सरकी व तेलउद्योग

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


वेचलेला कापूस हा रुई व सरकी (बिया) असा एकत्र असतो. या कापसाची पिलाई करून रुई व सरकी वेगळी केली जाते. सर्वसाधारणपणे कापसात सरकी व रुई ह्यांचे प्रमाण २:१ असे असते, पण सरकी व रुई यांचे प्रमाण प्रत्येक जातीत निरनिराळे असू शकते. काही देशी जातीत सरकी व रुईचे प्रमाण ५५.४५ एवढे असते. अमेरिकन जातीची सरकी आकाराने मोठी तर देशी कापसाची सरकी लहान आकाराची असते. बहुतेक जातींच्या सरकीवर लव (Fur) ही असतेच. साधारणपणे लव काढलेली सरकी काळ्या रंगाची तर काही जातीत भुरकट रंगाची असते. सरकीचे टरफल जाड असते. आतील गाभा व वरचे टरफल जवळ जवळ सारख्याच वजनाचे असते.

टरफळ हे सेल्युलोज (Celulose) लिगनीन (Lignin) चे बनलेले असते. त्यात टॅनिन, लहान खनिज व रंगाचे अनुवांशिक गुण असतात.

सरकीच्या आतल्या गाभ्यात दोन दलांमध्ये अंकुर व बाकी भाग चरबी, प्रोटीनयुक्त असतो. सरकीचा मुख्यत्वे दुभत्या जनावरांना खाण्यासाठी आणि तेल काढण्यासाठी उपयोग होतो. सरकीमध्ये गॉसीपॉल नावाचा अपायकारक घटक असल्यामुळे जनावरास त्यापासून घेरी येते. लहान जनावरांना जर सरकी जास्त प्रमाणात दिली गेली तर जनावर दगावण्याची भिती असते. म्हणून दुभत्या जनावरांना दुध वाढीसाठी काही प्रमाणातच खाणण्यास दिली जाते. आजकाल महागाईमुळे सरकी ऐवाजी तेल काढल्यानंतर पेंडच जनावरांना खाण्यास दिली जाते. त्यामुळे जवळजवळ ५० % सरकी ही तेल उद्योगातच वापरली जाते.

तेल काढण्याच्या यांत्रिकी तीन पद्धती आहेत.

१) पाण्याच्या दाबाचे यंत्र म्हणजे सर्वात जुनी हायड्रोलिक प्रेस पद्धत .

२) यांत्रिक दाब (स्क्रू प्रेस) देऊन तेल काढणे ही आधुनिक पद्धत आहे .

३) रासायनिक पद्धतीने (solvent Press) तेल काढणे .

या तीन पद्धतीने पहिल्या दोन पद्धतीमध्ये १ ते २ % तेल पेंडीत राहते, मात्र तिसर्‍या (solvent) पद्धतीत १०० % तेल निघते. यातील पहिली पद्धत मुख्यत्वे वापरली जाते. ह्या पद्धतीत मनुष्यबळ कमी लागून ती आटोपशीर आहे. यातील सर्वांत उत्तम पद्धत म्हणजे सॉल्व्हंट पद्धत, पण या पद्धतीकरिता यंत्रसामग्री लागते. ती महाग व हाताळणीसाठी तज्ज्ञांची आवश्यकता असते. अन्यथा धोका संभवण्याची शक्यता असते. नवीन तेल घाण्यात स्क्रू व सॉल्व्हंट या दोन्ही पद्धती एकदम वापरल्या जाऊन यामध्ये स्क्रू पद्धतीने तेल काढून राहिलेले तेल सॉल्व्हंट पद्धतीने काढले जाते.

रासायनिक पद्धतीने (solvent Press) राहिलेले १ ते २% तेलही काढल्यानंतर निघालेल्या पेंडीमध्ये प्रथिनांचे प्रमाण अधिक असते. त्याचा वापर परदेशात बिस्कीटे तसेच लहान मुलांचे खाद्य पदार्थ तयार करण्यामध्ये मिश्रण (Additive) म्हणून केला जातो. आपल्या देशामध्ये ही पेंड जनावरांचे, कोंबड्यांचे खाद्य तयार करण्यामध्ये पुष्कळशी वापरली जाते.

सरकीचे तेल इतर तेलाच्या मानाने स्वस्त असून यात तयार केलेले पदार्थ अधिक दिवस टिकतात. त्यामुळे या तेलाचा वापर फरसाण (शेव, चिवडा, पापडी इ.) तयार करण्यासाठी देशभर मोठ्या प्रमाणात केला जातो. शेव आणि मुरमुरे हे गरीबांचे खाद्य तर श्रीमतांचे हौशी खाद्य असल्याने हा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो. यामध्ये शेंगदाणा तेल वापरून तयार केलेला फरसाण जड दिवस झाल्यास खौट लागतो. त्यामुळे सरकीच्या तेलाला मोठी मागणी आहे.