमोझोमवर जनुकाचा नकाशा असतो. या नकाशावरून त्या सजीवांचे गुणधर्म स्पष्ट होतात. जनुकाचे शरीरातील सर्व प्रक्रियेवर नियंत्रण असते. जनुकीय नकाशात बदल करणे असामान्य कामगिरी आहे. अतिसूक्ष्म पद्धतीचे हे काम असून बी. टी. चा जीवाणू एकपेशीय असल्यामुळे त्याचा बोंडअळी प्रतिबंधक जनुक वेगळा करण्यात लवकर यश आले आहे. तुलनेने कापसाचा जनुक मोठा असल्याने कापसाचे इतर गुणधर्म कायम राखून बी. टी. चा जनुक त्यामध्ये टाकण्यास यश आले.

बी. टी. कापसाची गरज : कापसाच्या उत्पादनात घट येण्यामध्ये महत्त्वाची समस्या म्हणजे बोंड अळीचा प्रादुर्भाव. तसेच या अळीच्या नियंत्रणासाठी कराव्या लागणार्‍या महागड्या विषारी औषधांचा वापर,यामुळे उत्पादन खर्चात वाढ होते. यावर मात करण्यासाठी जमिनीतील 'बॅसिलस' थिरूजिअनसिस' सुक्ष्मजीवाणूमधून जनुक (क्राय १ एसी ) वेगळा केला आहे. हे जनुक बोंडअळीसाठी विषारी प्रथिनांची निर्मिती करते आणि त्यामुळे बी.टी. कपाशी बोंडअळीस प्रतिकार करू शकते.

हंगाम : महाराष्ट्रा कपाशीची लागवड जिरायत तसेच ओलीताखाली (बागायत) केली जाते. महाराष्ट्रातील कपाशीखालील ९६% (२४ ते २५ लाख हेक्टर) क्षेत्र जिरायती असून उरलेल्या ४% (१ लाख हेक्टर) क्षेत्रामध्ये बागायती (ओलीत) लागवड केली जाते.

जिरायती कापसाची पेरणी राज्यात प्रामुख्याने खरीप हंगामात केली जाते. ही पेरणी पावसाळा सुरू झाल्यावर म्हणजे जून - जुलै महिन्यात करतात. जून - जुलैमध्ये लागवड केलेल्या कापसाची वेचणी जानेवारी - फेब्रुवारी पर्यंत चालते.यालाच डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या मागील लेखात दिल्याप्रमाणे फवारण्या केल्यास कापूस पूर्ण उमलून डिसेंबरपर्यंत वेचणी संपते जमीन उन्हाळी पिकास तयार होते.

बागायती कपाशीची लागवड उन्हाळ्यात व पूर्व खरीप हंगामात करण्यात येते. उन्हाळी कपाशी प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सातारा, पुणे, सांगली, अहमदनगर भागात केली जाते. या कपाशीची पेरणी मार्च,एप्रिलमध्ये होते. वेचणी ऑगस्ट -सप्टेंबर महिन्यात पूर्ण होते.