पपईत कोथिंबीरीचे आंतरपीक

श्री. विठ्ठल मारुती सातव, मु. पो. वाघोली (आव्हाळवाडी) . ता. हवेली. जि. पुणे.
मो. ९८२२७१५६५१, ९८५०९०९५९६


४ - ५ वर्षापुर्वी पपई एक एकर केली होती. जमीन भारीकाळी असून पाणी पाटाने देत असे. लागवडीतील अंतर ६' x ८॥' होते. त्या प्लॉटला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्या करत असे. त्यामुळे तो बाग एक नंबर आला होता. एकरात २ ते २॥ लाख रू. झाले होते. या अनुभवावरून चालू पपईला हे तंत्रज्ञान आज घेऊन जात आहे.

चालू पपई दीड एकरमध्ये १५०० झाडे लावलेली आहेत. कांद्यामध्ये ही पपई ऑक्टोबर २००९ च्या सुरुवातीस लावली. कांदा दीड - दोन महिन्याचा असताना पाऊस जादा झाल्याने कांदा रोगाने गेला. नंतर मशागत करून पपईला भर लावून वाफ्यात (पपईच्या मधल्या पट्ट्यात) धना टाकला. कोथिंबीर साऱ्या आड साऱ्यात टाकली आहे. कारण रान भारी काळे असल्याने सर्व सारे भिजविल्यास पपईला पाणी जादा होईल म्हणून हा प्रयोग केला. यामध्ये साऱ्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या वरंब्यावरील पपईच्या झाडांना धन्याबरोबर पाणी मिळते. आता ही कोथिंबीर काढणीस आली आहे. ही कोथिंबीर काढल्यावर लगेच मधे रिकाम्या सोडलेल्या साऱ्यात धना टाकत आहे. असे टप्प्याटप्प्याने रानास विश्रांती मिळून पाण्याचा योग्य निचरा होतो.

उन्हाळ्यात पपईच्या सावलीत मेथी चांगली येते. म्हणून नंतर टाकलेली कोथिंबीर निघाल्यावर मेथी टाकणार आहे.